अतिथी कट्टा

दिनांक :

‘ब्रेव्हहार्ट’- पुस्तक ते पडदा…!

‘ब्रेव्हहार्ट-जिद्द जगण्याची’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे लेखक श्रीकांत बोजेवार यांनी लेखन ते निर्मितीदरम्यानच्या प्रवासाबद्दल केलेलं हे भाष्य….
——–

‘बायोपिक’ हा शब्द अलिकडे परवलीचा झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या, त्यामुळे लोकांना आधीच माहिती असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर बरेच चित्रपट येत आहेत. अशा विषयाचा एक फायदा असा असतो की ती व्यक्ती लोकांना माहिती असते. त्यामुळे चित्रपटाविषयी फार सांगावे लागत नाही. मात्र एक तोटा असा असतो की त्या चित्रपटात काम करणारी व्यक्ती प्रत्यक्षातल्या व्यक्तीसारखी दिसावी, बोलावी यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ‘ब्रेव्हहार्ट-जिद्द जगण्याची’ हा सुध्दा बायोपिक आहे, मात्र या प्रकारच्या फायद्या-तोट्यापासून दूर आहे. कारण निखिल कारखानीस हा मुलगा प्रत्यक्षात होता, तरीही तो फार कमी लोकांना माहिती होता. सामान्य म्हणता येईल अशा निखीलचे आयुष्य आणि संघर्ष मात्र असामान्य होता. त्याच्या आयुष्यावर चित्रपट करण्यासाठी पुढे आलेल्या व्यक्ती या कोणी धंदेवाईक निर्मात्यांपैकी नव्हत्या, तर खुद्द निखीलचे वडिल सच्चिदानंद कारखानीस आणि त्यांचा एक मित्र संतोष मोकाशी. निखील कोण होता, त्याच्यावर चित्रपट व्हावा असे त्याच्या वडिलांना का वाटत होते आणि तो लिहिताना माझ्यापुढे काय आव्हाने होती, हे सांगण्याआधी निखिलविषयी थोडे सांगावं लागेल.
निखिल कारखानीस हा अत्यंत हुशार, लाघवी, आयुष्य समरसून जगू पाहणारा तरुण. ट्रेकिंग, कडेकपारीची भटकंती, खादाडी, संगीत, वाचन, मित्रांचे टोळके यात रमणारा. अत्यंत सुंदर लिखाण करणारा. एका संपन्न आयुष्याची स्वप्ने पाहत असलेला तरुण. वयाच्या १९व्या वर्षी त्याला ‘न्यूरोफायब्रोमॅटोसिस’ नामक मज्जासंस्थेचा विकार दडला. लाखो-करोडोंमधून एखाद्याला होणारा हा विकार. त्यात मज्जासंस्थेवर गाठी येऊन ज्या भागात गाठी येतात तिथला मेंदूशी संपर्क तुटतो आणि हालचाली बंद होतात. या गाठी शरीरभर पसरण्याचा वेग प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत वेगळा असू शकतो. या रोगावर ठोस उपाय कुठेच नाही. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण केवळ एक टक्का. हे सर्व कळल्यावर निखील विलक्षण धैर्याने आयुष्याला सामोरा गेला. २० वर्षे जगला. त्या २० वर्षांतले त्याचे आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण होते. त्यात त्याच्या वडिलांना त्याला धीरोदात्तपणे दिलेली साथ, बाप-मुलाचे एक अत्यंत वेगळे नाते हे कोणत्याही लेखकाला आव्हान वाटेल असेच. आपल्या मुलाने जगण्याला, आयुष्याला दिलेली ही झुंज जगापुढे यावी यासाठी सच्चिदानंद कारखानीस यांची धडपड केवळ सलाम करावी अशी होती. आपल्या मुलाचा सकारात्मक दृष्टीकोन जगाला प्रेरणास्पद ठरावा अशी त्यांची इच्छा.
याची सुरुवात झाली होती, ती निखीलने लिहिलेली पत्रे, त्याच्या मित्रांचे अनुभव, सहकाऱ्यांचे अनुभव, त्याचे कौटुंबिक जीवन या सगळ्याचे संकलन ‘ब्रेव्हहार्ट’ या नावाने पुस्तकबद्ध झाले तेव्हा. राजन मानकामे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने संकलन करून हे पुस्तक केले होते. त्यानंतर रत्नाकर मतकरी आणि माधुरी ताम्हणे यांनी वृत्तपत्रांमधून या बापलेकांच्या आयुष्यावर अत्यंत सुंदर लेख लिहिले. या पुस्तकाला आणि लेखांना मिळालेला प्रतिसाद पाहून हे आणखी लोकांपर्यंत पोचावे असे कारखानीस यांना वाटू लागले आणि

निखिलवर एखादी डॉक्युमेंट्री व्हावी असे त्यांना काहींनी सुचवले. कारखानीस यांचे मित्र संतोष मोकाशी हे मी लिहिलेल्या ‘तहान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दासबाबू यांच्या पत्नीचे जवळचे नातेवाईक. कारखानीस, मोकाशी हे दोघे दासबाबूंना भेटायला गेले. निखिलची कथा ऐकून दासबाबू प्रभावित झाले आणि म्हणाले, ‘डॉक्युमेंट्री का? पूर्ण लांबीचा चित्रपट करू, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. कमीत कमी खर्चात तो होईल हे पाहणे माझे काम.’ दासबाबूंच्या मनात चित्रपटाचा विचार येताच त्यांच्या मनात पहिले नाव माझे येते. माझा चित्रपट श्रीकांतच लिहिणार हे ते जाहीर करून टाकतात. तसे त्यांनी केले. चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना कारखानीस, मोकाशी हे निर्मितीचे शिवधनुष्य पेलायला उभे राहिले.
लेखक म्हणून माझ्यापुढे सगळ्यात मोठे आव्हान हे होते की ही शोकांतिका असूनही ती रडकी होऊ नये. निखील ज्या सकारात्मकतेने जगला ती सकारात्मकता पटकथेत उतरणे. सच्चिदानंद हे अतिशय मीतभाषी. त्यांनी मूकपणे मुलाला दिलेली साथ, त्यांच्या आईने म्हणजे निखीलच्या आजीने निखीलची आई होऊन त्याला दिलेली वात्सल्याची सावली याबद्दल सच्चिदानंदांकडून माहिती काढून घेणं एक आव्हान होते. स्वतःचा त्याग, त्रास याविषयी चकार शब्द न बोलता ते केवळ निखीलविषयी बोलायचे. त्यांच्यासोबत मी अनेक तास बोललो, निखिलचे मित्र, नातेवाईक यांच्याशी बोललो, निखिलची पत्रे वाचली, निखील एका लग्नाला उपस्थित होता, त्याचा व्हिडीओ पाहिला. त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती घेण्यासाठी, उपचारांची माहिती घेण्यासाठी माझा मित्र डॉ. अमोल अन्नादाते याच्याशी वारंवार चर्चा केली. लग्न आणि घटस्फोट हा निखीलच्या आयुष्यातला हळवा, दुखरा परंतु अनिवार्य कोपरा. त्याविषयी चित्रपटात काही येऊ नये असे कारखानीसांना वाटत होते, परंतु तसे करून चालणार नाही, हे त्यांना पटवून द्यावे लागले. मोकाशी आणि त्यांचे कुटुंबीय हे निखिलच्या आयुष्याचे जवळचे साक्षीदार. त्यांच्याकडूनही खूप महत्त्वाची माहिती मिळाली. या सगळ्या माहितीमधून माझ्या डोळ्यांपुढे निखिलचं व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य साकारत गेलं. वेगवेगळ्या टप्प्यांना एकत्र बांधण्यासाठी सूत्रधाराचा वापर करण्याचं ठरलं आणि मग पटकथेला आकार येऊ लागला.
पटकथा पूर्ण झाल्यावर तिचं निखिलच्या काही जवळच्या लोकांसमवेत पहिलं वाचन केलं तेव्हा, प्रत्येकजण एकच म्हणाला, तुम्ही निखिलला कधी भेटला नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही. त्याचं बोलणं, वागणं यात परफेक्ट उतरलेलं आहे. हे समाधान माझ्यासाठी मोठं होतं.
दासबाबूंनी कलावंत निवडताना अतिशय विचार करून निवडले. त्यामुळे काम आणखी सोपे झाले. अरूण नलावडे, संग्राम समेळ, धनश्री, अभय कुलकर्णी, अतुल परचुरे, सुलभाताई या सगळ्यांनीच निखिल आणि त्याचं जगणं पडद्यावर अक्षरशः साकार केलं आहे. खुद्द दासबाबूंनी दिग्दर्शक म्हणून ‘तहान’च्या तुलनेत ‘ब्रेव्हहार्ट’मध्ये मोठीच झेप घेतली आहे. पडद्यामागे राहून काम करणारे आमचे कॅमेरामन विलियम आणि निर्मिती व्यवस्थापक प्रशांत पवार यांचे श्रम केवळ आम्हालाच ठावूक आहेत. या चित्रपटाच्या अखेरीस निखिलच्या जगण्यावर भाष्य करणारे गाणे हवे अशी सूचना पुढे आली तेव्हा मी गाण्याऐवजी कविता असावी अशी सूचना केली. ती किशोर कदम ऊर्फ सौमित्रच्या आवाजात असावी असंही सुचवलं. मी लिहिलेली ती कविता किशोरनं अत्यंत प्रभावीपणे म्हटली. चित्रपटाच्या निर्मितीची पार्श्वभूमी कळल्यावर त्याने कविता सादर करण्याचे मानधन घेण्यासही नकार दिला. या संवेदनशीलतेबद्दल, उमदेपणाबद्दल किशोरचे जाहीर आभार मानण्याची हीच वेळ आहे. ही कविता आणि चित्रपटांतील दोन गाणी यांना न्याय देणारे संगीतकार अर्णव चॅटर्जी हे कमी बोलणारे परंतु उत्तम काम करणारे गृहस्थ आहेत. चित्रपट आता प्रेक्षकांपुढे आहे. ७ एप्रिलला तो प्रदर्शित होतो आहे. या क्षेत्रात नवीन असूनही मोकाशी यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जे श्रम घेतले त्यालाही सॅल्यूट करायला हवा. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आम्ही आता वाट बघतोय.
– श्रीकांत बोजेवार
(‘ब्रेव्हहार्ट’चे पटकथा, संवाद, गीत लेखक)
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया