अतिथी कट्टा

दिनांक : १०-१०-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…


मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात काही वेगळे विषय हाताळले जात असले तरी काही निर्माते-दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनोरंजनालाच प्राधान्य देऊन चित्रपट बनवीत आहेत. ‘शुभ लग्न सावधान’ हा त्यापैकीच एक चित्रपट. पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त सुर्वे यांचं हे मनोगत.

——

‘शुभ लग्न सावधान’ हा माझा दुसरा चित्रपट आहे. या आधीचा माझा पहिला चित्रपट होता तो ‘श्री पार्टनर’. विख्यात साहित्यिक व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला होता. मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, आनंद इंगळे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. सुबोध आणि श्रुती ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र येत आहेत. या चित्रपटामधील नायक-नायिकेचा वयोगट हा तिशीच्या जवळपास होता. म्हणून या दोघांची आम्ही निवड केली. तसेच रुपेरी पडद्यावरची ‘प्लेझंट जोडी’ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. लग्नसंस्थेवरचा हा चित्रपट होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला सुरुवातीलाच हा चित्रपट हिंदी चित्रपटासारखा दिसावा अशी अट घातली होती. ही अट मी स्वीकारली नि या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मग आम्ही कसलीही तडजोड केली नाही.

अभिनयापासून ते इतर सर्व विभागांसाठी नावाजलेली मंडळी आम्ही निवडली. एवढ्या मोठ्या ‘स्टारकास्ट’ला घेऊन हा चित्रपट पूर्ण करणं हे खरोखरीच खूप अवघड काम होतं. परंतु, सर्वांच्या सहकार्यामुळे हे आव्हान मी पेलू शकलो याचा मला आनंद आहे. हा चित्रपट आम्ही दुबई आणि इगतपुरी या दोन ठिकाणी चित्रीत केला आहे. दुबईची निवड करण्यामागचं कारण म्हणजे कथानकाची गरज. दुबई ही शूटिंगच्या दृष्टीनं अत्यंत महागडी जागा असल्यामुळे चित्रपटाची तिथं गाणी शूट केली जातात. परंतु, आमच्या चित्रपटाचा नायक हा दुबईस्थित असल्यामुळे चित्रपटाचा ३५ टक्के भाग हा आम्ही तिकडे चित्रीत केला आहे. तसेच इगतपुरी हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण असूनही त्याची म्हणावी तशी प्रसिद्धी झालेली नाही. म्हणून आम्ही हे ठिकाण निवडलं. इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो आणि तिथंच आमच्या चित्रपटाचं शूटिंग झालं. इगतपुरीच्या शेड्यूलमध्ये दररोज सगळे कलाकार उपस्थित असायचे. त्यामुळे या दिग्गज कलाकार मंडळींबरोबर काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप काही शिकवून जाणाराही ठरला.

लग्नसंस्थेवर आतापर्यंत मराठी तसेच हिंदीत बरेच चित्रपट आले आहेत. हे सर्व चित्रपट मान्यवरा दिग्दर्शकांनी केलेले असून ते यशस्वीही ठरले आहेत. त्यामुळे आपण नेमकं या चित्रपटात काय करणार आहोत, असा प्रश्न खुद्द मला स्वत:लाही सुरुवातीला पडला होता. परंतु, चित्रपटाच्या ‘स्क्रीप्ट’मध्ये अशी एक गोष्ट आहे की, जी मला काहीतरी वेगळं करण्याची संधी देऊन गेली. या चित्रपटाचा विषय लग्नसंस्थेवरचाच असला तरी त्याच्या कथानकात काहीतरी निश्चितच वेगळेपण आम्ही ठेवलेलं आहे. ‘कम्प्लिट वेडिंग फिल्म’ असं त्याचं स्वरूप आहे. ‘हम आप के है कौन’, ‘हम साथ साथ है’ या ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या चित्रपटांमध्ये अशाप्रकारचे प्रयोग यापूर्वी करण्यात आले होते.

‘फॅमिली एन्टरटेनर’ धाटणीचा हा चित्रपट आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हा एक उत्सव मानला जातो. त्यामुळे तो मोठ्या धुमधडाक्यात आपण साजरा करतो. तसाच आम्ही तो रुपेरी पडद्यावर साजरा केला आहे. तो साजरा करताना आम्ही खूप धमाल केली आहे. त्यामुळे ती पडद्यावर पाहताना प्रेक्षकांनाही आनंद होईल याची मला खात्री आहे. तसेच आनंद, मज्जा, मस्ती याबरोबर लग्न या संकल्पनेबद्दल आम्ही थोडा उहापोहही केला आहे.

– समीर सुर्वे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया