अतिथी कट्टा

दिनांक : २०-०७-२०१७

गोविंदजींकडून खूप काही शिकले…




प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला ‌‘ती आणि इतर’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं तिचं या चित्रपटामधील भूमिका तसेच दिग्दर्शक गोविंद निहालाणी यांच्याबरोबरच्या अनुभवाबद्दलचं हे मनोगत.
——-

गोविंद निहालाणी बरीच वर्षं मराठी चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. जागतिक चित्रपट पाहिलेला, अभ्यासलेला हा दिग्दर्शक आहे. अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा दिग्दर्शन करीत आहेत, तेही मराठी चित्रपटासाठी, ही गोष्ट आपल्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठी आहे. मी स्वत:ला चित्रपट क्षेत्राची ‘व्हॉलेण्टियर’ मानते. मला असं नाही वाटत की मी इथे अचानक येऊन पडलेय आणि स्टार झाले. आपण जेव्हा स्वत:ला या कुटुंबाचा भाग मानतो तेव्हा गोविंद निहालाणींसारखा दिग्दर्शक काम करशील का असं विचारतो, ही माझ्यासाठी पर्वणी आहे. ते कुठंही चमकण्यासाठी चित्रपट करीत नाहीत. प्रत्येक चित्रपटामधून त्यांची ‘कॉमेण्ट’ असते. डॉ. जब्बार पटेल, गोविंद निहालाणी, श्याम बेनेगल, सुमित्रा भावे, अदूर गोपालकृष्णन यांसारख्या दिग्दर्शकांचं स्वत:चं असं काही चिंतन सुरू असतं. त्यांचे चित्रपट हे या चिंतनाचे उदगार असतात. या पार्श्वभूमीवर मला करियरच्या या टप्प्यावर ‘ती आणि इतर’मध्ये काम करायला मिळालं हे खूप महत्त्वाचं आहे.

गोविंदजींनी आमच्याकडून खूप काम करून घेतलं. चित्रपट सुरू होण्यापूर्वी त्यांनी एक कार्यशाळा घेतली. या चित्रपटात तुम्ही कसं काम कराल, तसेच चित्रपटसृष्टीकडे तुम्ही कसं पाहिलं पाहिजे, पटकथेला किती महत्त्व दिलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजणच हल्ली व्यग्र आहे. मात्र त्यातूनही प्रत्येकाला भानावर आणणारा हा चित्रपट आहे. मी या चित्रपटात ‘नयना गोडबोले’ नावाची व्यक्तिरेखा साकारलीय. ही व्यक्तिरेखा फारशी माझ्यासारखी नाही. कारण माझा स्वभाव चळवळा आहे. मी कधीही गप्प बसणारी नाही. मी माझी प्रतिक्रिया नोंदविल्याशिवाय राहत नाही. पण नयना ही बऱ्याच जणांचं प्रातिनिधीत्व करते. तिच्याकडे पाहून आपल्याला असे वाटते की हा तिचा साधेपणा, भोळेपणा आहे की आळशीपणा आहे. हिला फक्त आपल्या कुटुंबालाच सुरक्षित ठेवायचंय का? परंतु, माझ्या घरच्यांना काही नाही झालं पाहिजे हा प्रत्येकाचाच एक प्रमुख मुद्दा असतो. ‘मैं आच नहीं आने दॅंूगी’ टाइपचं. हे स्वाभाविक म्हणणं आहे. त्यात काही चूक नाही असंच मला वाटतं. पण त्याच्या पलीकडं जायची क्षमता किती जणांकडे आहे? मला तर अनेकदा वाटलं की या नयनाला सांगावं, बोल. गोविंदजींनी माझ्या व्यक्तिरेखेला एक चौकट दिली होती. मला कधीच माझ्यासारखी भूमिका करण्याचा मोह होत नाही. मी जिंकण्यासाठी कुठलीही भूमिका करीत नाही. आपण आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी जगत नाही.



नयना ही उदयोन्मुख गायिका आहे. तिचा एक अल्बम रीलीज होणार आहे. त्यासाठी तिचे मित्र-मैत्रिण तिच्या घरी जमले आहेत. एका रात्रीची ही गोष्ट आहे. तिचं करिअर नुकतंच सुरू आहे. तिची फॅमिली खूप सुंदर आहे. तिचे मित्र-मैत्रिणी तिच्यावर प्रेम करतात आणि अचानक एक घटना घडते. त्याचा पडसाद तिच्या मनावर आणि तिच्या वागण्यात कसा पडतो, म्हणजे हा चित्रपट. हे दाखवताना निश्चितच माझी घुसमट झाली. ती नयना आणि माझी म्हणजे सोनालीची होती.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गोविंदजींकडून मला खूप काही शिकायला मिळालं. ‘स्क्रीप्ट’ला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे. कारण ती अनेक चाळण्यांमधून अॅप्रूव्ह झालेली असते. एकदा लेखक लिहितो, मग त्याला बरेच बदल करावेसे वाटतात, मग पुन्हा तो लिहितो, कालांतरानं दिग्दर्शक सल्ला देतो. त्यातून मग खरी स्क्रीप्ट बाहेर येते. लेखकानं लिहिलेली स्क्रीप्ट वाचताना ‘मी नाही असं म्हणणार…’ असं कलावंतानं म्हणणं योग्य नाही. हे पोकळ स्टारडम मिरवण्यासारखं आहे. गोविंदजींनी आम्हाला स्क्रीप्टशी प्रामाणिक राहण्यास सांगितलं. तसेच समोरचा जे काही म्हणतोय तेही नीट ऐकण्यास सुचवलं. त्याप्रमाणे मी माझे संवाद म्हणण्याबरोबरच इतरांचंही खूप काळजीपूर्वक ऐकलं आहे. करिअरच्या या वळणावर माझ्यासाठी हे सगळे रीमाइंडर्स मला महत्त्वाचे वाटतात. कामं मिळत जातात, चित्रपट प्रदर्शितही होतात. कामाबरोबरच आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींमध्येही बिझी असतो. त्यातून आपण आत्ताच्या आपल्या कामावर किती शांतपणे लक्ष केंद्रीत करू शकतो, हे महत्त्वाचं. ते मला गोविंदजींनी दिलं.

गोविंदजींनी या चित्रपटासाठी एक वेगळा प्रयोग केला. एकाचवेळी त्यांनी मूळ नाटकाचं स्क्रीप्ट आणि नव्यानं लिहिलेल्या चित्रपटाचं स्क्रीप्ट आमच्यापुढं ठेवलं. ही दोन्ही वाचून आम्हाला आमच्या पद्धतीनं संवाद बोलायचे होते. खरं तर हा अनुभव जेवढा एक्साइटमेंट देणारा होता तेवढाच भिववणाराही. कारण कोणताही दिग्दर्शक एवढा धोका पत्करत नाहीत. शूटिंगसाठी स्टुडिओ बुक झालेला असतो, सेट लागलेला असतो, त्यावर लायटिंगही झालेलं असतं, अशावेळी एखाद्या कलाकाराच्या एन्स्क्टिंक्टवर एवढा विश्वास टाकण्याचं धारिष्ट्यच नसतं. अशा वेळी दिग्दर्शकानं दाखविलेल्या विश्वासास आम्ही कलाकारांनी पात्र ठरणं हे खूप अवघड आहे. इथे गोविंदजींनी खूप चांगल्या अर्थाने आम्हाला आपलं दिग्दर्शक असणं दाखवून दिलं. भूमिकेत राहून कलाकारांनी इम्प्रोव्हाइज केलं तर मजा येते. भूमिकेबाहेर येऊन मी सोनाली कुलकर्णीसारखं काही बोलायला लागले तर निश्चितच ती भूमिका माझ्या हाताबाहेर जाणार. गोविंदजींनी आम्हाला एका वळणापर्यंत येऊ दिलं आणि तिथून पुढं आम्हाला मार्गदर्शन केलं. असा वेळ गोविंदजींनी आम्हाला देणं हे खूप दुर्मीळ आहे.
– सोनाली कुलकर्णी
——–

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया