चित्र-चरित्र

दादा कोंडके
दादा कोंडके
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता
८ ऑगस्ट १९३२ --- १४ मार्च १९९८

‘नायका’ला शोभेल अशी शरीरयष्टी नाही, प्रभावित करेल असे रूपही नाही. तरीही ‘दादा कोंडके’ नावाच्या अवलियाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ज्यांच्या नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हापुन्हा गर्दी करतात, अशा काही मोजक्या भाग्यवंत कलाकारांपैकी दादा एक. दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतील नायगाव परिसरातील गिरणी कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला, त्यामुळे त्यांचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवण्यात आले. बालपणापासूनच दादा वात्रट होते. मस्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली. त्यामुळे ते राहत असलेल्या मुंबईच्या परळ, नायगाव भागात खोड्या-भांडणे करणारा म्हणूनच दादांची ओळख होती. त्यांच्या रोजच्या त्रासाला त्यांची आई, सखूबाई वैतागलेली असायची. त्यांचे वडील गिरणीत कामाला होते. भविष्यात पोराचे कसे होणार? ही चिंता दादांच्या आई-वडिलांना सतत असायची. अभ्यासातही दादांचे फारसे लक्ष नसायचे. गुंडगिरी करणार्‍या मित्रांच्या सहवासातच त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असे.
दिवसेंदिवस वाढत जाणारा दादांचा द्वाडपणा कमी व्हावा, म्हणून मोठ्या भावाने त्यांना ‘अपना बझार’मध्ये नोकरीला लावून दिले. राजाराम गोलटकर नावाच्या नवीन चित्रपट दिग्दर्शकाकडे साहाय्यक म्हणून दादा काम करू लागले. चित्रपटांची ‘सलगता’ (कंटीन्युइटी) लिहिण्याचे काम करीत असताना दादांच्या हातून सतत चुका व्हायच्या. दिग्दर्शकाची येता-जाता बोलणी खाऊनही दादा या नोकरीत काही काळ तरी टिकले. याच दरम्यान दादांच्या वडिलांचे व पाठोपाठ आईचेही निधन झाले. शिक्षणात रस नसल्यामुळे दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर दादांनी शिक्षणाकडे कायमची पाठ फिरवली. त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या श्रीकृष्ण बँड पथकामध्ये त्यांचे येणे-जाणे होते. बँड पथकाच्या शेजारी असणार्‍या राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्तींचा राबता असे. त्यांना जवळून पाहता यावे म्हणून दादा सेवादलामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही भाग घेऊ लागले. तिथे त्यांची निळू फुले, राम नगरकर यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले.
कलापथक बंद पडल्यावर दादांनी स्वत:च एखाद्या लोकनाट्याची निर्मिती करून ते रंगभूमीवर आणायचे ठरवले. जवळ पैसा नसल्यामुळे, मित्रमंडळींकडून पैसे उसने घेऊन, वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य दादांनी रंगभूमीवर सादर केले. त्यात दादांनी रंगवलेल्या हवालदाराची भूमिका तुफान गाजली. प्रत्येक प्रयोगाला त्या-त्या दिवशी घडलेल्या राजकीय परिस्थितीवर ते विनोदी टीका करत. राजकीय नेत्यांचीही ते खिल्ली उडवत. हजरजबाबीपणामुळे दादांचा प्रत्येक प्रयोग रंगात येई आणि प्रेक्षक हसूनहसून बेजार होत. ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्यामुळे ‘दादा कोंडके’ हे नाव महाराष्ट्रात सर्वतोमुखी झाले. या लोकनाट्यातील दादांची भूमिका पाहून खूश झालेले चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या ‘तांबडी माती’ (१९६९) या चित्रपटात दादांना संधी दिली. आशा काळे, अनुपमा यांच्याही त्यात भूमिका होत्या. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.
‘विच्छा’च्या प्रयोगातून जमलेल्या पैशातून एखादा व्यवसाय करण्याचा दादांचा विचार होता. पण त्याऐवजी चित्रपटनिर्मिती करण्याचा सल्ला भालजींनी दादांना दिला. चित्रपटसृष्टीत नवीन असणार्‍या दादांना, त्या काळातील नामवंत अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तेव्हा दादांनी उषा चव्हाण यांना नायिकेची प्रमुख भूमिका दिली. या चित्रपटाचे नाव होते ‘सोंगाड्या’ (१९७१). गोविंद कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. भालजींच्याच सांगण्यावरून दादांनी अर्धी विजार, गुडघ्यापर्यंत लोंबणारी नाडी, सैल सदरा असा गबाळा ‘नायक’ साकारला आणि तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. ‘सोंगाड्या’ पूर्ण झाला, तरी तो प्रदर्शित करण्यासाठी कोणीच वितरक पुढे येत नव्हता. दादांनी अनेक खटपटी करून पुण्यातील ‘भानुविलास’ चित्रपटगृहामध्ये तो प्रदर्शित केला. प्रेक्षकांना तो चित्रपट एवढा आवडला की, त्याने चक्क रौप्यमहोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ‘सोंगाड्या’ने तुफान यश मिळवले आणि दादा कोंडके नावाचा ‘ब्रँड’च तयार झाला. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर दादांनी ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३), ‘तुमचं आमचं जमलं’ (१९७६), ‘मुका घ्या मुका’ (१९८८) या मराठी व हिंदी मिळून १९ चित्रपटांची निर्मिती करून त्यात भूमिकाही साकारल्या.
चित्रपटात द्य्वर्थी संवाद चपखलपणे वापरण्यात दादा तरबेज होते. या द्य्वर्थी संवादांमुळे दादांचा ‘सेन्सॉर’च्या सदस्यांशी कायमच वाद व्हायचा. अल्पावधीतच दादांनी यशस्वी नायक, निर्माता, दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवले. त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरणसंस्थाही निर्माण केली. दादांनी ‘अंधेरी रातमें दिया तेरे हाथ में’ (१९८५), ‘खोल दे मेरी जुबान’ (१९८६), ‘आगे की सोच’ (१९८९) या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ते स्वत:च नायक होते. ‘चंदू जमादार’, ‘राम राम आमथाराम’ या गुजराती चित्रपटांमध्येही दादांनी नायकाची भूमिका केली. दादांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन कन्नड चित्रपटसृष्टीतले आघाडीचे कलाकार राजकुमार यांनी ‘बंगा वरती पंजरा’ या कन्नड चित्रपटाची निर्मिती करून त्यात मुख्य भूमिकाही केली. महेश मांजरेकर यांचा ‘जिस देशमें गंगा रहता है’ हा गोविंदाची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजे दादांच्या ‘एकटा जीव’चीच हिंदी आवृत्ती होता. राजकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सनदी अप्पण्णा’ या कन्नड चित्रपटावरून दादांनीही मराठीत ‘वाजवू का?’ हा चित्रपट केला. या चित्रपटात दादांनी सनईवादकाची व्यथा मांडणारी गंभीर भूमिका साकारली. चित्रपटाबरोबर दादांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला व ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भाषणे करू लागले. पण त्या क्षेत्रात सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा टिकाव लागला नाही. विनोदसम्राट दादांना शिकारीचाही अतिशय नाद होता. आवतीभोवती माणसांचा गोतवळा जमवून गप्पांच्या मैफली रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता. रिकाम्या वेळात ते पुढील चित्रपटांच्या योजना आखत. अशाच एका नवीन चित्रपटाची तयारी करत असताना मुंबईतील दादर येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.
- अभिजित पेंढारकर



चित्र-चरित्र