अतिथी कट्टा

दिनांक : ०८-०५-२०१८

‌गोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी

येत्या ११ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या ‘रणांगण’ या चित्रपटाद्वारे स्वप्निल जोशी खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्तानं त्याची ही मुलाखत.
——

कारकिर्दीच्या या टप्प्यावर तुला नकारात्मक भूमिका का करावीशी वाटली?

– ‘रणांगण’चा दिग्दर्शक राकेश सारंग जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे घेऊन आला तेव्हा पटकथेचं ‘नरेशन’ संपल्यानंतर मी त्यांना एक प्रश्‍न विचारला. ‘सर, या रोलसाठी मी का?’ हा तो प्रश्‍न होता. ‘तुझ्या मनात हा प्रश्‍न आला म्हणून तू.’ असं राकेशजींनी मला त्यावेळी उत्तर दिलं. कारण वाईट माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा आपल्याला त्रास होतोच. परंतु, मनाच्या एका कोपर्‍यात आपल्याला माहीत असतं की तो माणूस तसाच आहे. तो नालायकच आहे. तो वाईटच वागेल. त्यामुळे एका पॉइंटला आपण मानसिकदृष्ट्या तयार होतो, अशाप्रकारच्या व्यक्तीच्या वागण्याला. परंतु जेव्हा चांगला माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा त्याचा धक्का दसपट मोठा असतो. ‘हा असं वागला? ह्यानं आपला विश्‍वासघात केला?’ असे प्रश्‍न आपल्या मनात पडतात. ‘रणांगण’मध्ये मी साकारलेला खलनायक हा अत्यंत चांगला दिसायला आहे. तो अत्यंत गोड आहे. अगदी केसानं गळा कापणार्‍यातला आहे. दिग्दर्शकानं विश्‍वास दाखविल्यामुळे मग मी हा चित्रपट करायला होकार दिला. मग पाठोपाठ सचिनजींची तसेच इतर कलावंतांची निवड झाली.

तुझी भूमिका आवडल्यामुळे चित्रपटाची निर्मिती करण्याचाही निर्णय तू घेतलास का?

– माझ्यासाठी चित्रपटाची गोष्ट हीरो आहे. माझी भूमिका मी कथेच्या दृष्टीनं ‘सेकंडरी’ मानतो. अशाप्रकारच्या धाटणीचा सिनेमा खूप दिवसांनी आला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कथानकाला तेवढ्याच ताकदीच्या निर्मितीची जोड मिळणं गरजेचं होतं. म्हणूनच मी या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या टीममधील एक सदस्य झालो.

ही नकारात्मक भूमिका पडद्यावर चांगल्या पद्धतीनं निभावण्यासाठी त्या पद्धतीचे ‘मॅनेरिझम्स’चा काही अभ्यास तुला करावा लागला का?

– या चित्रपटातील माझ्या व्यक्तिरेखेच्या ‘लुक’वर आम्ही खूप काम केलंय. या भूमिकेच्या तोंडी आम्ही बासरी दिली आहे. त्याला एक वेगळ्या पद्धतीचा ‘विग’ आम्ही दिलाय. या चित्रपटासाठी मी १० किलो वजन वाढवलं आहे. थोडक्यात या व्यक्तिरेखेसाठी मी अंतर्बाह्य बदललोय. आपल्या प्रत्येकामध्ये एक चांगला आणि एक वाईट माणूस दडलेला असतो. मी जर माझ्यात केवळ चांगलाच माणूस आहे, असं म्हटलं तर मी निश्‍चितच खोटं बोलतोय. आपण साधारणपणे आपल्यातील चांगल्या माणसाला जिवंत ठेवतो आणि वाईट माणसाला डोकं वर काढू देत नाही.

या चित्रपटाच्या निमित्तानं मला माझ्यातील वाईट माणसाला काही महिन्यांसाठी का होईना पण भेटता आलं. त्याच्याशी संवाद साधता आला. तसं करताना मला खूप छान वाटलं. चित्रपटामध्ये मी दाखवलेलं रूप खरंच भेदक आहे. या चित्रपटाची ‘ट्रायल’ मी पत्नीला दाखवली. रात्री घरी गेल्यावर तिनं मला बेडरूममध्ये येऊ नकोस. आज बाहेरच झोप, असं सांगितलं. एवढी तिला त्या व्यक्तिरेखेची भीती वाटली होती. वास्तविक माझ्यासाठी ही पावती आहे. ही भूमिका पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर येईल. अख्खा चित्रपट पाहताना प्रेक्षकाला माझ्या भूमिकेबद्दल धक्का बसेल. माझ्याकडे पाहताना त्यांच्या मनात सारखा ‘हा… असा वागला…’, ‘हा… असा आहे…’ असे प्रश्‍न पडतील.

तुला आवडलेले व्हिलनीश रोल्स कोणते?

– खूप आहेत. ‘मि. इंडिया’मधील अमरीश पुरींचा ‘मोगॅम्बो’ मला खूप आवडतो. ‘शोले’तील गब्बरसिंग तर सर्वांचाच आवडता रोल आहे. ते अगदी अलीकडच्या ‘फास्टर फेणे’मधील गिरीश कुलकर्णीनं साकारलेला खलनायक मला खूप आवडला होता. मराठी चित्रपटसृष्टीतली आपल्याला खलनायकांची परंपरा मोठी लाभली आहे. मला आनंद आहे की, एक छोटासा का होईना पण व्हिलन भूमिकांचा खारीचा वाटा माझ्या वाट्याला आला आहे.

अलीकडच्या काळात तू रोमँटिक भूमिकांमध्ये अधिककरून पाहायला मिळाला आहेस. मात्र या चित्रपटाद्वारे तू चाकोरी मोडतो आहेस. गेल्या काही वर्षांच्या तुझ्या रुपेरी पडद्यावरच्या प्रवासाबद्दल तू काय सांगशील?

– मला असं वाटतं की आपण काम करायचं आणि त्याचा आढावा रसिक प्रेक्षकांना घेऊ द्यावा. मीच जर का समजा माझ्या कामाचा आढावा घेत बसतो तर मग प्रत्यक्ष काम कोण करील? वेगवेगळं काम करत राहणं यालाच माझं कायम प्राधान्य राहिलं आहे. काय ‘वर्क’ होईल नि काय नाही, याचा विचार फारसा मी करीत नाही. कारण एखादं काम ‘वर्क’ होईल याचा आपण विचार करायला लागलो की मग ते ‘सेफ’ झोनमध्ये जायला लागतं. त्यामुळे पडद्यावर यापूर्वी एखादं ‘वर्क’ न झालेलं ‘रिस्की’ काम करायला मला जास्त आवडेल. तसं नाही केलं तर माझ्या अभिनेता म्हणून कक्षा कशा रुंदावतील? तसेच एखादी गोष्ट ‘ट्राय’ केल्याशिवाय मला कसं कळणार आहे की, मला हे येतंय किंवा हे येत नाहीय ते. एक अभिनेता म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आत्ता चित्रपटसृष्टीत सगळीकडे वेगवेगळी व्यावसायिक गणितं नि समीकरणं पाहायला मिळतात. असं असतानासुद्धा लेखक-निर्माते माझ्याकडे वेगळे सिनेमे घेऊन येतायत याबद्दल या सर्व मंडळींचा मी खूप आभारी आहे.

सचिनजी आणि तुझ्यामधील वैयक्तिक बॉंड सर्वांनाच ठाऊक आहे. तुमच्या पडद्यावरील ‘ऑन स्क्रीन केमिस्ट्री’बद्दल तू काय सांगशील?

– आमच्या दोघांचं ‘ऑन स्क्रीन’ काम पाहताना प्रेक्षकांना खूप आनंद मिळेल याची मला खात्री आहे. कारण आम्ही दोघांनीही पडद्यावर ज्या व्यक्तिरेखा साकारल्यात त्या आम्हांला अनोळखी होत्या. त्यामुळेच एकत्र काम करताना खूप मजा आली. आमची पडद्यावरील ‘ऑन स्क्रीन’ जुगलबंदी आम्हालाच पडद्यावर खूप भावलीय.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया