अतिथी कट्टा

दिनांक : २-१२-२०१७

‌मुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…


‌गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘इम्तेहान’ या चित्रपटात अक्षय खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा यांच्यासारखे मोठे स्टार्स असतानाही त्यात लक्षात राहिला तो अजय जाधव हा मराठी चेहरा. गेल्या दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत वावरणार्‍या अजयच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी केलेली ही चर्चा.
———-

‘इम्तेहान’ चित्रपट तुम्हाला कसा मिळाला ?

– हिंदी सिनेमाकडे वळताना ‘कास्टिंग डिरेक्टर’ हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. मी तर त्याला देवळातला नंदीच संबोधेन. हे नंदी आहेत मुकेश छाबडा. त्यांच्या टीममधील वैभव या व्यक्तीनं आम्हाला ‘ऑडिशन’साठी बोलावलं. या रोलसाठी मी जवळपास तीन वेळा ‘ऑडिशन’ दिली. एका वेळचा सीन आवडला म्हणून त्यांनी दुसर्‍या वेळी मला दुसर्‍या जॉनरचा सीन दिला. तोही त्यांना आवडला. विशेष म्हणजे या रोलसाठी मराठीमधील इतरही काही नामवंत कलावंतांना ‘ऑडिशन’साठी बोलावलं होतं. त्यातून माझी निवड होणं, ही यशाची पहिली पायरी मानावी लागेल. ‘ऑडिशन’साठी माझ्याकडे जे सीन आले होते, त्यामधूनच मला त्या रोलचं महत्त्व कळलं होतं. लिखाणात अगदी जमलेला असा हा रोल होता. विनोदी नटांचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही जरा जरी डोळे फिरवले तरी तो सीन किंवा व्यक्तिरेखा ‘लाऊड’ वाटायला लागते. त्यामुळे तसं वाटायला नको यासाठी मी अधिक काळजी घेतली. या व्यक्तिरेखेमधील सगळ्या ‘शेड्स’ मी बरोबर पकडायचा प्रयत्न केला. काही प्रसंगांमध्ये मी ‘इम्प्रोव्हायझेशन’ही केले.

या चित्रपटामधील कामाबद्दल तुमच्याकडे कशापद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या?

– ‘तांबे’ या व्यक्तिरेखेला मिळालेला प्रतिसाद हा तर मी कळसच म्हणेन. पहिल्या स्क्रीनिंगच्या वेळी आम्ही पहिल्यांदा सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र भेटलो. तेव्हा इत्तेफाकचे दिग्दर्शक अभय चोप्रा यांच्या आईनं माझी भेट घेतली. त्या मला म्हणाल्या, ‘मला तुमचं नाव ठाऊक नाही. पण मी तुम्हाला ‘तांबे’ या नावानंच ओळखते. तुमचं काम खूपच चांगलं झालंय. त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवलं की, काहीतरी वेगळं आपल्याकडून घडलंय. परंतु, फिल्म स्क्रीनिंगच्या वेळी थोडं भलचंच घडलं. ज्यांनी हा चित्रपट आधी काही वेळा पाहिला होता, तीच मंडळी स्क्रीनिंगला उपस्थित होती. त्यामुळे माझी भूमिका विनोदी पद्धतीची असूनही तसा प्रतिसाद मला पाहायला मिळाला नाही. ‘चांगलं झालंय… चांगलं झालंय…’ असं म्हणत असलं तरी प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही, अशी माझी प्रतिक्रिया होती. परंतु, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून आलेला प्रतिसाद पाहिल्यानंतर मी सुखावलो.

‘इत्तेफाक’मध्ये अक्षय खन्ना, सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा यासारखे नावाजलेले कलाकार होते. त्यांच्यासोबत काम करताना अभिनयाच्या दृष्टीनं काही वेगळेपण जाणवलं का?

– हिंदीमधले कलाकार खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतात. उदाहरणार्थ – दोन पात्रांमधील जर प्रसंग असेल तर एका पात्राचा दुसर्‍या पात्रापर्यंत आवाजही पोचत नाही. आवाजाची पातळी खूप कमी ठेवून ते शूटिंगच्या वेळी आपली संवादफेक करतात. परंतु, आपल्याकडे मराठीत अशा पद्धतीनं काम केलं जात नाही. आपल्याकडे खणखणीत आवाज हेच बलस्थान मानलं जातं. माझं मोठ्या आवाजातील बोलणं या कलावंतांना ‘फनी’ वाटायचं. शूटिंगवेळी आवाजाची एनर्जी न लावता ते डबिंगवेळी लावायचे. शूटिंग सुरू असताना आवाज मोठा ठेवला की तो प्रसंगही ‘लाऊड’ वाटण्याची भीती असते. बराच विचार केल्यानंतर मलादेखील त्यात तथ्य वाटलं.

आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?

– मराठीत मी आतापर्यंत १५ चित्रपट केलेत. २००० पासून माझ्या करिअरची सुरुवात झाली. ‘जाऊ बाई जोरात’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. ते मी पाच वर्षं केले. त्याचे जवळपास बाराशे प्रयोग मी केले. त्यानंतर मी ‘श्यामची मम्मी’ हे नाटक केलं. त्याचे ३५० प्रयोग केले. त्यानंतर मी काम केलेलं ‘पाच पांडवांचा बाप’ हे नाटक फारसं चाललं नाही. त्यानंतर मी मराठीकडून हिंदीकडे वळलो. कारण पाच वर्षं काम करूनही माझ्या कारकिर्दीत असं वेगळं काही घडत नव्हतं. अभिनयाला ‘सॅच्युरेशन पॉइंट’ आला होता. ‘टॅक्सी नं. ९२११’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट. नाना पाटेकर हे माझ्यासाठी अभिनयातले देव आहेत. त्यांच्याबरोबरच माझा हिंदीतला पहिला सीन शूट झाला. त्यानंतर बर्‍याच मी जाहिराती केल्या. ‘पारले मोनॅको’च्या जाहिरातीमध्ये माझ्याबरोबरच भारतीताई आचरेकर आणि किशोरी गोडबोले या दोघी होत्या. विक्रम भटचे काही चित्रपट केले. ‘भूतनाथ रीटन्स’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सीन करण्याचीही संधी मला मिळाली. या कलावंताला ‘लीजण्ड’ का म्हटलं जातं, हे मला तेव्हा अगदी जवळून पाहता आलं. त्यानंतर तीन महिन्यांनी मला ‘शमिताभ’ चित्रपटाच्या ‘ऑडिशन’साठी बोलावण्यात आलं. आर. बालकी यांचा हा चित्रपट होता. त्यात अमिताभ बच्चनही आहेत, हे सुरुवातीला मला माहीत नव्हतं. स्क्रीप्ट हातात पडल्यानंतर मग सगळी माहिती कळली. त्यानंतर तब्बल १२ दिवस मी, अमिताभजी, धनुष आणि अक्षरा असं चौघांनी एकत्र शूटिंग केलं. ते शेड्यूल मी खूप एन्जॉय केलं.


नाटक, चित्रपटांबरोबरच तुम्ही मालिकांमध्येही काम केलं. हा अनुभव कसा होता? तसेच याचवेळी तुम्ही लेखनाकडेही वळलात. ती नेमकी प्रक्रिया कशी होती?

– मधल्या काळात काही हिंदी मालिका केल्या. त्यातली प्रमुख मालिका म्हणजे ‘सजन रे झूठ मत बोलो’. या मालिकेत मी अभिनयही केला आणि संवादलेखनसुद्धा. या मालिकेपासून माझं लिखाण सुरू आहे. ते अगदी योगायोगानंच. मराठी कलाकार म्हटलं की ‘इम्प्रोव्हायझेशन’ हा मुद्दा आलाच. ‘सजन..’साठी मला अभिनेता म्हणून बोलावलं होतं. एका दारुड्याचा सीन होता. तो मी ‘इम्प्रोव्हाइज’ केला. हा सीन मालिकेच्या निर्मात्यांना खूप आवडला आणि त्यांनी मला थेट लेखनाचीच ऑफर दिली. तोपर्यंत मी हिंदी तर जाऊदेच, पण मराठीतही काही लेखन केलं नव्हतं. परंतु, निर्मात्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे मी लिखाणाला तयार झालो. ही गो×ष्ट आहे २०१०ची. त्यावेळी इतर सगळे जण लॅपटॉपवर आपलं लेखन करायचे. माझ्याकडे तेव्हा लॅपटॉप नसल्यामुळे मी कागद-पेनाद्वारे लेखन केलं. दोन एपिसोड मी लिहून दिले आणि त्याच्या मानधनातून मी माझा पहिला लॅपटॉप घेतला. मग मी लिहू लागलो. नंतर मी जवळजवळ दोनशे एपिसोड्स लिहिले. मला लेखन जमलं त्यामागचं कारण म्हणजे माझं भरपूर माझं. मराठीबरोबरच मी हिंदीही खूप वाचतो. हरिशंकर परसाई, भीष्म सहानी, फणीश्‍वरनाथ रेणू हे सगळे लेखक मी वाचले होते. अभिनेता मकरंद अनासपुरेनं मला भरपूर पुस्तकं वाचनासाठी दिली. त्याच्यामुळेच माझा वाचनाकडे अधिक कल वाढला. अभिनेत्याला वाचन हवं. ते असलं की त्याचा कॅनव्हास वाढतो, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे माझं वाचन आजही सुरू आहे. त्यानंतर मी ‘आर.के. लक्ष्मण की दुनिया’, ‘भ से भद्द’ेचे काही भाग लिहिले. राहुल आवटे या माझ्या मित्राबरोबर मी थोडं फार लेखन केलंय. ते अजून बाहेर यायचंय. मराठी आणि हिंदी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद तयार आहे. आता नॅरेशनची प्रक्रिया सुरू करायचीय. राहुलकडून मला स्क्रीन प्ले, संवादलेखनाचं तंत्र शिकायला मिळालं. विशेष म्हणजे मला अभिनय करून जेवढे पैसे मिळाले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमी काळ लेखन करून मिळाले. २०१० मध्ये हिंदी मालिकेच्या एका एपिसोडच्या फक्त लेखनासाठी साडे बारा हजार रुपये मिळायचे. आजही मराठीत एका एपिसोडला कथा-पटकथा-संवाद या तीनही गोष्टी मिळून नऊ हजार मिळायचे. त्यामुळे कधी कधी वाटतं, पूर्णवेळ लेखक व्हावं. परंतु, माझ्यातला अभिनेता मला तसं करू देत नाही.

भविष्यात लेखन, अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाचाही विचार मनात आहे का?

– सध्या ‘सब टीव्ही’वरील ‘आदत से मजबूर’ या मालिकेला मी सहदिग्दर्शक म्हणून काम करतोय. सिनेमा दिग्दर्शित करायचं आहे डोक्यात. काही गोष्टी आहेत मनात. त्याच्यावर चांगला सिनेमा होऊ शकतो. अभिनयात आता मला चांगल्या ‘ऑफर’ यायला हव्यात असं वाटतं. भीष्म सहानी यांच्या ‘धरोधर’वर चित्रपट करायचं डोक्यात आहे. प्रसून पांडेंबरोबर मी नुकतीच एक जाहिरात केली. ‘बालाजी’कडून एका वेबसीरिजसाठी विचारणा झालीय. आता लोक मला सीरियसली घ्यायला लागलेत. पाहूया, कुठंपर्यंत मी पोचतो ते.
———
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया