चित्र-चरित्र

यशवंत दत्त
यशवंत दत्त
अभिनेते
७ नोव्हेंबर १९४५ --- ११ नोव्हेंबर १९९७

महाडिक, यशवंत दत्तात्रेय
आपल्याच कारकिर्दीच्या निरोपाचे दृश्य चित्रित करावे आणि दुसर्‍याच दिवशी आयुष्यालाही पूर्णविराम मिळावा, असे एखाद्या कलाकाराच्या बाबतीत घडणे, हा दैवदुर्विलासच. यशवंत दत्त यांचा अकाली मृत्यू सर्वांना असाच चटका लावून गेला.

यशवंत दत्त यांचे मूळ नाव यशवंत दत्तात्रेय महाडिक. त्यांचे वडील दत्तात्रेय महाडिक उर्ङ्ग मा. छोटू हे प्रसिद्ध कलावंत. ‘प्रभात’ चित्रपट संस्थेत साहाय्यक दिग्दर्शक आणि कलाकारांचे प्रशिक्षक म्हणूनही ते काम करायचे. यशवंत यांच्या आई वत्सलाबाईही चित्रपटसृष्टीत होत्या. पण त्या काळची चित्रपटसृष्टीची अवस्था आणि आर्थिक टक्केटोणपे यांची कल्पना असल्याने, आपल्या मुलाने चित्रपटात येऊ नये, असेच त्यांना वाटत होते. तरीही आईवडिलांकडून मिळालेले बाळकडू यशवंत यांना स्वस्थ बसू देईना. पुण्यात जन्मलेल्या यशवंत यांचे शिक्षण टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कलाकारांचे, भोवतालच्या माणसांचे निरीक्षण करून त्यांच्या हुबेहूब नकला करण्याची कला त्यांनी अवगत केली होती.

वयाच्या पाचव्या वर्षी ‘परीराणी आणि निरुपमा’ या बालचित्रपटात त्यांनी काम केले होते. पुण्यातील राजाभाऊ नातू यांच्या महाराष्ट्र कलोपासक मंडळ या हौशी नाट्यसंस्थेत ते सहभागी झाले होते.

आईवडिलांच्या इच्छेनुसार यशवंत ‘ङ्गिलिप्स’मध्ये नोकरी करू लागले. पण कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. तेव्हा तेथील कामगार नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे त्यांचे ‘उद्योग’ सुरू झाले. मधुकर तोरडमल यांच्या ‘भोवरा’ या नाटकात त्या वेळी त्यांनी काम केले. त्यांनी अनेक कामगार नाट्यस्पर्धा गाजवल्या. ‘नाट्यमंदार’ या संस्थेत अभिनयाचीच नोकरी मिळाल्यानंतर ‘ङ्गिलिप्स’मधली नोकरी त्यांनी सोडून दिली. तेंडुलकरांच्या भल्याकाकामध्ये त्यांनी नाट्यमंदारच्या नाटकांत भूमिका केली. ‘गरिबी हटाव’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यांना दत्ता भट हे गुरू म्हणून लाभले. मधुसूदन कालेलकरांचे ‘नाथ हा माझा’ हे त्यांचे पहिले गाजलेले नाटक. त्यातील सुभानराव ड्रायव्हरच्या त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ‘नाट्यमंदार’च्याच ‘चांदणे शिंपीत जा’ या नाटकातील त्यांचे काम सुलोचनाबाईंना ङ्गार आवडले. त्यामुळे त्यांनी आग्रह धरून दत्ता माने यांच्या ‘मामा भाचे’ या चित्रपटात यशवंत दत्त यांना काम मिळवून दिले. तेव्हापासून चित्रपट क्षेत्रातील त्यांची घोडदौड सुरू झाली. ‘करावं तसं भरावं’, ‘चांडाळ चौकडी’, ‘भैरू पैलवान की जय’ आदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. ‘भैरू पैलवान की जय’मधून त्यांच्यातील विनोदी अभिनेता आणि नकलाकार प्रेक्षकांसमोर आला. ‘शापित’ या राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी यशवंत दत्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा ‘शिवाजी गणेशन’ पुरस्कारही मिळाला. ‘चानी’, ‘आहुती’ यासारख्या चित्रपटांत थंड डोक्याचा खलनायक आणि ‘पुढचं पाऊल’मधील गरीब, दीनवाणा सासराही त्यांनी त्याच समरसतेने रंगवला. यशवंत दत्त यांनी साकारलेला ‘नटसम्राट’ही दत्ता भट किंवा श्रीराम लागू यांच्याएवढाच गाजला. ‘क्रोध’ या हिंदी चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिकाही त्यांनी केली.

‘जंटलमन’, ‘शिवम’, ‘दूरी’ आदी हिंदी चित्रपटांतही यशवंत दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘धरम’ या चित्रपटात प्राण, डॅनी डेन्झोप्पा यासारखे कलाकार असतानाही यशवंत दत्त यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केली, पण तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत या मराठी कलाकाराचे कर्तृत्व सिद्ध होण्याची एक मोठी संधी त्यांच्या हातून गेली. यशवंत दत्त उत्तम नकलाकार, कवी, गायकही होते. गप्पांच्या मैङ्गली रंगवण्यातही त्यांचा हातखंडा होता. शिक्षण अर्धवट सोडले असले, तरी मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

‘चांडाळ चौकडी’, ‘चानी’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘सासुरवाशीण’, ‘आपली माणसं’, ‘ङ्गटाकडी’, ‘हीच खरी दौलत’, ‘सुगंधी कट्टा’, ‘पैज’, ‘सरकारनामा’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘गनिमी कावा’, ‘माझं घर माझा संसार’, ‘शापित’, ‘उनाड मैना’, ‘निष्पाप’, ‘दगा’, ‘झंझावत’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

‘देवाजीने करुणा केली’, ‘गगनभेदी’, ‘कालचक्र’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘श्री तशी सौ’, ‘तू आहेस तरी कोण?’, ‘वादळ माणसाळतंय’, ‘आमच्या या घरात’, ‘वेडा वृंदावन’ या नाटकांत त्यांनी केलेल्या कामांमुळे ही नाटके विलक्षण गाजली. ‘सरकारनामा’ या चित्रपटातील पाताळयंत्री मुख्यमंत्र्याची भूमिका त्यांनी रंगवली होती. या चित्रपटाचा शेवट अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिक्षा झाल्याचे एक दृश्य चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रित करण्यात आले. त्याचे चित्रीकरण पूर्ण करून यशवंत दत्त यांनी रात्री ‘लाख मोलाचा शब्द’ हा एकपात्री प्रयोगही मुंबईत केला. दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांच्या छातीत जी कळ आली, ती या हरहुन्नरी कलाकाराला बरोबर घेऊनच गेली.

संत तुकारामांवर एकपात्री प्रयोग करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती, ती इच्छा अपूर्णच राहिली.

- अभिजित पेंढारकर



चित्र-चरित्र