अतिथी कट्टा

दिनांक : २५-७-२०१८

‌सुधीर फडके नावचं गाणं


२५ जुलै हा सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा जन्म दिवस या वर्षी त्यांची जन्म शताब्दी साजरी होत आहे. श्रेष्ठ संगीतकार, प्रतिभाशाली गायक आणि प्रखर देशभक्त म्हणजे बाबूजी ! गीतकार सुधीर मोघे यांनी रुपवाणीच्या १९९३ च्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख !

——

सुधीर फडके नावाचं ‘रसायन’ कलावंत आणि माणूस या दोन्ही दृष्टिकोनातून साकल्यानं समजून घेणं ही मुळात महाकठीण गोष्ट आहे. मग ते व्यक्तिमत्व शब्दात पकडू पाहणं ही गोष्ट तर दूरच ! तरीही आज तो खटाटोप करायचंय असं ठरवून लिहायला बसलो आहे.
एक गोष्ट निश्चित की सुधीर फडके हे अनेक अर्थांनी एक चालतंबोलतं ‘युग’च म्हणावं लागेल.

कलाक्षेत्रात स्वतःचं ‘घराणं’ निर्माण करणारा प्रतिभाशाली भावगायक, संगीतकार, ध्येयकवी व धाडसी चित्रपट निर्माता, स्वतःचं प्रखर राष्ट्रीय तत्वज्ञान असलेला ज्वलंत सक्रिय देशभक्त आणि या सर्वांपलीकडे उत्कट गुणदोषांनी युक्त असलेला हाडामासाचा लखलखीत व धगधगीत माणूस.. हे सर्व स्वतंत्र संबोधनाचे आणि विवेचनाचे विषय आहेत.

अर्थात, हे सारं खरं असलं तरी आपल्याला जवळचे आहेत ते गीतसंगीताशी नातं असेलेले सुधीर फकडे ! सुमारे १९४०-४५ पासून म्हणजे उणंपुरं अर्धशतक त्यांची ही अदभूत वाटचाल चालू आहे आणि तीही यशाची कमान सतत चढती ठेवत ! आज ७५ वर्षांच्या वयातही प्रयोगशील संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रज्ञा सतेज आहे आणि पाच – दहा हजारांचा श्रोतृसमुदाय एका जागी खिळवून ठेवण्याइतकी त्यांची गायनप्रतिभा सशक्त आहे.

संगीताची कसलीही पूर्वपरंपरा नसलेल्या या राम फडकेंच्या गळ्यावर शास्त्रोक्त संगीताचे पहिले संस्कार झाले ते कोल्हापूरच्या पाध्येबुवांकडून ! पण ही बैठक त्यांच्या उभ्या आयुष्याला पुरून उरेल इतकी भक्कम ठरली. मग नशीब काढायला मुंबईत आल्यावर दुर्दैवाचे अनेक दशावतार पाहत पोटासाठी त्यांना एक बाज्याची पेटी घेऊन जी भारतभर भ्रमंती करावी लागली ती एक अनियोजित तपश्चर्याच ठरली.

संगीतकार म्हणून त्यांची प्रतिभा पोसली गेली ती या काळात त्यांनी जोपासलेल्या श्रवणभक्तीतून ! त्यांच्यामधला आजचा खंदा ‘परफॉर्मर’ हळूहळू घडत गेला तो याच काळातल्या त्यांच्या असंख्य बऱ्यावाईट मैफिलींतील अनुभवांतून आणि त्यांच्यामधला लढाऊ अशरण पिंड तावून सुलाखून निश्चित होत गेला तो त्या काळातल्याच त्यांनी सोसलेल्या परिस्थितीच्या दारूण आणि दाहक चटक्यांतून !
त्या भ्रमंतीमध्येच कलकत्त्याच्या एका रेकॉर्ड कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. तिथंच ते स्थिरावण्याची लक्षण स्पष्ट होती. पण मराठी चित्रपट व भावसंगीताच्या सुदैवानं तस झालं नाही. सुट्टी काढून घरी यायचं म्हणू कोल्हापूरला आलेले असतानाच एका प्रदीर्घ आजारानं त्यांना गाठलं. कलकत्त्याचे परतीचे दरवाजे बंद झाले. पुन्हा नव्यानं सुरु झालेल्या धडपडीत सोळांकूरकर मास्तरांच्या मेळ्यांतून गायला, चाली द्यायला सुरुवात झाली आणि याच प्रवासात ‘सुधीर फडके’ या नव्या अवताराचा जन्म झाला. इथंच नशीब काढायला आलेल्या एका कवीच्या रुपानं एक शुभंकारी जन्मगाठ बांधली गेली. कविराज ग. दि. माडगूळकर आणि मग आजच्या आवडत्या परिभाषेत सांगायचं तर ‘त्यांनी त्यानंतर मागे वळून पहिलेच नाही’. ‘सावळाच रंग तुझा’, ‘गोकुळीचा राजा माझा’ ही माणिकबाईंची गाणी ही सुधीर फडक्यांच्या कारकिर्दीची तशी सलामीची गाणी म्हणता येतील… पण आज १९९३ मधलीही त्यांची मराठी जनमानसावरची पकड पहिली की हे शब्द आणि सूर चार दशकांपूर्वीचे आहेत या बोलीवर विश्वास ठेवायला जड जात. सुधीर फडक्यांच्या स्वररचनांमधली ‘ताजगी’ हे त्यांचे वैशिष्ट्य असं आणि आरंभापासूनचं आहे.

एचएमव्ही रेकॉर्डिंग कंपनी, आकाशवाणी याबरोबरच चित्रपटसृष्टीची दार उघडली जाणं हे ओघानं आलंच. प्रभातच्या आगे बढो, गोकुळ का चोर, रुक्मिणी स्वयंवर (स्नेहल भटकरांच्या भागीदारीतला) हे फडक्यांचे पहिले चित्रपट. पण मराठी चित्रपटात जे ‘फडके युग’ म्हणून मानलं जात ते ‘वंदे मातरम’ या चित्रपटापासून.

मराठी चित्रपटांच्या आरंभापासून गोविंदराव टेंबे थेट उपशास्त्रीय नाट्यसंगीताच्या वळणाचे. मा. कृष्णराव अधिक प्रासादिक, मधुर तर केशवराव भोळे कवितेच्या, भावगीतांच्या अधिक जवळ जाणाऱ्या चाली बांधणारे आणि मुख्यतः चित्रपटमाध्यमाची आणि साहित्याची खूप डोळस जाण असणारे ! सुधीर फडके हे या सर्वांचं मर्म जाणणारे तरीही त्यांच्या काळाच्या दृष्टीनं खूप आधुनिक व ताजे होते. साहजिकच त्यांच्या आगमनानं मराठी चित्रपट संगीताचा प्रवाह मूळ तत्व हरवू न देता पण जणू कात टाकावी तसा नवीन झाला.
१९४८ ते १९८८ या प्रदीर्घ कालखन्डातले वंदे मातरम, सीता स्वयंवर, मायाबाजार, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, मुंबईचा जावई, शापित असे मोजके चित्रपट आणि त्यातली अवीट गाणी नजरेसमोर आणली तर सुधीर फडक्यांच्या दिमाखदार संगीतयात्रेची क्षणार्धात चुणूक मिळून जाते. १९४८ मधल्या ‘मनोरथ चल त्या नगरीला’ पासून १९८८ मधल्या ‘दिस जातील, दिस येतील’ पर्यंतचा गीतप्रवास म्हणजे कोवळेपणाहून परिपक्वतेकडे जाणारी सुरेल वाटचाल आहे.

सुधीर फडक्यांच्या स्वररचनांमधल्या वैशिष्ट्यांचा विचार करू लागलं की अनेक गोष्टी नव्यानं जाणवू लागतात. एक म्हणजे त्यांच्या चालींमधला साधेपणा ! ‘प्रासादिकता’ हा शब्दही जिथं अवघड आणि अवजड वाटेल इतका अपरंपार साधेपणा! पण तो साधेपणा म्हणजे सर्वसामान्य सोपेपणा नव्हे. त्यांच्या स्वररचनांमधून खेळणारी लयकारीची जाणीव त्यांची एक फार विलोभनीय गोष्ट आहे. कारण ही लयकारी मागच्या हिशेबातून येणारी लयकारी नव्हे तर ती बोलू लागते कवितेच्या शब्दांच्या भानातून… त्या शब्दांच्या अर्थाच्या आणि वजनाच्या सूक्ष्म जाणिवेतून ! त्यामुळं त्यांच्या चाळीमधले स्वर ‘शब्दांनो, मागुते या’ म्हणत उद्दामपणे पुढं जात नाहीत तर स्वतः शब्दांचा मागोवा घेत मागुते जात राहतात.

