अतिथी कट्टा

दिनांक :

कथानक आवडलं तर दिग्दर्शन करीन – अशोक सराफ

मुलुंडच्या ‘महाराष्ट्र सेवा संघा’तर्फे यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सु. ल. गद्रे पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते श्री. सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. सराफ यांना त्यांच्या कारकीर्दीविषयक पुरुषोत्तम बेर्डे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी बोलतं केलं. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
——–

रंगभूमीवर बरंच काम केल्यानंतर चित्रपट माध्यमामध्ये तुम्हांला संधी कशी मिळाली ?
– खरं तर माझ्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशास योगायोगच मानावं लागेल. १९७०ची ही घटना आहे. तेव्हा मी ‘स्टेट बँके’त नोकरीस होतो. या बँकेतफेर् सादर करण्यात येणार्‍या नाटकांमध्ये माझा सहभाग असायचा. एके दिवशी आमचा प्रभादेवीच्या ‘रवींद्र नाट्य मंदिरा’मध्ये प्रयोग सुरू होता. बॅकस्टेजला आम्ही कलाकार जमलो होतो. प्रयोगाची तयारी सुरू होती. त्याचवेळी एक जण माझ्याकडे आला नि मला म्हणाला, ‘गजानन जागीरदार तुला शोधताहेत…’ मी क्षणभर चमकलो. कारण जागीरदार हे चित्रपटसृष्टीमधील खूप मोठं व्यक्तिमत्त्व. ते आपल्याला कशासाठी बोलावताहेत? असा मला प्रश्‍न पडला. नाटकाच्या मध्यांतरात मी त्यांना भेटलो. माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘सिनेमात काम करणार का?’ त्यांचा हा प्रश्‍न ऐकल्यानंतर ‘आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन डोळे’ असं मला झालं. सिनेमात काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे मी जागीरदारांना लगेचच होकार दिला. नंतर मला कळलं की, गजाननरावांना माझं नाव पहिल्यांदा कमलाकार नाडकर्णी आणि लालन सारंग यांनी सुचवलं होतं. काहीच दिवसांनी किशोर प्रधान आणि शोभा प्रधान गजाननरावांना म्हणाले, ‘एक चांगलं नाव आहे तुम्ही शोधताय त्या रोलसाठी… अशोक सराफ.’ अशाप्रकारे काही जणांकडून माझ्या नावाची शिफारस झाल्यामुळे गजाननरावांनी या चित्रपटासाठी मला बोलावलं. मात्र अट एकच घातली- मानधन मिळणार नाही! मी या गोष्टीला होकार दिला. कारण, मला काही करून चित्रपटात काम करायचं होतं.

‘दोन्ही घरचा पाहुणा’मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
– या चित्रपटासाठी मी आठ दिवस शूटिंग केलं. चित्रपट यशस्वीही झाला. परंतु, या चित्रपटात काम केल्यानंतर मला असं जाणवलं की चित्रपट माध्यमासाठी एखाद्या कलावंताकडून जो अभिनय लागतो, त्याच्या तुलनेत माझा अभिनय थोडा ‘लाऊड’ होता. त्यामागचं कारण म्हणजे मी मूळचा नाटकवाला. त्यामुळे शेवटच्या रांगेतील प्रेक्षकापर्यंत आपला आवाज पोचण्याच्या दृष्टीनं तसं त्या माध्यमासाठी बोलावं लागायचं. मात्र चित्रपट माध्यमाची गरज वेगळी होती. म्हणून मी या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षं एकही चित्रपट केला नाही. पहिल्या चित्रपटानंतर मी स्वीकारला तो ‘पांडू हवालदार’.

या चित्रपटात दादा कोंडकेंबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
– पहिल्या चित्रपटाप्रमाणे यावेळीही माझ्या नावाची दुसर्‍यांकडूनच शिफारस झाली होती. काहींनी दादांना मलाच या चित्रपटात घेण्याचा आग्रह केला होता. म्हणून बहुधा त्यांनी माझी निवड केली असावी. ‘पांडू हवालदार’ हिट झाला. त्यानंतर ‘तुमचं आमचं जमलं’ आणि ‘राम राम गंगाराम’ हे आणखी दोन चित्रपट मी त्यांच्यासोबत केले. तेही हिट ठरले.

तसं असूनही मग दादांच्या पुढील चित्रपटांमध्ये तुम्ही का नव्हतात ? त्यावेळी एक अशी चर्चाही कानावर आली की अभिनयाबाबत तुम्ही दादांना खाल्ल्यामुळेच त्यांनी तुम्हांला पुन्हा त्यांच्या चित्रपटात ‘रिपीट’ केलं नसावं.
– दादांनी मला पुढील चित्रपटांमध्ये का घेतलं नाही, याचं कारण आजतागायत मलादेखील माहित नाही. तुमच्या सांगण्यानुसार ते एक कारण माझ्याही कानावर आलं होतं. या काळात मी खूप व्यग्र होतो. सतत माझं शूटिंग सुरू होतं. तसेच मी असंही ऐकलं होतं की मी खूप बिझी असल्यामुळे दादांनी माझ्या नावाचा पुन्हा विचार केला नाही. तसा मी खूप बिझी होतो हे खरंय. परंतु, हेदेखील तेवढंच खरं की, दादांनी मला त्यांच्या नवीन चित्रपटासाठी विचारलं असतं तर मी त्यांच्यासाठी निश्‍चितच वेळ काढला असता. त्यांना मी नकार दिला नसता.


मराठी चित्रपटांमध्ये ‘कॉमेडीयन’ म्हणून चांगलं यश मिळत असतानाही तुम्ही ‘व्हिलन’ साकारण्याचा धोका का पत्करलात?
– मुळात मी स्वतःला विनोदी नट मानत नाही. मी ‘कॅरेक्टर ऍक्टर’ आहे. माझे कॉमेडी रोल्स प्रेक्षकांना खूप आवडले ही गोष्ट वेगळी आणि आपल्याकडे एखादी गोष्ट आवडली की तोच शिक्का त्या कलाकार बसतो. माझ्याबाबतही नेमकं तसंच घडलं. परंतु, मी ‘कॅरेक्टर ऍक्टर’ असल्यामुळे ‘व्हिलन’च्याही भूमिका स्वीकारल्या आणि त्या यशस्वीही करून दाखवल्या. ‘अरे संसार संसार’मधला माझा खलनायक प्रेक्षकांना खूप आवडला होता.

विनोदी भूमिकांमध्ये यशस्वी होण्यासाठी कलाकारामध्ये कोणता गुण असायला हवा असं तुम्हांला वाटतं?
– कॉमेडीपटांमध्ये ‘टायमिंग’ खूप महत्त्वाचं असतं. या ‘टायमिंग’चा संगीताशी जवळचा संबंध आहे. मला रिदम, बीटचा चांगला सेन्स आहे. मी सहाव्या वर्षापासून तबला वाजवतोय. त्यामुळेच माझी संगीताची आवड मला विनोदी भूमिका यशस्वीपणे साकारण्याच्या कामी आली.
भूमिकेची निवड तुम्ही कशाच्या आधारावर करता?
– चित्रपटाची गोष्ट सर्वात महत्त्वाची. त्यानंतर मग माझी भूमिका. भूमिकेचा प्रवास मी बारकाईनं पाहतो. मी पडद्यावर किती काळ दिसतो यापेक्षा मी पडद्यावर काय करतो हे अधिक महत्त्वाचं. कथेतलं काही वेळा पटकथेत नसतं आणि पटकथा संवादामधून खुलत नाही. त्यामुळे पूर्ण लिहिलेलं कथानक वाचायला प्राधान्य देतो.

दिग्दर्शकाच्या कामात कधी हस्तक्षेप होतो का तुमचा?
– हा थोडा वादाचा विषय आहे. परंतु, बर्‍याच दिग्दर्शकांना काही सांगितलेलं आवडत नाही. त्यामुळे काही चित्रपट आपण का केले असा प्रश्‍न मलासुद्धा पडतो.

इतकी वर्षं तुम्ही या क्षेत्रात काम करताय. काही करायचं राहिलंय असं वाटतं का?
– मी आजवर काहीच केलेलं नाही अशी माझी भावना आहे. आणखी खूप काही करायचंय हे मला माहिती आहे. मला खूप कमी संवाद असणारी एखादी भूमिका करायला आवडेल. ही भूमिका फक्त तिच्या डोळ्यांतून बोलेल.

इतक्या वर्षांमध्ये चित्रपटाचं दिग्दर्शन कधी करावंसं वाटलं नाही का?
– वाटलं ना. परंतु, चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तेवढा वेळ द्यायला हवा. तो मला कधीच मिळाला नाही. परंतु, भविष्यात एखादं चांगलं कथानक मिळालं तर नक्कीच दिग्दर्शन करीन.

चित्रपट आणि नाटक यापैकी कोणतं माध्यम तुम्हांला अधिक आवडतं?
– दोन्हीही सारखीच आवडतात. कारण प्रत्येकाचं स्वतंत्र असं बलस्थान आहे. नाटकात तुम्हांला समोरच्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून स्वतःला काही गोष्टी बदलता येतात. मात्र चित्रपटामध्ये ते स्वातंत्र्य नसतं. ‘कंटिन्युटी’ सांभाळून तुम्हांला तुमचं काम करावं लागतं.

नाना पाटेकर, लक्ष्मीकांत बेर्डे या सहकलावंतांबद्दल काय सांगाल?
– नानाबरोबर मी ‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक आणि दोन-तीन चित्रपटच केले. मात्र आम्हा दोघांचं नातं खूप जवळचं आहे. लक्ष्मीकांतबरोबर मी पन्नासहून अधिक चित्रपट केलेत. नाना एखाद्या फणसासारखा आहे. वरून काटे नि आतून गोड. सर्वांना सदैव मदत करायला तयार. लक्ष्मीकांतला माझ्याबद्दल खूप आदर. ‘धुमधडाका’मध्ये शरद तळवरकरांबरोबरच्या त्या गाजलेल्या प्रसंगामध्ये त्याच्या तोंडचे वेगवेगळे आवाज मी काढले होते.

कलावंत म्हणून काम करणार्‍या नवीन पिढीला मार्गदर्शन करताना तुम्ही कधी दिसत नाही. त्यामागचं काय कारण असावं?
– सध्याची नवीन पिढी खूप हुशार आहे. या ऐकण्याची दुसर्‍याकडून ऐकण्याची मनःस्थिती नाही. ‘त्यामुळे तुम्ही कोण हे सांगणारे?’ असं स्वतःला म्हणवून घेत अपमानित व्हायचं मला आवडणार नाही. मीदेखील दुसर्‍यांचं काम पाहूनच हळूहळू शिकत गेलो. दुसर्‍याची नक्कल न करता, त्याच्यातील चांगल्या गोष्टी घेत त्या माझ्या पद्धतीनं सादर केल्या. नवीन पिढीनंही तसंच करावं असं मला वाटतं.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया