चित्र-चरित्र

बाळ कर्वे
बाळ कर्वे
अभिनेते
२५ ऑगस्ट १९४२

बाळ कर्वे हे पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. त्यांचे खरे नाव ‘मा. बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘मा. बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. पुढे नोकरीसाठी ते मुंबईत आले. बृहन्मुंबई महापालिकेत त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. परीक्षा आणि मुलाखत आदी सोपस्कार पार पडून ते महापालिकेत नोकरी करू लागले. २१ मे १९६२ मध्ये ते महापालिकेत नोकरीला लागले आणि ३२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. बदली झाली तरी मुंबईतच होईल अन्य कुठे जावे लागणार नाही, म्हणून त्यांनी महापालिकेखेरीज अन्य दुसऱ्या नोकरीचा विचार केला नाही. नोकरीत असताना सहकारी आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे त्यांना नाटक, चित्रपट दौरे करता आले.

मुंबई दूरदर्शनवरून सादर झालेली ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. अगदी अमराठी प्रेक्षकांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती. मा. बाळ कर्वे यांनी त्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवरील अनेक मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध भूमिका रंगविल्या पण प्रेक्षकांच्या मनात ‘गुंडय़ाभाऊ’ अद्यापही ठसलेला आहे. हे त्या भूमिकेचे यशच म्हणायला पाहिजे. विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी लिहिलेल्या ‘चिमणराव व गुंड्याभाऊ’च्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती. छोट्या छोट्या प्रसंगांतून घडणारी सहज विनोदनिर्मिती, खळाळून हसविणारा निखळ विनोद आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मालिकेतून सहजपणे मांडण्यात आला होता.

मुंबई दूरदर्शन केंद्रावरील निर्माते याकुब सईद आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मनात ही मालिका करायचा विचार आला. सुरुवातीला चिमणराव व गुंडय़ाभाऊ म्हणून दिलीप प्रभावळकर आणि मा. बाळ कर्वे यांचे नाव नव्हते. या साठी ‘चिमणराव’ आणि ‘गुंडय़ाभाऊ’ या भूमिकांसाठी अनुक्रमे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर आणि धुमाळ यांच्या नावांचा विचार झाला होता. पण काही कारणाने या दोघांनाही काम करणे जमणार नव्हते. अभिनेते शरद तळवलकर यांनीच ‘गुंड्याभाऊ’साठी मा. बाळ कर्वे यांचे नाव सुचवले. दिलीप प्रभावळकर तेव्हा ‘पंचवीस एके पंचवीस’ हा कार्यक्रम करीत होते. त्यांचे नाव चिमणराव म्हणून नक्की झाले आणि पुढे या मालिकेने इतिहास घडवला. दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी सायंकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होत होती. मालिकेचे ३७ भाग प्रसारित झाले. मालिकेचे सुरुवातीचे लेखन व. पु. काळे यांनी केले तर नंतर ही जबाबदारी श्रीधर घैसास यांनी सांभाळली.

‘गुंड्याभाऊ’कडे असलेला ‘सोटा’ हे त्या भूमिकेचे एक खास वैशिष्ट्य होते. ‘चिं. वि. जोशी’ हे लेखक म्हणून खूप मोठे होतेच. मालिकेच्या लोकप्रियतेनंतर ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’हा चित्रपटही प्रदर्शित झाला. विजय तेंडुलकर यांनी त्याचे लेखन केले होते. पण तो विशेष चालला नाही.

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या नाट्य क्षेत्रातील गुरु. ज्येष्ठ अभिनेते माधव वाटवे हे त्यांचे शेजारी. विलेपार्ले येथे एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत ते राहायचे. साहित्य संघात ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला वाटवे हे कर्वे यांना घेऊन गेले होते. तेथे ‘रंगायन’ची अनेक मंडळी होती. पुढे कर्वे यांनी ‘रंगायन’मध्ये प्रवेश केला. यातून ‘लोभ नसावा ही विनंती’ हे विजय तेंडुलकर यांचे नाटक त्यांनी राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केले. नाटकाला पारितोषिकही मिळाले. ‘रंगायन’संस्थेतही त्यांनी काही काळ काम केले. ‘रंगायन’च्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’या नाटकाचे प्रयोग जर्मनी येथे झाले. त्या दौऱ्यात प्रयोगाच्या वेळी ‘सेट’चे सर्व काम कर्वे यांनी पाहिले. विमानातून नेता येतील, असा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता. यातून पुढे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटकात बदली कलाकार म्हणूनही काम केले. साहित्य संघाचे ‘संध्याछाया’ हे कर्वे यांचे पहिले व्यावसायिक नाटक. यात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात छोटी भूमिका कर्वे यांच्या वाटय़ाला आली होती पण आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या भूमिकेत असे काही रंग भरले की ती भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. इथून पुढे कर्वे यांचा नाट्यप्रवास सुरू झाला. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ आदी नाटकेही त्यांनी केली. माधव वाटवे यांनी दिग्दर्शित केलेले ‘आम्ही लटिके ना बोलू’ हे नाटकही त्यांनी केले. यात त्यांच्यासोबत नाना पाटेकर होते. भक्ती बर्वे यांच्या बरोबरचे ‘आई रिटायर होते’ हे नाटक खूप गाजले. याच नाटकासाठी त्यांना राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कारही मिळाला. आजवरच्या अभिनय कारकीर्दीत मिळालेला हे एकमात्र पुरस्कार असल्याचे ते सांगतात. कर्वे यांची सुरुवात बालनाट्यापासून झाली. विलेपार्ले येथील सुमंत वरणगावकर यांच्या ‘रंगमंच किलबिल’ संस्थेतर्फे त्यांनी काही बालनाटय़े सुरुवातीला केली होती.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सूत्रे मोहन जोशी यांच्याकडे आली आणि त्यांनी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराच्या डागडुजीचे व पुनर्बाधणीचे काम हाती घेतले. त्या वेळी कर्वे यांनी आपण स्थापत्य अभियंता व अभिनेता अशा दोन्ही भूमिकेत काम केलेले असल्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामात आपल्याला काम करायची इच्छा त्यांनी जोशी यांच्याकडे बोलून दाखविली होती. जोशी यांनी हिरवा कंदील दिल्याने नाट्यगृहाची दुरुस्ती आणि फेररचना यात कर्वे यांनी मोलाचे योगदान दिले. हे सर्व काम त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता नि:शुल्क केले. त्यांनी नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे.

मा. बाळ कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची अगदी लहान भूमिका होती. ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’, ‘लपंडाव’, ‘गोडी गुलाबी’ हे त्यांचे काही चित्रपट. ‘बन्याबापू’ या चित्रपटात ते चक्क नायिकेबरोबर बागेत फिरताना आणि गाणे म्हणताना पडद्यावर दिसतात. सरला येवलेकर त्यांची नायिका होती. त्या दोघांवर चित्रित झालेले ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. सई परांजपे यांचा ‘कथा’ हा त्यांनी केलेला एकमात्र हिंदी चित्रपट. हिंदीत ते फारसे रमले नाहीत.

दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील त्यांनी साकार केलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला ‘काय’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. ‘महाश्वेता’ या मालिकेतही ते होते. ‘प्रपंच’, ‘वहिनीसाहेब’ तर अलीकडच्या ‘राधा ही बावरी’ आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकेतूनही कर्वे यांनी अभिनय केला. आता मा. बाळ कर्वे यांनी नाटक, चित्रपट यात काम करणे थांबविले असले तरी मालिकेतून चांगली भूमिका मिळाली तर ते करतात. भूमिका त्यांना आवडली तरच ते काम स्वीकारतात.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र