चित्र-चरित्र

अशोक सराफ
अशोक सराफ
अभिनेता
४ जून १९४७

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या आहेत. मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात अशोक सराफ यांचे शिक्षण झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. त्यांच्या कारकिर्दीला १९७१पासून सुरुवात झाली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्याचबरोबर काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. ‘हमीदाबाईची कोठी’ हे एक त्यांचे प्रमुख नाटक म्हणावे लागेल. गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘रामराम गंगाराम’मधील म्हमद्या खाटिक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.
मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे. अशोक सराफ यांचा अभिनय बहुरंगी आहे. त्यांनी नाट्य-चित्रपटांतील आपल्या कामाद्वारे केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन घडवले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसारख्या जगन्मान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी ‘पांडू हवालदार’मध्ये दाखवली; तर ‘कळत-नकळत’, ‘भस्म’ यासारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळे पैलू उलगडले. ‘वजीर’ या चित्रपटातून त्यांनी राजकारणी व्यक्तिरेखा हुबेहूब साकारली, तर ‘चौकट राजा’मधील सहृदय व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळवले आहे. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमावेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’ यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर, महेश कोठारे यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘आत्मविश्वास’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’पासून अलीकडच्या ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’, ‌‘नवरा माझा नवसाचा’ व ‘एक शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. व्यावसायिक रंगभूमीवरील ‘मनोमीलन’नंतर अशोक सराफ यांनी ‘सारखं छातीत दुखतंय!’ हे विनोदी नाटक केलं. पत्नी निवेदिता जोशी-सराफ यांच्यासोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ ही मराठी आणि काही हिंदी मालिका बनवल्या. ‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. अशा प्रकारची लोकप्रियता मिळवणारे अशोक सराफ हे बहुधा पहिले मराठी कलावंत ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनित काही उल्लेखनीय चित्रपट. त्याचबरोबर ‘सिंघम’ या चित्रपटातील त्यांची भूमिका हिंदी प्रेक्षकांसाठीही अविस्मरणीय आहे.

मराठी हृदयात मानाचे स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांच्या अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिऍAAटल येथे नुकत्याच झालेल्या ‘बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन - २००७’ येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे राम कार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे. आजपर्यंत ‘फिल्मफेअर पुरस्कार’, ‘महाराष्ट्र शासन पुरस्कार’, ‘महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार’, ‘झी गौरव पुरस्कार’ या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे.

प्रवास (२०२०), मी शिवाजी पार्क (२०१८), हृदयात समथिंग समथिंग (२०१८), शेंटिमेंटल (२०१७) हे अशोक सराफ यांचे अलीकडच्या काळातील काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'वेड' चित्रपटाने २०२३ मध्ये मोठे यश मिळवले.

- मानसी आपटे



चित्र-चरित्र