पण तरीही ते केवळ शब्दांच्या अर्थाचं ओझं वाहणारे किंवा शब्दांच्या प्रकाशात चाचपडणारे नसतात, त्यांना त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो आणि शब्दातील अर्थही. ‘लाखाची गोष्ट’ मधलं ‘सांग तू माझा होशील का’ हे एकच गाण अभ्यासलं तरी सुधीर फडक्यांच्या स्वररचनेतल्या अनलंकृत सहज सौंदर्याचा साक्षात्कार घडतो. ‘सांग तू’ या शब्दांना जोडून येणारा उकारात्मक आलाप किंवा ‘वसंतकाळी वनी दिनांन्ती’ नंतर हलकीशी चटका लावून जाणारी चिमणी स्वरावली हे केवळ शब्दांना जोडणारे पूल नव्हेत. जगातल्या चिरंतन प्रेमभावनेने ते कोवळे आविष्कार वाटू लागतात.

त्यांच्या स्वररचनेला एक नेटका आकृतिबंध असतो. ‘बंदिश’ या शब्दामध्ये अभिप्रेत असलेली डौलदार सुबद्धता आणि सुसूत्रता त्यामधून जाणवत राहते. पण म्हणून ती डोळ्यांत तेल घालून आखून रेखून काढलेली नक्षीची वाटत नाही. फुलाच्या उमलण्यामागे असणारेही एक प्रसन्न अहेतुकता त्या स्वरांतून झंकारत असते.

त्यांच्या स्वररचनांचं ‘बहुरूपीपणा’ ही अशीच एक लक्षणीय गोष्ट ! अभंग, भजन, विराणी, भावगीत, सुगम, शास्त्रीय, ग्रामीण, शहरी, हळुवार, आवेशपूर्ण, नाट्यमय या आणि अशा सर्व प्रकारच्या रूपांमध्ये सहजपणे संचार करणाऱ्या त्यांच्या स्वररचना हा एक स्वतंत्र अनुभव आहे.

‘प्रभातसमयो पातला’ किंवा ‘ज्योती कलश छलके’ सारखी भूपाळी, ‘झाला महार पंढरीनाथ’ , ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ सारखी रांगडी भजनं, ‘तुझे रूप चित्ती राहो’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘समचरण सुंदर’ सारख्या सुसंस्कृत सात्विक चाली, ‘प्रथम तुज पाहता’, ‘आज कुणीतरी यावे’, ‘सासूऱ्यास चालली लाडकी शकुंतला’, ‘गुरु एक जगी त्राता’ यासारख्या सुगम शास्त्रीय रचना, ‘जाळीमंदी पिकली करवंद’ मधलं अस्सल मराठमोळेपण, ‘असेल कोठे रुतला काटा’ मधला पंजाबी ‘हिर’ सारखा बेमालूम बाज, ‘काहो धरिला मजवर राग’ मधली बैठकीची नखरेल अदा.. अशी वानगीदाखल उदाहरण मोजायची ठरवली तर तमाम मराठी रसिकतेचा हातापाण्यांची बोट एकत्र करावी लागतील.

सामान्यपणे एखाद्या चित्रपटातलं एखाद दुसरं गाण गाजल तरी संबंधितांचे हात (आपापल्या कल्पनेतल्या ) स्वर्गाला पोचतात. इथं पाहावं तर चित्रपटातील एकरकमी सर्व गाणी गाजण्याचे अनेक विक्रम सुधीर फडक्यांनी वारंवार केले आहेत आणि स्वतःच ते मोडले आहेत. (विशेषतः त्यांच्या आरंभीच्या पूर्वप्रकाशित कालखंडात !) सीता स्वयंवर, मायाबाजार, पुढचं पाऊल, वंशाचा दिवा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी…. ही अधिक विचार न करता ओठावर येणारी नावं !
पूर्वसुरींच्या संस्कारांचा प्रभाव ही कुणाही कलाकाराबाबतीत अटळ गोष्ट असते. अभिजात कलाकारांमध्ये ते संस्कार खूपदा वरच्या थरावर जाणवत नाहीत. पण ते त्याच्या आत खोलवर मुरलेले असतात आणि बाहेर व्यक्त होताना ते त्याचे होऊन प्रकट होतात. सुधीर फडके याला अपवाद नाहीत. त्यांच्यामध्ये मुरलेली बालगंधर्व गायकी विशेषतः त्यांचा आवडता भीमपलास ते मांडू लागतात तेंव्हा त्याहून नकळत त्यांचे आवडते बालगंधर्वही कुठे कुठे डोकावू लागतात खार बालगंधर्वांची बांधलेली त्यांची एक चाल ‘शरण शरण नारायण’ नीट ऐकली तर मी काय म्हणतो ते नेमकं कळेल.

‘हा माझा मार्ग एकला’ हे गीत ऐकताना ‘दुःख के अब दिन बीतत नाही’ गाणाऱ्या सैगलची एक धूसर छाया मागे साकार होऊ लागते. त्या गाण्याच्या म्युझिकल ट्रीटमेंटमध्ये आणि गायकीमध्येही ! ती सैगलची नक्कल नक्कीच नव्हे. पण सुधीर फडक्यानं संगीतकार आणि गायक म्हणून जाणवलेल्या सैगल गायकीचा तो मराठी आविष्कार नक्कीच भासतो.

सुधीर फडक्यांची ‘गायकी’ हा पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. एरवी बऱ्याचदा बहुतेक संगीतकारांना त्यांच्या प्रतिभेने कितीही अप्रतिम स्वररचना केली तरी ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कुणातरी गळ्यावर अवलंबून राहावं लागत. दिग्दर्शक, अभिनेता हा जसा दुर्मिळ भाग्ययोग, तसाच संगीतदिग्दर्शक गायक हाही ! सुधीर फडक्यांच्या कलाकार कुंडलीत तोही योग्य त्यांना लाभला. त्यामुळेच योजलेल्या गायक गायिकेकडून आपली स्वररचना आपल्याला हवी तशीच गाऊन घेणं हे त्यांना आयुष्यभर शक्य झालं. शिवाय ते स्वतः मराठीचे एकमेव पुरुष पार्श्वगायक म्हणून प्रदीर्घ काळ उभे राहिले ते वेगळेच!

कै. भास्करराव धारपांची मराठी चित्रपट संगीताची अप्रतिम सूची पाहताना एक गमतीदार गोष्ट जाणवते की १९४८ – ५० पासून जवळजवळ १९७० पर्यंत सुधीर फडके मराठीचे आघाडीचे संगीतकार म्हणून दिसतातच. पण त्यांचं संगीत नसलेल्या चित्रपटांतून (काही अपवाद वगळता) पार्श्वगायक म्हणून त्यांची उपस्थिती असतेच. पुन्हा त्यांच्या गायनशैलीचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की याहून काही वेगळ्या शैलीं गाता येऊ शकत हा विचारच या काळात जणू नाहीसा झाला होता. सर्व थरांवर केवळ सुधीर फडक्यांची गायकीच बर्ऱ्यावाईट पद्धतीनं ओसंडून वाहत होती. (या मंडळींनी स्वतःच आणि खुद्द फडक्यांचाही एकाअर्थी नुकसानच केलं, ते एक सोडा !) अरुण दाते, रवींद्र साठे आणि सुरेश वाडकर हे माझ्या स्मरणाप्रमाणे पहिले गायक, जे या प्रभावापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होऊ लागले. या प्रभावापासून संगीतकार व गायक म्हणून पूर्णपणे मुक्त असलेली दोनच नाव सांगता येतील. एक भावसंगीतातल्या पुढच्या युगाचे प्रवर्तक हृदयनाथ मंगेशकर आणि दुसरा खुद्द फडक्यांचा सुपुत्र आजचा संगीतकार गायक श्रीधर फडके.

सुधीर फडक्यांच्या गायकीची वैशिष्ट्येही बुद्धीला चालना देणारी आहेत. तस पाहिलं तर त्यांचा आवाज फार उच्च प्रतीचा आहे असं नाही. महंमद रफी, रामदास कामत किंवा हृद्यनाथ मंगेशकर याना जशी मुळातच आवाजाच्या श्रीमंतीची देणगी आहे तशी सुधीर फडक्यानं नाही. पण मिळालेल्या आवाजाचा डोळस वापर करण्याचं तंत्र विचारपूर्वक आत्मसात करून त्यांनी त्यात जी जादू निर्माण केली आहे तिची मोहिनी मराठी रसिक मानांवरून कधीच ओसरणारी नाही. हवा तेंव्हा ख्याल गायकीचा बाज आणि हवा तेंव्हा हळुवार हलकेपणा व्यक्त करण्याची त्या आवाजाची क्षमता अभ्यासनीय आहे. तसा त्यांचा गळा लवचिक आहे. आज या वयातही त्यांच्या गळ्यातली फिरत पाहण्यासारखी आहे. पण त्यातून निघणाऱ्या जागा लयीच आणि कवितेच्या अर्थाचं भान सोडून कधीही ते निघू देत नाहीत ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओतला ‘माईक’ आणि खुल्या मैदानातल्या उघड्या व्यासपीठावरचा ‘माईक’ या दोघांनाही ज्या आत्मविश्वासानं ते सामोरे जातात तो आत्मविश्वास त्यांच्या तंत्रांच्या हुकुमतीतून आणि प्रदीर्घ तपश्चर्येतून त्यांना साध्य झालेला आहे. पाहिजे तेंव्हा आवाज त्यांच्या पूर्ण सामर्थ्यानिशी खुला वापरायचा पण त्यातला गोडवा आणि ओलावा कणभरही ओसरू द्यायचा नाही आणि काही वेळा हलक्या फुंकरीसारखा तो हळुवार करायचा पण दुबळा किंवा अशक्त वाटू द्यायचा नाही, हे विशेषतः पार्श्वगायनातंल फार मोठं आव्हान असत. महम्मद रफीचा ‘तुझसे कहू एक बात पर ऐसे हलके हलके’, लताच ‘हर आंख इश्कबार है’ आणि सुधीर फडक्यांचं ‘अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले’. ही गाणी या दृष्टिकोनातून श्रवणीय आहेत.
सुधीर फडक्यांची ‘सुसंस्कृत’ वाणी आणि त्यांचे सुस्पष्ट मराठी शब्दोच्चार हे एक त्यांचं शक्तीस्थान ! विशेषतः त्यांचा पोटफोड्या ‘ष’ चा निर्मळ उच्चर केवळ त्यांनीच करावं इतका देखणा असतो.

त्यांचे उच्चार पूर्णपणे ‘स्वाभाविक’ आहेत असं म्हणता येणार नाही. अक्षरांवर खूपदा ते अनावश्यक जोर देतात, प्रत्येक शब्दाखाली ठळक रेघ द्यावी तसे त्यांचे उच्चार असतात इ. आक्षेप त्यांच्यावर येऊ शकतात. पण त्यामागचा, कविता श्रोत्यांपर्यंत नीट पोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक (आणि एरवी दुर्मिळ असलेला) आग्रह लक्षात घेतल्यावर ती घटकभर अस्वाभाविकता क्षम्य वाटते. शिवाय त्या ऊच्चारांना लगडलेली उत्कटता विसरून चालणार नाही. ‘धुंद येथ मी स्वैर झोकतो मद्याचे प्याले’, या गाण्यातले विशेषतः व्यंजनांचे उच्चार या दृष्टीनं आठवून पाहावेत. याखेरीज त्यांच्या गायकीचा एक फार मोठा विशेष म्हणजे त्यांचं, गीताच्या भावनेत ‘चिंब’ होऊन गाणं ! इथं ‘चिंब’ हा शब्द फार निश्चित अर्थानं वापरला आहे, त्यामुळे त्यांच्या भावगायकीची जात ही ‘मेलोड्रामा’च्या जवळची आहे हेही इथं सुचवायचं आहे. कुंदनलाल सैगलची, लता मंगेशकरांची संयत वेदना इथं कमी दिसते, पण तरीही त्या गायकीचा पडणारा जबरदस्त प्रभाव नाकारून चालणार नाही. ख्याल संगीतात सर्व थरातल्या श्रोत्यांवर गारुड करणाऱ्या पं. भीमसेन जोशींच्या गायकीला जे स्थान आहे, ते स्थान सुगम संगीतात सुधीर फडक्यांच्या गायकीला द्यायला हवं.

या सर्व विशेषांचा एकत्रित परिणाम म्हणजे सुधीर फडक्यांचं गाण हे एक विवक्षित व्यक्तींचं गाण न वाटता ते सर्वार्थानं ‘नायकांच गाणं’ वाटतं. सुधीर फडक्यांची गाणी ऐकताना त्यामागचा गायकाचा चेहरा पाहता पाहता विरून जातो आणि त्या त्या गीतातल्या भावार्थाचा एक अनाम चेहरा हलके हलके साकारू लागतो हे त्यांचं ‘अजोड पार्श्वगायक’ होण्यामागचं फार महत्वाचं कारण आहे. एका सुवर्णकाळात हिंदी चित्रपटसृष्टीत तलत महमूद, महम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार , किशोर कुमार इतके नायकांचे आवाज होते. त्याच समांतर काळात मराठी चित्रसृष्टीत सुधीर फडके हा एकमेव नायकाचा आवाज अधिराज्य गाजवीत होता आणि सुरेश वाडकरचा एक सन्मान्य अपवाद वगळत त्याला समर्थ पर्याय आजही अस्तित्वात नाही. चित्रपटसंगीत आणि खाजगी भावगीतांचं विश्व् यामध्ये केलेली एवढी दणदणीत कामगिरीही अपुरी पडली म्हणून की काय त्यांच्या शिरपेचात आणखी एक पीस खोवलं गेलं. -‘गीत रामायण’ !
कवी ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके हे मराठी जाणकार रसिकांच्या अंतःकरणात त्यांच्या चित्रगीतांमुळं स्थिरावले होतेच. पण ‘गीत रामायणा’नं सर्व थरांतल्या सर्वसामान्य आबालवृद्धांच्या अस्तित्वाचंच ते जणू एक अविभाज्य अंग बनून गेले. ‘गीत रामायणा’चं काव्य हा जसा एक शोध प्रबंधाचा विषय आहे, त्याचप्रमाणे ‘गीत रामायण’चं संगीत हाही आस्वादाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. भारतीय रागदारी संगीताची एक भक्कम बैठक सुधीर फडक्यांनी ‘गीत रामायण’ ला दिली आहे. ‘गीत रामायण’ मधील काव्य स्वरबद्ध करणं ही एरव्ही ही भावगीत संगीतबद्ध करण्यापेक्षाही अधिक अवघड गोष्ट होती. गीतांच्या आकृतिबंधाला अपरिहार्यपणे पडणाऱ्या मर्यादा संगीत दिग्दर्शकाची कसोटी पाहणाऱ्या होत्या. बारा – बारा, तेरा – तेरा अंतरे असलेली आणि संस्कृतप्रचुर शब्द भरपूर प्रमाणात खेळवलेली ती गाणी अर्थवाही स्वरांच्या जोडणीनं प्रवाही आणि प्रभावी करणं ही नितांत अट होती. आणि हे सार प्रतिभावंतांचा मूड आणि ध्वनिमुद्रणाचं काटेकोर वेळापत्रक हे सारं सांभाळून पार पाडणं हेही एक ‘दिव्य’ होत. पण सारं काही जणू आपसूक घडत गेलं. मराठी भावसंगीताच्या विश्वात एक इतिहास घडला.

पण तेवढ्या श्रेयावरच समाधान मानून निवांत जगातील तर ते सुधीर फडके कसले ? व्हायोलिन वादक सहकारी प्रभाकर जोग आणि तबलावादक अण्णा जोशी याना बरोबर घेऊन ‘गीत रामायण’चे एका परिन ‘वन मॅन शो’ त्यांनी सुरु केले आणि ‘झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याला सूर भावमाधुर्याला आला महाराष्ट्री महापूर’ या कविरायांच्या काव्यपंक्ती साक्षात खऱ्या केल्या.

वंदे मातरम, सीता स्वयंवरपासून गीत रामायणापर्यँतचं हा प्रवास पाहताना एक जाणवत की कविराज माडगूळकरांचे शब्द आणि फडक्यांचे सूर यामध्ये कुठले तरी ‘जन्मांतरीच नातं’च असलं पाहिजे. एरवी या दोघांच्या व्यक्तिमत्वात कसलंही साधर्म्य नव्हतं. दोघांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनात फरक होता. दोघांच्या राजकीय विचारप्रणाली आणि निष्ठा भिन्न होत्या. दोघांचे ‘इगो’ नको इतके प्रखर होते. ‘चॉईस’ हाती असता तर एकमेकांवर स्वतःला न लादणच अशा माणसांना अधिक मानवणार असत. पण शब्दस्वरांच्या या अजब सायुज्यानं त्यांना आयुष्यभर एकेकांशी जखडून ठेवलं. अरविंद गोखल्यांची ‘सयामी जुळ्या’ विषयी एक सुंदर कथा आहे. ग. दि. माडगूळकर आणि फडके हे कलाक्षेत्रातलं असत एक ‘सयामी जुळं’ होतं असं मजेनं म्हणता येईल.

शालेय वयापासूनच मी गायक संगीतकार सुधरी फडक्यांचा आधी मनस्वी भाबडा आणि नंतर डोळस निःसीम चाहता. मग थोडासा त्यांचा कलव्य कलाकार, पुढं जोडीनं कामाला बसणार कवी गीतकार आणि नंतर त्यांच्या घरचाच होऊन गेलेला सुहृद अशा विविध भूमिकांतून बाबूजींना मी पाहत आलो आहे. गेल्या काही वर्षांत तर खूप जवळून ! आणि त्यांच्या खूप सोप्या आणि खूप अवघड व्यक्तिमत्वाविषयी एक गूढ वाढत आकर्षण जोपासत आलो आहे. त्यातली काही निरीक्षणं मोजक्या शब्दांत मांडायची झाली तर…. मराठी भावसंगीतात एक युग निर्माण करणाऱ्या या माणसाच्या आयुष्यात वरकरणी तरी संगीताला पाहिलं प्राधान्य दिसत नाही. कवितेच्या ओढीनं गीत शोधत राहून आणि तशाच अनामिक ओढीनं ती स्वांतःसुखाय स्वरबद्ध करणं ही घटना चुकूनही त्यांच्या दिनक्रमात पाहायला मिळत नाही.

व्यवसायाचा किंवा कामाचा भाग म्हणूनच ते संगीत दिग्दर्शनाकडे वळताना दिसतात. त्यांची चाल लावण्याच्या बैठकीची प्रक्रियाही वरवर पाहता खूपशी कोरडी आणि यांत्रिक वाटते. त्यासाठी काही वेगळ्या एकात्मतेची, एकाग्रतेची त्यांना गरजही वाटत नाही. त्यांच्या संघर्षमय आयुष्यातच संगीत दिग्दर्शनाचा काम चालू राहिल्यानं असं झालं असेल का ? आयुष्यातले संघर्ष हे नियतीनेच लिहिले असले तेही संघर्षमय परिस्थिती स्वतःहून पुनःपुन्हा चालत जण हा या माणसाच्या रक्तातल्या ओढीचाच भाग नसेल का ? चित्रपटनिर्मितीचे अंगावर घेतलेले प्रकल्प, दीव दमन मुक्ततेपासून मोहन रानडे सुटका आणि परवाच्या अयोध्येच्या राम मंदिर सत्याग्रहा पर्यंत त्यात जातीनं सहभागी होण्याचा अनावर अट्टहास.

मराठी चित्रातट महामंडळासारख्या संस्थांचं धुरीणत्व करून अमेरिकेतला पहिला मराठी चित्रपट महोत्सव करण्यामागची जिद्द.
अशा अनंत व्याप्त स्वतःला आजन्म गुंतवत ते संगीत देत राहिले. गात राहिले आणि तरीही काळावर आपली नाममुद्रा उमटवत गेले. पण एक खरं, हा पुरुष त्याहून फार कणखर आहे मुख्यतः ‘कमिटेड’ आहे. तो एकतंत्री नेता आहे आणि साधा स्वयंसेवकही आहे…….
त्यांच्या आचार विचारात म्हंटल तर खूप विसंगती आहेत. विचारात एक प्रकारचा एकारलेपणा आहे. त्यांच्यात महत्वाकांक्षी झुंजार जिद्द आहे, तसा प्रसंगी अपरिपकव स्वप्नाळूपणा आहे. एक वत्सल वडीलधारे आहे आणि एक हट्टी मूलंही !
पण या सर्वांपलीकडे एक वस्तुस्थिती उरतेच आपल्याला उदंड, निर्मळ कलानंद देणाऱ्या आणि स्वतःच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण आणि क्षण कामाला लावणाऱ्या या मानवी माणसावर आपण प्रेम करतो . एकदा हे शब्द ओठावर आले की बोलायला काही उरतच नाही.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया