अतिथी कट्टा

दिनांक :

‘प्रभात फिल्म कंपनी’ची जन्मकथा…’


१ जून १९२९. ‘प्रभात फिल्म कंपनी’चा जन्मदिन. भारतीय चित्रपटसृष्टीला वळण देणार्‍या या चित्रपट निर्मिती कंपनीच्या स्थापनेची ही जन्मकथा.
——-

१९१८ मध्ये मा. विनायक यांचे बंधू बाबूराव पेंढारकर यांनी आपले मावसभाऊ व्ही. शांताराम यांना चित्रपटात आणले. आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये बाबूराव स्वतः मॅनेजर म्हणून वावरत होते. इतकेच नाही तर फिल्म कंपनीच्या मूकपटात छोट्या मोठ्या भूमिकाही करीत होते. बाबूराव पेंढारकरांच्या हाताखाली काम करताना शांतारामबापूंनी ‘सुरेखाहरण’, ‘सिंहगड’, ‘श्रीकृष्णावतार’, ‘शहाला शह’, ‘सावकारी पाश’, ‘राणी हमीर’, ‘मायाबाजार’, ‘गजगौरी’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘मुरलीवाला’ या चित्रपटांतून छोट्या-मोठ्या भूमिका तर केल्याच. तसेच चित्रपट माध्यमाचे बारीक-सारीक निरीक्षण करीत त्या आत्मसातही करून घेतल्या. ज्याचा फायदा शांतारामबापूंना ‘प्रभात’ फिल्म कंपनीत स्वत: चित्रपटांचे दिग्दर्शन करताना झाला.
१९२७ मध्येच श्रीमंत सरदार नेसरीकरांचे स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शनाचे आव्हान त्यांनी बाबूराव पेंटरांच्या साक्षीनेच पेलले होते आणि ‘सरसेनापती नेताजी पालकर’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. मूकपटाच्या जमान्यात शांतारामबापूंनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. तेव्हा त्यांनी आपल्या मदतीला घेतले होते ते केशवराव धायबर यांना. कारण या दोघांची खास मैत्री होती. दोघांनाही या माध्यमाची गोडी लागली होती.
१९२९ ते १९३१ या तीन वर्षांत ‘प्रभात’च्या माध्यमातून ‘गोपालकृष्ण’, ‘खुनी खंजीर’, ‘राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू’, ‘उदयकाल’, ‘चंद्रसेना’ असे हे पाच मूकचित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर ‘जुलूम’ हा ‘प्रभात’चा शेवटचा मूकपट आहे. शांतारामबापूंच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता १९२० ते १९३१ ही ११ वर्षं मूकपटाची वाटचाल दाखवणारी आहेत. कारण या कालखंडात त्यांनी ‘सुरेखाहरण’, ‘सिंहगड’, ‘श्रीकृष्णावतार’, ‘सतीपद्मिनी’, ‘शहाला शह’, ‘सावकारी पाश’, ‘राणा हमीर’, ‘मायाबाजार’, ‘गजगौरी’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘मुरलीवाला’, ‘सतीसावित्री’, ‘महारथी कर्ण’, ‘बाजीप्रभू देशपांडे’, ‘मिडनाईट गर्ल’ या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या मूकपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका तर केल्याच, पण स्वत:ला केवळ नट म्हणून मर्यादित ठेवले नाही. कॅमेर्‍यामागे पडेल ते काम करून स्वत:ला डेव्हलपही केले. एकलव्याच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीतले बारकावे शिकून घेतले. थोडक्यात सांगायचे तर ते स्वत: स्वत:चा गुरूही होते आणि शिष्यही होते. बदलत्या काळाबरोबर आपणही बदलावे, काळाच्या पुढे एक पाऊल टाकावे आणि आपल्यासोबत चित्रपटालाही पुढे न्यावे, या ध्यासाने ते पछाडले होते. त्यासाठी पडेल ते काम करण्याची वृत्ती त्यांनी अंगिकारली, जिद्द बाळगली आणि चित्रपटसृष्टीतल्या नावीन्याची, जिव्हाळ्याची आत्मीयता आत्मसात केली. म्हणूनच तर व्ही. शांताराम अल्पावधीतच करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले. पांढर्‍या दाढीवरून हात फिरवणार्‍या धीरगंभीर वृत्तीच्या बाबूराव पेंटर यांच्या पडत्या फळाची आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानली. आलेली संधी न सोडता, त्या संधीचा सदुपयोग करून घेतला. केशवराव धायबर यांना हाताशी धरून सामाजिक, धार्मिक की ऐतिहासिक या द्वंद्वात न अडकता ‘नेताजी पालकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरू केले. आपल्या चित्रपट दिग्दर्शनाची ही आठवण स्वत: शांतारामबापूंनी आपल्या ‘शांतारामा’ या आत्मचरित्रात फार सुरेख सांगितली आहे.
याचवेळी दामले-फत्तेलाल या जोडीने ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’साठी ‘महारथी कर्ण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या कंपनीसाठी स्वतंत्ररित्या दिग्दर्शन केलेल्या या चौकडीचे हे दोन चित्रपट मात्र अखेरचे ठरले. कारण त्यानंतरच यांनी आपला सवतासुभा मांडला.
या चौकट राजांचा विचार करता एक्का म्हणून की गुलाम म्हणून आपण वावरायचे, हा प्रश्‍न त्यांना सतावीत होता. कारण पैसाअडका, मानमरातब यांचा विचार न करता जीवाचे रान करून बाबूराव पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’साठी स्वत:ला झोकून देवून राबणार्‍यांच्या हाती मात्र मानहानीचे प्रसंग वारंवार येत होते. व्यक्तीपेक्षा संस्था महत्त्वाची या ध्येयाने पछाडलेल्या या मंडळींनी मात्र जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष केले होते. पण या माणसांची सहनशीलता लक्षात घेता बाबूरावांचे विक्षिप्त वागणे दिवसेंदिवस त्यांना अस्वस्थ करीत होते. कारण नेसरीकरांच्या आग्रहाखातर ‘नेताजी पालकर’ या मूकपटासाठी शांतारामबापूंनी केलेले दिग्दर्शन बाबूरावांना आवडले नाही. याच वेळी दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेला ‘महारथी कर्ण’ हा चित्रपट थिएटरवर गर्दी खेचू लागला होता. मुंबईत तर चार आठवडे प्रेक्षकांची थिएटरवरची गर्दी म्हणून हटता हटत नव्हती. इतकी लोकप्रियता या चित्रपटाने मिळवली. आपल्या चित्रपटाचे यशापयश सांगण्यासाठी आनंदाने मोहरून गेलेली दामले-फत्तेलाल-शांतारामबापू ही मंडळी मुंबईतून थेट कोल्हापूरात आली आणि घरी न जाता बाबूरावांच्या ऑफिसमध्ये गेली. पण तिथले चित्र पाहून मात्र यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण स्वत: बाबूरावांनी नेसरीकरांसोबत एका आंग्लवेश धारण करणार्‍या मोती बी. गिडवाणी यांच्यासोबत विचारविनिमय करून त्यांना कंपनीत दिग्दर्शनासाठी ठेवले. तेही ४५० रुपये पगार देऊन. ही घटना १९२९ मधली, ज्या बाबूरावांसाठी आपण सर्वस्व झोकून देवून काम केले, त्यांनीच आपल्या पश्‍चात गिडवानी यांची दिग्दर्शनासाठी पगारावर नेमणूक करावी, हे या मंडळींना आवडले नाही. रूचले तर नाहीच नाही. ते काही न बोलता घरी गेले. दुखावलेली मने मात्र रूंदावत गेली.
दुसर्‍या दिवशी त्यांना दुसराच धक्का मिळाला. आपल्या कंपनीत चित्रपटांची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी बाबूरावांनी आपले जुने मित्र गुणे यांची तंत्रज्ञ म्हणून नेमणूक केली होती. आजवर रसायनशाळा, कॅमेरा या सर्व तांत्रिक बाजू इमानेइतबारे दामले आणि फत्तेलाल सांभाळीत आले होते. असे असूनही आपल्यावर देखरेख म्हणून गिडवानी आणि गुणे यांची केलेली नेमणूक या मंडळींना आवडली नाही. ते अस्वस्थ झाले. कारण आपल्याला पगार किती मिळाला, आपण पैसा किती मिळवला, आपण आपल्या आयुष्यभराची मिळकत काय केली, असा व्यावहारीक विचार या मंडळींच्या डोक्यात कधीच आलाच नव्हता. कारण कला ही श्रेष्ठ आहे. कलेसाठी झोकून देवून ही मंडळी कार्य करीत होती. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, आदराचा विषय तर होताच. पण रोजीरोटीचाही होता. आपल्यापेक्षा अधिक पगार देवून दुसर्‍या लोकांची नेमणूक बाबूरावांनी करावी, हेच त्यांना रूचले नाही. सेवाभावी संस्थेचे संस्थान झाले. एकेरी कारभार वाढला. त्यांची ही नाराजी सांगीवांगीने बाबूरावंाच्या कानावर गेली. पण फरक काय पडला तर या मंडळींचा पगार फक्त ५० रुपयांनी वाढवण्यात आला. सारासार विचार करता गिडवाणी-गुणे यांचे पगार तरीही मोठेच. म्हणजे काल आलेले हे, स्वत:ला सर्वज्ञ म्हणवून घेणारे तंत्रज्ञ, हुशारी दाखविणारे बाबूरावांचे विश्‍वासू झाले आणि आपण मात्र एका रात्रीत पोरके व्हावे? काय म्हणायचे या प्रवृत्तीला, यांना पगार अधिक आणि आपण रात्रंदिवस ही मेहनत करतोय, जीवाचे रान करून चांगले प्रॉडक्शन करतोय, तरी आम्हांला पगार कमी? म्हणजे आजवर आम्ही प्रामाणिकपणे राबलो, पडेल ते काम केले, सेवाभावी वृत्ती ठेवली त्याचे हेच फळ आम्हाला मिळाले का? अशीच जर वारंवार वागणूक आम्हांला मिळणार असेल तर हे अपमानीत जीणे इथे जगण्यात काय अर्थ आहे? या अस्वस्थेतूनच स्वत: शांतारामबापू आणि केशवराव धायबर यांनी स्वतंत्र फिल्म कंपनी काढायचा निर्णय घेतला. हाच विचार इकडे दामले आणि फत्तेलाल यांनीही केला होता. मात्र स्वतःची फिल्म कंपनी काढणे एवढे सोपे नव्हते. कारण त्यासाठी पैसा हवा होता आणि हे लोक तर पैशाकडून अपुरे होते. आर्थिक बजेट जमत नव्हते. पण स्वत:ची कंपनी असावी, ही जिद्द मात्र त्यांना अस्वस्थ करीत होती. म्हणून पैसा उभारण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
दामले-फत्तेलाल यांनी तर यापूर्वीच कॅमेरा विकत घेतला होता. नव्या कंपनीच्या निर्मितीची स्वप्ने सर्वांनाच पडत होती. पण आर्थिक ताळमेळ जमत नव्हता. कुणाची कंपनी लवकर स्थापन होणार? यात इर्षा होती, जिद्द होती. कधी कधी दामले-फत्तेलाल यांचे उद्गार ऐकून तर शांतारामबापू अस्वस्थ व्हायचे. कारण त्यांच्या बोलण्यात हेवा, मत्सर होता. गुजरीत सीतारामपंत कुलकर्णी यांच्याकडून आर्थिक मदत मिळविण्यात हे दोघे आघाडीवर होते. काही करून शांतारामबापू आणि केशवराव धायबर यांच्या आधी आपली कंपनी निर्माण झालीच पाहिजे, ही त्यांची धारणा होती. म्हणून ते सीतारामपंत कुलकर्णी यांच्याकडून आर्थिक मदत मिळते, का हे पहात होते. वारंवार त्यांच्या गाठीभेटी घेत होते. शांतारामबापूही आपल्या कंपनीचा ‘मायाबाजार’ हा चित्रपट दाखवून एका व्यापार्‍याच्या मदतीने पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत होते, व्यापार्‍याला त्यातून पैसाही मिळत होता. तोच त्याने चित्रपट धंद्यात गुंतवावा म्हणून शांतारामबापू, केशवराव धायबर त्यांच्या मागे लागले होते. पण अजून त्यांनाही यश येत नव्हते.

याचवेळी एकीकडे हे पैसे मिळविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ‘सिंड्रेला’ या परीकथेवर आधारीत ‘मिडनाईट गर्ल’ या चित्रपटाचे कामही सुरू होते. त्याच्या दिग्दर्शनाचे काम या कंपनीत नव्याने दाखल झालेले फॉरेन रिटर्न्ड गिडवानी यांच्याकडे सोपवले होते. एकूणच हे सगळे वातावरण लक्षात घेता दिवसागणिक कंपनीतल्या या नव्याने आलेल्या मंडळींचा वाढणारा वावर लक्षात घेता इथे आपलेपणाऐवजी तुटलेपणा या जुन्या मंडळींना जाणवू लागला. स्वप्ने तर मोठी होती. पैसा तर मिळत नव्हता. अपमानीत होऊन कंपनीत राहायचे की नव्याने कंपनी काढायची, या संभ्रमात अडकलेल्या या चौकडीची कोंडी झाली होती. ती फोडण्याचा प्रयत्न एस. फत्तेलाल यांनी केला. निराश होऊन ते म्हणाले, ‘‘शांताराम! आपण दोन निरनिराळ्या कंपन्या काढण्याऐवजी चौघांनी मिळून एकच कंपनी काढली तर? कारण एकाच फिल्म कंपनीची स्थापना करावी असे मला वाटते. तुम्हीही भांडवल आणा आणि आम्हीही आणतो. दोघांनी आणलेल्या भांडवलात चांगली कंपनी निर्माण होईल.’’
फत्तेलाल यांचा हा विचार ऐकून शांताराम आतून सुखावून गेले. पण आपल्याविषयी यांच्या मनात कसे काय प्रेम दाटून आले? त्यांचे हृदय परिवर्तन कसे झाले, याचे त्यांना आश्‍चर्यही वाटले. कारण आपल्याविषयी यांच्या मनात असूया असल्याची त्यांना कल्पना होती. पण त्यातून तोडगा तर काढणे महत्त्वाचे होते. म्हणून पुढचामागचा विचार न करता शांतारामबापू फत्तेलालना म्हणाले, ‘‘फत्तेलाल तुमचा विचार चांगला आहे, पण एक अडचण आहे आणि ती म्हणजे मी एकटा तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, का तर माझे सहकारी केशवराव धायबर आहेत. तेव्हा त्यांनाही मला सोबत घ्यावे लागेल. बघा, हे मान्य असेल तर जरूर आपला प्रस्ताव आम्ही स्वीकारू.’’
फत्तेलालनी क्षणाचाही विलंब न लावता आपला होकार दिला. या पूर्वीचे जे काय, हेवेदावे, इर्षा, मानापमान, मतभेद, मत्सराच्या दर्‍या ज्या रूंदावल्या होत्या, एकमेकांविषयी जे काय, समज-गैरसमज निर्माण झाले होते ते सगळे एका मातीत गाडले गेले आणि या चौघांनी एकत्रित येऊन सीतारामपंत कुलकर्णींना पाचवा भागीदार करून १ एप्रिल १९२९ रोजी बाबूरावांची रीतसर भेट घेतली आणि आपला निर्णय सांगितला.
‘‘आम्ही चौघे मिळून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना करतोय. आमची उरलेली सर्व कामे आम्ही उरकून घेतोय आणि १ मेपासून आम्ही इथे या कंपनीत कामाला येणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही आलोय.’’
खरे तर या चौघांची ही एकवाक्यता ऐकून एखादा अस्वस्थ झाला असता. तडजोडीची भाषा केली असती, पण बाबूराव पेंटर मात्र त्यावर एका शब्दानेही बोलले नाहीत की, कसली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहात हे सगळेजण तिथे थांबले होते. पण प्रतिक्रियाच उमटल्या नाहीत, की त्यांच्या चेहर्‍यावरती हावभाव प्रकटले नाहीत. म्हणून ही मंडळी दु:खीकष्टी अंत:करणाने बाहेर पडली. कारण गेल्या नऊ वर्षांत या परिसरात आपल्याला भरपूर शिकायला मिळाले. तो परिसर सोडून जाताना त्यांच्या अंत:करणातील अस्वस्थता बरेच काही सांगून जात होती. फक्त खंत एकच वाटत होती. आजवरच्या वाटचालीबद्दल बाबूरावांनी कधीही कौेतुकाने पाठ थोपटली नाही, की प्रोत्साहन दिले नाही. हे शल्य मात्र शांतारामबापूंच्या मनाला अस्वस्थ करीत होते. पण एकदा बाबूराव कुणाजवळ तर बोलल्याचे त्यांनी ऐकले होते. ‘कोणतीही गोष्ट कला शिकावी. हे कोणाला जर शिकायचे असेल तर त्या शांतारामाकडून शिका.’
‘गुरूचं हे एकच वाक्य आपल्या पुढील वाटचालीचीही शिदोरी आहे, हे समाधान मानून मी कार्यरत राहिलो.’ अशी नोंद स्वत: शांतारामबापूंनी आपल्या आत्मचरित्रात केली आहे.
सीतारामपंत कुलकर्णी, हा पाचवा वाटेकरी हाताशी धरून १ जून १९२९ रोजी अशाप्रकारे ‘प्रभात’ची निर्मिती झाली. कोल्हापूरातील मंगळवार पेठेत म्हादू गवंड्याचा कुस्तीचा आखाडा होता. शिवाजी थिएटरपासून अगदी थोड्याच अंतरावर हे ठिकाण होते. आता तिथे आखाडाही नाही की थिएटरही नाही. कारण कॉंक्रीटच्या जंगलाने हा सगळा भाग गिळंकृत केला आहे. ही सगळी जागा बिल्डरांनी ताब्यात घेऊन तिथे मोठमोठे फ्लॅट निर्माण केले असले तरी त्या जागेचं पावित्र्य कमी होत नाही. कारण ८ बाय १२च्या एका खोलीत मोडक्या खुर्ची-टेबलाचा आधार घेऊन एकदाचे स्वतंत्र ऑफिस या मंडळींनी थाटले. पण यांच्यापुढे प्रश्‍न होता तो कंपनीच्या नावाचा.
शांतारामबापूंच्या घरी जेवणाच्या निमित्ताने बाबूराव पेंढारकरांचे एक मित्र घरी आले होते. जेवताना बर्‍याच विषयावर चर्चा झाली. या चर्चेत कंपनीच्या नावाचाही विषय निघाला होता. तेव्हा ते सहज बोलून गेले, ‘‘अरे! तुम्ही तुमच्या कंपनीचे नाव ‘प्रभात’ का ठेवत नाही?’’
‘प्रभात’ हे नाव कानी पडताच शांतारामबापू भारावले आणि त्यांनी मनाशी ठाम निर्णय घेतला की आपण आपल्या कंपनीचेही नाव ‘प्रभात’च ठेवू या. पण प्रश्‍न बोधचिन्हाचाही होता. कारण कंपनीसाठी एक ट्रेडमार्क हवाच होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’चे बोधचिन्ह म्हणजे दोन तलवारी की ज्या गुणाकाराच्या पद्धतीने मांडलेल्या. त्यांच्यामागे ढाल ठेवून ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ अशी अक्षरे लिहिलेलं हे बोधचिन्ह आहे. तर फिल्मच्या गोलातून डरकाळ्या फोडीत ‘मेट्रो गोल्डविन मेअर’ या कंपनीचा रूबाबदार सिंह प्रेक्षकांना आकर्षित करून घेत होता आणि अमेरिकेच्या ‘युनिव्हर्सल’ कंपनीने तर ‘अधांतरी फिरणारा गोल’ हे बोधचिन्ह बनविले होते.
निरनिराळ्या कंपन्या आपापले बोधचिन्ह निर्माण करून सिनेक्षेत्रात वावरत होत्या. नावारूपाला येत होत्या. आपली कंपनी तर नव्याने निर्माण झालेली. तेव्हा आपल्या कंपनीचे बोधचिन्हही आकर्षक हवेच. कारण ‘प्रभात’च्या नावाला ते साजेसे हवे, अशी धारणा शांतारामबापूंची होती.
अंथरूणावर विचार करीत ते बराच वेळ पडले होते. झोप तर लागत नव्हती. डोळे सताड उघडे होते. पण डोक्यात एकच विचार होता. आकर्षक बोधचिन्हाचा. थोडीशी गुंंगी आली. पण झोप तर चाळवली गेली होती. त्याच वेळी पहाटे महालक्ष्मीच्या मंदिरातला काकडआरतीचा घंटानाद त्यांच्या कानावर निनादू लागला. म्हणून ते खडबडून जागे झाले. त्यांची पत्नी विमल त्यांना म्हणाली, ‘‘आज एवढ्या पहाटे कसे काय उठलात?’’ तेव्हा चेष्टेने शांतारामबापू त्यांना म्हणाले, ‘‘तू रोज पहाटे उठून काम करतेस हे पाहायचं होतं म्हणून उठलो.’’ यावर विमलताई काहीच बोलल्या नाहीत. पण आई आणि पत्नीला ‘आज मला पहाटे फिरायची लहर आली आहे,’ असे सांगून तडक ते घराबाहेर पडले. चालत चालत बापूंनी कोल्हापूरच्या पूर्वेला असलेल्या टेंबलाबाईचा माळ गाठला. जिथे टेंबलाबाईचे मंदिर आहे. ‘‘त्या देवळापुढील उंच चबुतर्‍यावर बसून पूर्व दिशेच्या क्षितिजाकडे मी टक लावून पहात होतो. महालक्ष्मीच्या मंदिरातल्या काकड आरतीचा घंटानाद तर केव्हाच बंद झाला होता. पूर्व दिशेला लालिमा पसरू लागली होती आणि त्याचक्षणी लक्षात आले, प्रभातची मंगल वेळ ती हीच! प्रभात. ‘प्रभात’ म्हणजे जगाला नवजीवनाचे वरदान देणारी, सूर्यनारायणाच्या आगमनाची ललकारी देणारी प्रभात! मानवी जीवनात सुख, शांती देणारी प्रभात ! आमच्या आयुष्याला कलाटणी देणारी प्रभात! चित्रपटसृष्टीत नवतेचे घुमविणारी प्रभात!’’
बापू धावत पळत घरी आले आणि फार वेळ न थांबता तडक ऑफिसमध्ये गेले. अजून तिथेही कोणीच आले नव्हते. थोड्या वेळानी एस. फत्तेलाल आले. बापूंनी त्यांना ही कल्पना सांगितली. वाटेतून येताना जे जे विचार नजरेसमोर आले, त्याची त्यांना कल्पना दिली. ते विचार ऐकून फत्तेलालही भारावले.
‘‘प्रभातच्या मंगलसमयी पूर्व दिशा तेजःपुंज होऊ लागली आहे. समोर एक नवयुवती आपल्या हातातील तुतारी फुंकून सूर्याच्या आगमनाची ललकारी देत आहे. तिला पाहून असे वाटते की अजंठा-वेरूळमधील एखादं चित्र किंवा शिल्पच आपल्यासमोर सजीव होत आहे.’’
तेव्हा शांतारामबापूंना थांबवत फत्तेलाल म्हणाले, ‘‘थांबा थांबा बापू! बघा तुम्हाला दाखवतो मी तुमच्या कल्पनेतलं चित्र.’’ असे म्हणून त्यांनी स्केच काढायलाही सुरुवात केली.
आपला एक पाय पुढे व दुसरा पाठीमागे ठेवून डौलात असलेली, कंबरेत थोडा बाक देऊन मागे झुकलेली, उन्नत वक्षस्थळ असलेली प्राचीन भारतीय वस्त्रभूषणांनी सजलेली नवयौवना मोठ्या गौरवाने तुतारी फुंकीत आहे. हे चित्र कल्पकतेने फत्तेलाल यांनी काढले. तोपर्यंत ऑफिसमध्ये सगळेच जमले होते. त्यांचे ते बोधचिन्हाचे चित्र सर्वांनाच आवडते. त्या स्केचची पूजा श्रद्धेने केली आणि ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या शुभारंभाचा नारळ फोडला. तो दिवस होता, १ जून १९२९.
– शशिकांत चौधरी
————

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया