अतिथी कट्टा

दिनांक : ३१-०३-२०१८

‌‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आनंदकुमार ऊर्फ अँडी यांनी ‘गावठी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. श्रीकांत पाटील, योगिता चव्हाण, नागेश भोसले, वंदना वाकनीस, गौरव मोरे आदींच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेतच. आर. सिवाकुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला अश्‍विन भंडारे आणि श्रेयस आंगणे यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी दिग्दर्शक आनंदकुमार यांच्याशी साधलेला हा संवाद.
——–

‘गावठी’ या चित्रपटामधून तुम्ही काय सांगायचा प्रयत्न केला आहे ?

– गावठी हा चित्रपट म्हणजे एका ‘कॉमन मॅन’चा प्रवास आहे. हा चित्रपट प्रेक्षकवर्ग जेव्हा चित्रपटगृहात पाहायला येईल, तेव्हा तो या चित्रपटामधील नायकाशी स्वतःला ‘रीलेट’ करील. आपण एखाद्या ‘स्टार’चा चित्रपट न पाहता आपलंच कथानक रुपेरी पडद्यावर पाहतोय, असं त्यांना वाटेल. ‘गावठी’ हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. शाळा-कॉलेज, बस, रेल्वे अशा ठिकाणी अनेकांना हा शब्द म्हणून हिणवलं गेलं आहे. परंतु, ‘गावठी’ म्हणून हिणवल्या गेलेल्यांनी आयुष्यात खूप काही करून दाखवलं आहे. म्हणूनच आम्ही या चित्रपटाची टॅगलाइन ‘अपमान नव्हे अभिमान’ अशी ठेवली आहे. माझ्या दृष्टीनं कोणत्याही व्यक्तीसाठी आत्मविश्‍वास ही खूप मोठी गोष्ट आहे. ती जर तुमच्याजवळ असेल तर मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मविश्‍वास वाढविणार्‍या गोष्टी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

‘गावठी’मधील ‘लव्हस्टोरी’बद्दल काय सांगाल ?

– प्रेम ही अशी भावना आहे की, प्रत्येक टप्प्यावर ती आपल्यासोबत असते. लहानपणी आई-वडिल, भाऊ-बहिणीचं प्रेम आपल्याला मिळतं. ‘टीन एज’नंतरच्या वैवाहिक आयुष्यात आपल्याला जीवनसाथीची मदत मिळते. आपण आपली कारकीर्द घडवीत असताना आपले सहकारी, मित्र आपल्यासोबत असतात. त्यामुळेच आमच्या या चित्रपटामध्ये ‘प्रेम’ या संकल्पनेला खूप महत्त्व आहे आणि खूप प्रेमानंच मी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटामधील नायक श्रीकांत पाटील आणि योगिता चव्हाण हे नवीन आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे.

दिग्दर्शन क्षेत्रात तुम्हाला पदार्पणाची संधी देणारे निर्माते आर. सिवाकुमार यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ?

– विश्‍वास ही खूप मोठी गोष्ट असते आयुष्यामध्ये. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते सिवा सरांनी एक दिग्दर्शक म्हणून माझ्यावर जो विश्‍वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. मला या चित्रपटासाठी जे काही हवं होतं ते त्यांनी मला दिलं आहे.

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोजा यांच्याकडे तुम्ही तयार झाला आहात. त्याचा उपयोग तुम्हाला ‘गावठी’च्या वेळी कसा झाला?
– गेल्या १५ वर्षांमध्ये मी रेमो डिसोजा सरांकडून खूप काही शिकलो आहे. ‘फिल्ममेकिंग’ची प्रक्रिया मी रेमोसरांकडून शिकलो आहे. मला नृत्यात पुढं जायचं होतं. परंतु, माझ्या आई-वडिलांचा त्यास विरोध होता. आई-वडिलांच्या इतर सर्व गोष्टी मी ऐकल्या. मात्र नृत्याबाबत मी स्वतःचं ऐकलं. कॉलेजात जाऊन पुस्तकी शिक्षण घेण्याऐवजी मी अंधेरीला जाऊन रेमोसरांकडे नृत्य शिकलो. रेमोसरांच्या टीममध्ये माझा समावेश झाला तेव्हा मी त्यांचा १२वा सहाय्यक होतो. मला नृत्याशिवाय दुसरं काहीच येत नसल्यामुळे मी त्यांच्याकडे खूप मन लावून काम केलं. त्यामुळेच बहुधा ते मला प्रत्येक गाण्यामध्ये नाचण्याची संधी द्यायचे. त्यापुढे जात त्यांनी मला ‘डान्स इंडिया डान्स’साठी आपला सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी दिली. कायम मला त्यांच्या छत्रछायेखाली ठेवलं. कधीही माझी साथ सोडली नाही. ‘एबीसीडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बनल्यानंतर रेमोसरांनी मला या चित्रपटातील एक गाणं नृत्यदिग्दर्शनासाठी दिलं. ‘एबीसीडी २’साठी मला सहदिग्दर्शक बनवलं. माझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठबळाशिवाय मी हा चित्रपट बनवूच शकलो नसतो. आपल्या वास्तव जीवनात जसे आई-वडील महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणेच ‘प्रोफेशनल’ आयुष्यामध्ये तुम्हाला चांगले गुरू मिळणंही खूप गरजेचं असतं. त्यामुळे रेमोसरांसारख्या गुरूचा आशीर्वाद मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. रेमोसरांकडून मी शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणावाची स्थिती कशी हाताळायची ते. एखादा कठीण प्रसंग माझ्यावर आला की ते मला सांगायचे ‘टेन्शन मत ले…’ त्यांच्या या सांगण्यानं मला आधार यायचा. त्यामुळे हा चित्रपट बनवताना ज्या ज्या वेळी मला अडचणी यायच्या त्या त्या वेळी मी रेमोसरांचा ‘टेन्शन मत ले’ हा सल्ला मनात आणायचो आणि माझ्या मनावरील दडपण खरोखरीच दूर व्हायचं.

या चित्रपटाचे छायाचित्रण खूप चांगलं झालं आहे. त्याबद्दल काय सांगाल ?

– ‘डू नॉट डिस्टर्ब’ चित्रपटाच्या वेळी माझी पहिल्यांदा अजित रेड्डी यांच्याशी भेट झाली. तेव्हा आमचे सूर खूप छान जुळले होते. त्यामुळे आपण कधी चित्रपट दिग्दर्शित केला तर त्याचे सिनेमॅटोग्राफर श्री. अजित रेड्डीच असतील हे मी मनात ठरवलं होतं. त्याप्रमाणे ‘गावठी’चं प्लॅनिंग सुरू असताना मी रेड्डी यांना फोन केला आणि लगेचच त्यांनी हा चित्रपट करण्यास होकार दिला. खरं तर ते आपल्या कुटुंबियांसह हैदराबादला राहतात. मात्र माझा फोन आल्यानंतर ते खास मला भेटायला आले. गमतीची गोष्ट म्हणजे मी त्यांना माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून तुमची मदत मिळेल ना असा प्रश्‍न विचारला. तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं, ‘टेन्शन मत ले.’ अशाप्रकारे माझ्यासाठी हे वाक्य म्हणणारी रेमोसरांनंतर ही दुसरी व्यक्ती भेटली होती. मला आयुष्यात यापेक्षा आणखी काय हवं होतं?

या चित्रपटाच्या संगीताला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली आहे. संगीतावर तुम्ही कसं काम केलंत ?

– या चित्रपटाला श्रेयस आंगणे आणि अश्‍विनी भंडारे यांनी संगीत दिलं आहे. पहिल्यांदा मी श्रेयसना भेटलो. त्यांना चित्रपटामधील गाण्यांचा प्रवास सांगितला. त्यानंतर त्यांनी लगेचच चित्रपटाच्या गाण्याला चाल लावून मला ऐकवली. ती मला एवढी आवडली की मी तेव्हाच सांगितलं की हे गाणं तुम्हीच गाणार. अश्‍विन भंडारे यांच्याबद्दलही नेमकं असंच घडलं. त्यांच्या तोंडून गाणं ऐकल्यानंतर त्यांनाही मी तुम्हीच हे गाणं गाणार असं सांगितलं. चित्रपटाचं संगीत आजच्या पिढीला आवडतंय याचा आनंद आहे. थोडक्यात चित्रपट चांगला झाला असून तो प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया