अतिथी कट्टा

दिनांक :

जय मल्हार…

प्रसिद्ध कथा-पटकथा-संवाद लेखक आणि दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा २१ मार्च हा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं पाटील यांच्या `पाटलाचा पोर` या आत्मचरित्रामधील हा काही निवडक भाग.
——–

वामनराव कुलकर्ण्यांनी, बोलल्याप्रमाणं आपले रेकॅार्डिस्ट मित्र विष्णुपंत चव्हाण यांच्या भागीदारीत ‘मंगल पिक्चर्स’ची स्थापना केली आणि चित्रनिर्मितीकरता मा.विनायकरावांच्याकडे असलेला ‘शालिनी स्टुडिओ’ भाडयानं घेतला. ‘मंगल पिक्चर्स’चे सूत्रधार म्हणून आले बाबूराव पेंढारकर.
ठरल्याप्रमाणे मी ‘मंगल पिक्चर्स’च्या पहिल्या चित्रपटाचे संवाद लिहिण्याकरता कोल्हापूरला आलो. माझं घर तेव्हा राजारामपुरीत होतं आणि बाबूरावही राजारामपुरीतच राहायला होते. त्यांच्या बंगल्याचं बांधकाम सुरू होतं. तरी बंगल्याचं आऊट-हाऊस तयार झालं होतं. बाबूराव त्या आऊट हाऊसवरच राहत होते. मी राहत होतो, त्या घरापासून अगदी जवळ! आल्या आल्या आमचं ठरलं, की मी सकाळी-दुपारी लेखन करावं आणि चार-पाच वाजता होईल ते लिखाण बाबूरावांना वाचून दाखवावं. माझी पटकथा तयार होतीच, ती त्यांना ऐकवली. माझी ‘वाघ्या-मुरळी’ ही गोष्टसुध्दा वाचायला दिली. बाबूरावांना दोन्ही पसंत होतं. म्हणून उठल्याबरोबर जे मी मानेवर खडा ठेवून बसायचो, ते जेवण होईपर्यंत. जेवल्यानंतर थोडी विश्रांती घेवून लगेच पुन्हा मी लिहायला बसायचो. चार-पाच वाजले, की बाबूरावांकडे जायचो. आमचं चहा-पान होता होताच बाबूराव माझे संवाद ऐकायचे. माझ्या संवाद लिहिण्याच्या बाबतीत एक पथ्य मी सुरुवातीपासून पाळत आलो आहे. संवाद लिहायचे, ते अगदी बोली भाषेत. आपण रोज बोलतो ना, त्या. त्यात कसलाही कृत्रिमपणा किंवा बोजडपणा येऊ द्यायचा नाही. हेतू हाच, की एक तर ते स्वाभविक वाटले पाहिजे आणि दुसरं म्हणजे, नाटकातील काय किंवा चित्रपटातील काय, संवाद हे ऐकल्याबरोबर प्रेक्षकांना कळले पाहिजेत. निबंधाची भाषा एक वेळ बोजड झाली, तरी चालण्यासारखी आहे. कारण वाचक निबंध वाचत असतो असतो. एखादं वाक्य नाही समजलं, तरी ते पुन्हा पुन्हा वाचून तो समजावून घेवू शकतो आणि त्याचं रसग्रहणही करू शकतो. पण संवादांच्या बाबतीत ते शक्य असत नाही. ते एकदाच कानांवर पडतात. चि़त्रपटाची फिल्म तर सारखी पळत असते. संवादाला ‘टाळी’ पडो किंवा ‘हशा’ पिको; रंगभूमीवरला नट थोडा वेळ थांबू तरी शकतो. पण पडद्यावर ते शक्य होत नाही. पडद्यावर ज्याप्रमाणं गाण्याला ‘वन्समोअर’ नाही. त्याप्रमाणं संवादालाही ‘वाहवा’ म्हणून दाद देण्याइतकी उसंत मिळत नाही. म्हणून संवाद हे नेहमी साधेच लिहावे लागतात. अर्थात हा साधेपणा सांभाळतानाही ते अगदीच (ज्याला इंग्रजीत ‘प्रोझेक’ म्हणतात) सपकही होतो कामा नयेत, याची दक्षता घ्यावी लागते.
केवळ आलंकारिक भाषा टाळली, म्हणजे संवाद साधे होत नाहीत. त्यांना स्वतःचं असं एक सौंदर्य असावं लागतं. बोलायला जितके सोपे, तितकेच ते लयबद्ध असावे लागतात. याबाबतीत संवाद-लेखकांनी एक गोष्ट सतत लक्षात घेतली पाहिजे- ‘लय’ किंवा ‘ताल’ हा गाण्यालाच असतो, असं नाही. न्हाणीघरातून बाहेर पडणारी तरुणी अलंकार नसतानाही ज्याप्रमाणं ताजेपणामुळं आपल्या डोळ्यांत भरते, त्याप्रमाणे संवादही भरले पाहिजेत. विनायकरावांसारख्या कुशल नटाच्या आणि दिग्दर्शकाच्या सान्निध्यात राहिलो असल्यामुळं असेल, ते माझ्या अंगवळणी पडल होतं. एखादं वाक्य पूर्ण झालं, की मी ते स्वतःशीच पुटपुटून पाहतो.
‘जय मल्हार’च्या लेखनावेळचीच गोष्ट सांगतो. माझी मोठी मुलगी आशा (त्यावेळी लहान होती.) स्वयंपाकघरात धावत गेली आणि सुमनला म्हणाली,
‘आई, आई ! बघ , चल. काका भांडतायत.’
‘कुणाशी, ग ?’
‘कुणास ठावूक ? म्हणतायत, माझ्या घरातनं चालती हो !’
सुमननं धावत येवून पाहिलं; व माझं संवादलेखन चालू होतं. ते पाहून ती हसायलाच लागली आणि आशाला म्हणाली,
‘अग, हे भांडत नाहीत. लिहीतायत.’
संवाद लिहिताना कुठे बेताल होत नाही ना, याची माझी मीच खात्री करून घेत असतो. माझ्या संवादांना, समीक्षकांनी आणखी एक मार्मिक विशेषण लावलं आहे. त्यांच्या मते माझे संवाद ‘खटकेदार’ असतात. आता खटकेदार म्हणजे काय? हे जरी मला विशद करून सांगता आलं नाही, तरी त्याचं एक रहस्य सांगू शकेन. माझी पात्रं बोलताना नेहमी एकमेकांवर कुरघोडी केल्याप्रमाणं बोलत असतात. आपण जे बोलतो, त्यावर प्रत्युत्तर येवूच नये, या अभिनिवेशानं. साहजिकच समोरचे पात्र जेव्हा त्यावरही कुरघोडी करतं, तेव्हा प्रेक्षकांना त्यांची जुगलबंदी श्रवणीय वाटू लागते. टेनिसच्या खेळात समोरासमोरचे खेळाडू एकमेकांना चकवण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणं. म्हणजे जुगलबंदी ही गाण्यातच असते, असं नाही संवाद-लेखकालाही ती रंगवावी लागते
ही माझ्या संवाद-लेखनाची ठळक अशी वैशिष्टयं झाली. ती शिकवतो, म्हणून कोणाला शिकवता येत नाहीत तर ती रक्तातच असावी लागतात. ‘भाषाशैली ही शिकवता येणार नाही, शिकता मात्र येईल,’ असं ना. सी. फडक्यांनी ‘प्रतिभसाधना’त नाही म्हटलं ? माझ्याबाबतीत तर ते फार फार खर आहे. मला तरी संवाद लेखनातील हे चातुर्य कोणी शिकवलं होतं ? म्हणूनच असेल, अजूनपर्यंत मी ती वैशिष्टयं सांभाळीत आलो आहे. माझी ही सर्व आयुधं घेवूनच मी संवाद लिहायला बसलो; म्हणूनच असेल, बाबूरावांना ते एकदम आवडत गेले.
अर्धे अधिक संवाद लिहून झाल्यावर ते मला म्हणालेही,
‘पाटील, आपलं पिक्चर ‘बेष्ट’ होणार हं !’
बाबूराव खुशीत आले, की ‘बेष्ट’ हा शब्द नेहमी वापरायचे. एक गोष्ट खरी. कथावस्तू नाट्यपूर्ण असली, की संवाद लिहावे लागत नाहीत. ते आपोआप सुचत जातात. ती तशी नसेल, तर मात्र पंचाईत पडते, असा माझा तरी अनुभव आहे. संवाद लिहिताना डोकं खाजवावं लागलं, की समजावं, कथावस्तूत काही तरी कमी आहे. माझ्यावर ती पाळी आली नाही. म्हणूनच मी बरोबर पंधरा दिवसांत संवाद-लेखन पूर्ण करू शकलो.
तरी प्रश्न पडलाच, चित्राला नाव काय द्यायचं ? ‘वाघ्या-मुरळी’ हे नाव लघुकथेला ठीक होतं. चित्राचं नाव त्यापेक्षा चमकदार हवं होतं. नावात काय आहे, असे आपण म्हणतो. पण मी म्हणतो, नावात बरंच काही आहे. गुलाबाला आपण उद्या धोत्रा म्हटलं, तर ? एखाद्या सुंदर मुलीचं नाव धोंडी असलं, तर त्या नावानं तुम्ही तिला हाक माराल का? नावातही सौंदर्य असावं लागतं, औचित्य असावं लागतं. कोणत्याही नावाचं असंच आहे, मग ते नाव व्यक्तीचं असां, की चित्रपटाचं असां. यशस्वी चित्राचीच नावं पाहा ना! ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’ , ‘गड आला, पण सिंह गेला’, ‘माझं बाळं’. किती सूचक नावं आहेत ही ! तसं सूचक नाव मी शोधत होतो; पण सापडत नव्हतं, तेव्हा बाबूराव म्हणायचे,
‘मिळेल, मिळेल. तुम्ही लिहीत तर चला,’
आणि तसंच झालं. चित्राच्या ‘क्लायमॅक्स’च्या वेळी कल्लू बेरड जेव्हा पाटलाच्या वाड्यावर हल्ला करायला येतो; तेव्हा वाड्याच्या दारात थांबून तो गावक-यांना म्हणतो,
‘ऐका, रं, माझ्या गावक-यांनो, आज मी पाटलाचा मुडदा पाडणार हाय. ज्याला आडवं याचं असंल, त्यानं आपल्या बायकूचं कुकू पुसूनच यावं !’
हे ऐकून गल्लीतले लोक भिवून पळतात आणि आपापल्या दारांना आतून कड्या लावून लपतात. तेव्हा कल्लू आपल्या साथीदारांना ललकारतो,
‘बघता काय? या माझ्यामागनं. बोला, जर मल्हार !’
मी हे वाचताच बाबूराव म्हणाले,
‘दिनकरराव, थांबा, थांबा.’
मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तेव्हा ते हसले,

‘बघता काय ? नाव सापडलं आपल्या चित्राचं.’
‘कोणतं ? ’
‘तुम्हीच लिहिलंय् की ! जय मल्हार !’
-आणि त्याच वेळी माझ्या आणि `मंगल`च्या पहिल्या चित्राचं बारसं झालं: ‘जय मल्हार’.
खरंच, माझी आणि `मंगल`ची पहिलीच कलाकृती इतकी चांगली लिहून होईल, याची मला कल्पना नव्हती. लाडात येवून बाबूराव म्हणाले,
‘दिनकरराव, तुम्हीच का नाही हे चित्र ‘डायरेक्ट’ करीत ? कथा-संवाद तुमचेच आहेत.`
पण ते मला शक्य नव्हतं. विनायकरावांच्या ‘मंदिर’ चं शूटिंग चालू होतं. विनायकरावांनी मला पंधरा दिवसांकरता सोडलं होतं. त्याप्रमाणं मुंबईला येताच विनायकरावांनी मला विचारलं.
‘काय, रे ? काय काय लिहिलंस, दाखव तरी.’
माझ्याकडं एक कॉपी होतीच. ती मी त्यांना दाखविली. त्यांच्या अपेक्षेपेक्षा माझं लिखाणं चांगलं झालं होतं. तरी एक त्रुटी त्यांना जाणवलीच. ते म्हणाले,
‘हे बघ, दिनकर. देवाला मुरळी सोडण्याची आपली प्रथा आज बदनाम झाली असली, तरी मुळात तिला अर्थ होता. देवाशी त्यांचं लग्न होतं, याचा अर्थ, त्यांनी देवाची सेवा करावी; माणसाच्या नादी लागू नये, हाच होता. पण स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, कामवासनेवर सहजासहजी विजय मिळविता येत नाही. म्हणून मुरळ्या माणसांशी रत होताना दिसतात. सुदैवानं तुझी नायिका शेवटी सगळ्यांचा पश्चाताप होवून घर सोडते, असं तू दाखविलंयस. त्यावेळी तिच्या तोंडी एक वाक्य घालून बघ, ‘देवासंगं संसार करायचा सोडून मी माणसाच्या नादी लागले, म्हणून तर देवानं माझ्या आयुष्याची अशी परवड केली नसंल ?’
विनायकरावांच्या सल्ल्याप्रमाणे तिला पश्चाताप होतो, असं मी दाखविलं आणि खरंच , मुरळीच्या भूमिकेला एकदम पूर्णंत्व प्राप्त झालं. बाबूरावांनाही ते मनापासून आवडलं.
तरी बाबूरावांना विशेष आवडला, तो माझ्या चित्राचा शेवट. शेवट पाटील आणि बेरड दोघेही मारले जातात, ते पाहून लक्ष्मी म्हणते,
‘दोघांचं रगात हितं मातीत एक झालं; त्या आधीच दोघंबी एक झालं असतं तर ?’
एक ना दोन, अशी अनेक सौंदर्यस्थळं ‘जय मल्हार’ मध्ये होती. त्यामुळं ‘जय मल्हार’ला दिग्दर्शकही चांगला मिळावा, म्हणून बाबूरावांनी खूप शोधाशोध केली. सुरुवातीला मुंबईचे मधुकर बावडेकर यांचं नाव पुढं आलं. एवढंच नव्हे, तर त्याकरिता येवून बावडेकरांनी माझं ‘जय मल्हार’चं ‘स्क्रिप्ट’ ही वाचून काढलं. पण कुठं माशी शिंकली, कोण जाणे ? ऐनवेळी सेटवर दाखल झाले, माझे मित्रच द.स.अंबपकर हे पाहून मला बरं वाटल. एक म्हणजे, ते कोल्हापूरचे होते. सहदिग्दर्शक म्हणून भालजी पेंढारकरांच्याकडे त्यांनी अनेक वर्षे काम केलं होतं. त्या सहवासात भालजींचा फटकळपणा त्यांनी पुरेपूर उचलला होता. त्यामुळं आशा होती, दिग्दर्शनाचा गुरूमंत्रही त्यांनी थोडा तरी घेतला असेलच की !
माझा हा तर्क खरा ठरला. ‘जय मल्हार’ तयार झालं. अपेक्षेप्रमाणं चांगलं चाललं. अक्षरशः खुळ्यासारखं चाललं. सगळीकडे त्याची ‘सिल्व्हर ज्युबिली’ झाली. अर्थात त्या यशात बाबूराव, ललिता पवार, सुमति गुप्ते, जोग, चंद्रकांत यांचाही माझ्याबरोबर वाटा होता. तरीही त्या सर्वांत मी अग्रपूजेचा मान देईन, तो माझा कविमित्र ग. दि. माडगूळकर यांना. बाबूरावांनी त्यांना काव्य-लेखनासाठी बोलावून घेतलं होतं. आमच्या मैत्रीला जागून, तेही मोठ्या उत्साहानं आले होते, आणि मांडी ठोकून बसले होते. त्यांनी पहिलंच पद लिहिलं होतं: ‘चांदणे चहूकडे फुलले’.
पाटील दस-याचं सोनं लुटून घरी येतो, तेव्हा पतीची प्रतीक्षा करणा-या लक्ष्मीच्या तोंडी ते होतं. गाणं खरंच चांगलं होतं. तरी बाबूराव मान हलवीत म्हणाले,
‘नाही, माडगूळकर, आपलं चित्र ग्रामीण आहे. खेड्यातल्या माणसांना काय कळणार तुमचं ‘चांदणं चहुकडे फुललं ? ’ तो म्हणणार , ‘चांदणं कसं पिठावानी पडलंय्.’
त्याबरोबर, माडगूळकरांनी, हातातला कागद फाडून टाकला. निर्मात्याला गाणं पसंत पडलं नाही, तर ते लगेच फाडून टाकण्याची त्यांना सवय होती. त्याच पदाची डागडुजी करणं त्यांना पसंत नव्हतं. त्यांनी ताबडतोब दुसरं गाणं तयार केलं,
‘पाजळली दीप-माळ रम्य चांदण्यात
माझ्या मनी आनंदाची लाख फुलवात .’
‘वाहवा ! वाहवा ! माडगूळकर ! ’ बाबूराव अनाहूपणे म्हणाले, ‘यक मंगता है।’ माडगूळकरांचा एक विशेष गुण माझ्या डोळ्यांत भरला, तो म्हणजे त्यांचं शीघ्रकवित्व. समोरच्या माणसाला काय पाहिजे, हे एकदा कळलं, की तोंडात पेन्सिल धरून ते थोडा वेळ विचार करायचे आणि नंतर, एखादी तोंडपाठ कविता लिहून काढल्याप्रमाणं गाणं लिहून पूर्ण करायचे. माडगूळकर स्वतः खेड्यात जन्मल्यामुळे आणि वाढल्यामुळं ग्रामीण वातावरण त्यांच्या पूर्ण परिचयाचं होतं. जातीनं ब्राह्मण असल्यानं पाठांतरही खूप होतं. शब्दभांडार तर काही विचारूच नका. आपण खिशात चिल्लर वाजवतो, त्याप्रमाणं शब्दांची चिल्लर त्यांचा तोंडात नेहमी खुळखुळत असायची. हा शब्द नको तर तो घे. तो नको तर हा घे. इतका हुकमी कारभार. संत, पंत आणि कवी त्यांच्या जिभेवर असल्यामुळं कोणतंही वृत्त, कोणतंही यमक, ते लीलया जुळवीत असत.
अर्थात कोणंतही काव्य करताना कवीला थोडेसे प्रयास हे पडणारच ! पण माडगूळकरांचा खास विशेष म्हणजे, हे प्रयास त्यांच्या काव्यात कधी जाणवत नसत. त्यांची कविता असो वा गाणं असो, वाचल्याबरोबर वाटतं, काव्य कसं एकसंध आहे. इमारत बांधताना गवंडी दगड-विटांचा मागमूसही राहत नाही. आपण अभावितपणे म्हणतो,
‘काय सुंदर इमारत आहे, नाही ?’
माडगूळकरांचं काव्यसुध्दा असंच आहे. प्रस्ताव, विकास आणि शेवट. कसे एकातून एक, एकातून एक फुलांच्या पाकळयाप्रमाणं फुललेले असतात. त्यामुळं त्यांची कविताच नव्हे, तर सिनेमातलं गाणंसुद्धा टपोऱ्या गुलाबाच्या फुलाप्रमाणं डौलदार वाटतं.
याच प्रत्ययकारी प्रतिभेनं माडगूळकरांनी ‘जय मल्हार’मधील एकूण एक गाणी लिहून काढली. एकापेक्षा एक सरस. खोटं नाही. ‘जय मल्हार’ मधील एकूण एक गाणी सुंदर वाटली आहेत. हरेक गाणंच नव्हे, तर त्याची ओळ आणि ओळ इतकी ‘पिक्चरस्क आहे, की ती वाचताना प्रत्यक्ष चित्रच डोळयांसमोर उभं राहतं !
‘कुठं चाललीस, चंद्रावळी, ग, तुरूतुरू ?’ यातील चंद्रावळ व तुरूतुरू हे शब्द जणू रंगाचे फटकारेच आहेत. त्यावर वाघ्याची मुरळी उत्तरते, ‘पुजाया जाते मी मल्हारीला.’ किंवा सुरुवातीचंच टायटल सॉंग पाहा –
‘देवा, तुझी सोन्याची जेजुरी,
गडाला नवलाख पायरी।।’
खरंच, ज्यांनी जेजुरीचं खंडोबाचं देवूळ पाहिलंय्, त्यांच्या ते डोळ्यांसमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत आलोय, माडगूळकरांची पदं नुसती श्रवणीय असत नाहीत. ती तितकीच ती प्रेक्षणीयसुद्धा आहेत. माझं पहिलं लेखन म्हणून माझे संवाद जसे फुटाण्यासांरखे उडाले; त्याप्रमाणं त्यांचं काव्यसुद्धा देवानं भिजलेल्या फुलासारखं मधूपाला गुंजारव करायला लावतं. असा समसमा संयोग पुन्हा कधी माझ्या वाट्याला आला नाही. त्यानंतर अनेकदा आम्ही एकत्र आलो, नाही असं नाही. पण म्हणतात ना, पहिल्याची गोडी काही औरच असते. त्याशिवाय का गोविंदाग्रजांनी म्हटलंय –
वाटते, मरण सोसावे ।
परि पहिले चुंबन घ्यावे ।।’
माझ्या आणि माडगूळकरांच्या लेखणीचं हे पहिलं चुंबन होतं आणि म्हणूनच ते अवीट आहेत माडगूळकरसुद्धा याबाबतीत नेहमी म्हणत,
‘पाटील-कुलकर्ण्यांची सर्कस झकास जमलीय् हं !’
मी बेनाडीकर पाटील; माडगूळकर माडगूळचे कुलकर्णी, दोघांची ही युती मराठी चित्रपट-क्षेत्रात ग्रामीणचित्राचं नवयुग सुरू करणारी ठरली.

(सौजन्य – प्रेस्टीज प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया