अतिथी कट्टा

दिनांक :

‘चि. व चि. सौ. कां’ म्हणजे धमाल मनोरंजन…

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ या दोन आगळ्यावेगळ्या चित्रपटानंतर येत्या १९ तारखेला दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘चि. व चि. सौ. कां.’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.
——-

यापूर्वीचे माझे दोन चित्रपट थोडे खेळकर आणि मिश्किल शैलीमधील होते. मात्र ‘चि. व चि. सौ. कां’ हा चित्रपट तद्दन धमाल आणि विनोदी कॅटेगरीतला आहे, असं मी म्हणेन. अशाप्रकारचा ‘जॉनर’ यापूर्वी मी नाटक माध्यमातून हाताळला असला तरी चित्रपट माध्यमाला तो पूर्णत: नवीन आहे. निखळ शंभर टक्के विनोदी असा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला असं वाटतं की, जो सर्जक असतो त्याचं काही ना काही तरी चित्रपटात येत असतंच. चित्रपटाच्या विषयानुसार त्याची शैली बांधली जाते. त्यामुळे या चित्रपटाला विनोद हा ओढूनताणून न आणता उत्स्फूर्त पद्धतीचा आहे. सर्व थरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या उद्देशानं हा चित्रपट आम्ही बनवला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ म्हणायला लहान मुलांची कामं असलेला चित्रपट होता. परंतु, तो सर्व थरातील
प्रेक्षकांसाठीच आम्ही बनवला होता. ‌‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारलेला होता. त्यामुळे त्याचाही प्रेक्षकवर्ग मर्यादित नव्हता.

‘चि. व चि. सौ. कां’चं पोस्टरच खूप बोलकं आहे. या पोस्टरवर माझ्या चित्रपटामधील मुख्य व्यक्तिरेखा खूप वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतात. भारत गणेशपुरे हा सध्याचा अत्यंत लोकप्रिय अभिनेता. तो या चित्रपटात ‘देवब्रह्मे’ या वेगळ्याच व्यक्तिरेखेद्वारे झळकत आहे. तो विवाह नोंदणी अधिकारी आहे. ब्रह्मदेव वर स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो असं आपण म्हणतो. हा देवब्रह्मे इकडे खाली गाठी बांधत असतो. म्हणूनच पोस्टरवर त्याच्या व्यक्तिरेखेच्या डोक्यावर ब्रह्मदेवाचा मुकुट दिसतो. चित्रपटाचा नायक सत्या हा ‘सोलर सायंटिस्ट’ आहे. त्याची ‘सोलर पॅनेल’ची फॅक्टरी असते. चित्रपटाची नायिका सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर असते. मुक्या जीवांसाठी ती जीव ओतून काम करीत असते. या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा अनुक्रमे ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांनी साकारल्या आहेत. ज्योती सुभाष या ज्येष्ठ कलावंत. अत्यंत खेळकर, खट्याळ आणि वात आणणारी आजी त्यांनी या चित्रपटामध्ये साकारली आहे. या चित्रपटामधले बरेचसे कलावंत हे ‘झी’ तसेच इतर वाहिन्यांवरील मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले असले तरी आपापल्या भूमिकांमध्ये ते शोभले आहेत. हे कलावंत मूळचे रंगकर्मी असून मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे. हे कलावंत कॉलेजच्या दिवसांपासून माझ्या आजूबाजूला होते. हा चित्रपट हास्यरसावर आधारला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामधील सर्व कलाकार सॉलीड विनोद बुद्धीचे आहेत.हा चित्रपट मला लेखनाच्या पातळीवर खूपच आव्हानात्मक वाटला. सत्या आणि सावित्रीची ही जरी प्रेमकथा असली तरी ती साधीसुधी प्रेमकथा नाही. आपल्या चित्रपटांमध्ये साधारणपणे निरूद्योगी प्रेमवीर पाहायला मिळतात. या चित्रपटातले प्रेमवीर अत्यंत वेगळे आहेत. उलट या चित्रपटामधील नायक-नायिकांचं प्रथम आपल्या व्यवसायावर प्रेम आहे. कामामुळेच ते परस्परांकडे आकर्षित होतात. ‘एका लग्नाची सायंटिफिक गोष्ट’ अशी या चित्रपटाची ‘टॅगलाइन’ आहे. त्यामागची उकल मी एवढ्यातच करण्यात नाही. चित्रपट प्रदर्शनापर्यंत ते रहस्य गुलदस्त्यामध्येच राहू दे.

– परेश मोकाशी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया