अतिथी कट्टा

दिनांक : ११-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌कलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा

प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘परी हूं मैं’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचा विषय प्रेक्षकांना भावला आहे. कला क्षेत्रात काम करताना लहान मुलांच्या होणाऱ्या गळपेचीबद्दल या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. त्याबद्दल नंदू माधव यांचं हे मनोगत.

——

विषय तेच असतात. परंतु, त्याच विषयाला, त्याच समाजाला, त्याच मानसिकतेला आपण वेगवेगळ्या अंगानं बघत असतो आणि ते बघणं जास्त महत्त्वाचं असतं. हे बघणं खरंच वेगळं वाटतंय का? हा प्रश्न एक कलाकार म्हणून मी स्वत:लाच विचारला. त्याचं उत्तर होकारार्थी आल्यामुळे मी या चित्रपटात भाग घेण्याचा निर्णय घेतला. मुळात मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्याबद्दल समाज अजूनही खूप अनभिज्ञ आहे. मला दररोज अनेकजण भेटत असतात. माझा शेजार-पाजार, नातेवाईकांकडून येणारा मला पहिला प्रश्न म्हणजे, ‘बघा ना आमच्या मुलाला जमतंय का?’, ‘बघा ना त्याच्यावर एखादा क्लिक मारता आला तर…’. शूटिंगच्या निमित्तानं माझी पोलिस किंवा सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर नेहमीच गाठीभेटी होतात. शूटिंग सुरू असतानाच ही मंडळी येतात. खुर्ची टाकून गप्पा मारतात. ‘बघा, आमच्या स्टाफचा एखादा शॉट मारता येतो का…’ थोडक्यात सर्वसामान्य माणसांना या माध्यमाबद्दल अतिशय कुतूहल आहे. आपल्या मुला-मुलींनी सेलिब्रिटी व्हावं असंही अनेकांना वाटत असतं. मला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रोत्साहन मिळालंच पाहिजे. परंतु, त्याच्यामागची ‘प्रोसेस’, तिथं काम करण्यासाठी लागणारी गुणवत्ता, कष्ट याची फारच थोड्या लोकांना माहिती असते. विख्यात अभिनेते नसिरुद्दीन शाह नेहमी सांगतात, की इथल्या रंगाला भुलून जाऊन वर वर काम करण्याचं हे क्षेत्र नाही. या क्षेत्राला स्वत:चं शास्त्र आहे. हे शास्त्र शिकण्यासाठी प्रत्येकाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच दृष्टीनं या क्षेत्राकडे पाहायला हवं.

विशेषत: या क्षेत्रात काम करणाऱ्या लहान मुलांचा विषय तर खूपच गांभीर्यानं पाहायला हवा. या क्षेत्रात आपल्या मुला-मुलीनं पुढं जावं असा आंधळेपणानं विचार करणारे अनेक वडील सध्या आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अशाच एका मुलीची म्हणजे परीची कथा या चित्रपटाला पाहायला मिळते. या चित्रपटात मी त्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. परंतु, केवळ आपली इच्छा मुलांवर लादणाऱ्या या आई-वडिलांची आणि पर्यायानं मुला-मुलींची कशी ससेहोलपट होते, या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. हा विषय दिग्दर्शकानं अतिशय संवेदनशीलरीत्या मांडला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शिलवंत यांच्या कॉलेजच्या ग्रुपनं काही वर्षांपूर्वी एक एकांकिका केली होती. त्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. ही एकांकिका काही माझ्या पाहण्यात आली नाही. ती कधी सादर झाली, याबाबत मला फारशी माहिती नाही. परंतु, ती एकांकिका उत्तम होती, एवढंच माझ्यापर्यंत आलं होतं. या चित्रपटाच्या लेखनावर रोहितनं खूप मेहनत घेतली. या पटकथेचे त्यानं तब्बल १५-१६ ड्राफ्ट्स लिहिले. मला वाटतं, ही मेहनत आवश्यक होती. त्यामागचं कारण म्हणजे एकांकिकेचा जीव हा छोटासा असतो. सुमारे पाऊण तासात एकांकिकेमध्ये तुम्हाला गोष्ट आटोपावी लागते. सिनेमा माध्यमात तुम्हाला गोष्ट खुलवायची अधिक संधी असते. त्यामुळे एकांकिकेचे चित्रपटातलं रुपांतर चांगलं झालंय असं मला वाटतं. हा चित्रपट आजच्या पालक, पाल्यांचं मनोरंजनही करेल आणि त्यांना काय करावं नि काय करू नये, याची जाणीवही करून देईल.

कला क्षेत्रात लहान मुलांनी काम करूच नये असं माझं मत नाही. कारण चित्रपट वास्तवदर्शी होण्यासाठी त्यामध्ये समाजातले सर्व घटक येणं आवश्यकच आहे. एखाद्या गोष्टीत लहान मुलं असतील किंवा एखादं बाळही असेल. तेव्हा तो कथाभाग चांगल्या पद्धतीनं पडद्यावर येण्यासाठी त्या त्या वयाची मुलं-मुली चित्रपटात समाविष्ट केलीच पाहिजेत. परंतु, या क्षेत्रात लहान मुलांच्या कामाबाबतचे नियम पाळले जात नाहीत, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तेव्हा लहान मुलांवर दडपण न येता तयार केलेली नियमावली पाळजी जावी असं मला वाटतं. मी स्वत: या क्षेत्राकडे खूप विचार करून वळलो. तसा विचार इतरांनी केला तर मुलांचं बालपणही हरवलं जाणार नाही. या चित्रपटाचा विषय हा मुंबईतला असल्यामुळे त्याचं शूटिंग इथंच झालंय. मुंबईतील बंगले, रस्ते, चाळी, व्हॅनिटी, स्टुडिओमध्ये हा घटनाक्रम चित्रीत झालाय.

– नंदू माधव

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा


काही निवडक प्रतिक्रिया:

विजयकुमार पांदे

आपल्या अभिनयाचा आणि आपला मी चाहता आहे.आपणास पडद्यावर पहात असताना असे वाटते की तुम्ही आमच्या घरातील एक सदस्य अहात. तुमच्या हसवण्याच्या कलेत अनेक प्रकारचे रंग किंवा छटा यांची जाणीव होते .आशा वेळेस आदरणीय शरद तळवलकर आणि मेहमूद साहेबांची आठवण येते की सदर दोघांच्या नंतर आमचा मराठमोळा विजयदादा पाटकर नावाचा आपला वाटणारा वल्ली आम्हाला लाभला आहे .तुमची अभिनयाची उंची खरोखर उत्तुंग आहे याचा मला अभिमान वाटतो. आता नवीन एप्स मुळे तुमच्या इतर कार्याची ओळख मिळत राहील यात शंका नाही .
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया