अतिथी कट्टा

दिनांक :

आठवणी `आलिया भोगासी`च्या…

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा २७ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्तानं सीमा देव यांनी लिहिलेल्या `सुवासिनी` या आत्मचरित्रामधील `आलिया भोगासी` चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भातला हा निवडक भाग.
——–

फेब्रुवारी महिना उजाडला. परीक्षेला एकच महिना राहिला, तोच पुन्हा सुरेश फाळके आले आणि आईला म्हणाले, ““मी तुमच्याबरोबर येतो पाहिजे तर! पण एकदा फिल्मिस्तानला जाऊन तर या.”“ माझ्या मनात जायचं बिलकुल नव्हतं! कारण एक तर सिनेमांत काम करायची बिलकुल इच्छा नव्हती; त्यात शरीर किडकिडीत, वय लहान, उंची ५ फूट ३ इंच. त्यामुळे मी आणखीनच बारीक दिसायचे. पण माझा चेहरा मात्र चांगला आहे, असं बुधकर व फाळके म्हणत असल्यामुळे शेवटी विचार केला, “एवढं म्हणताहेत तर जाऊन बघू या!”
आम्ही फिल्मीस्तान स्टुडियोचा पत्ता घेतला आणि १६ फेब्रुवारी १९५७च्या दिवशी चर्नीरोड स्टेशनवर येऊन बोरीवली लोकल पकडली. थर्डक्लासच्या डब्यात जाऊन बसले. तोपर्यंत मी स्कर्टब्लाऊज घालत असल्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीची साडी नेसले. हिरवट रंगाची साडी, लांबसडक केसांच्या पाठीवर दोन वेण्या, त्यात लावलेला मोगऱ्याचा गजरा, त्यावेळी आमच्या दृष्टीने हीच फॅशन होती. ग्रॅंटरोड स्टेशनवर गाडी थांबली आणि डब्यात एक २७-२८ वर्षाचा तरुण येऊन अगदी आमच्या समोरच्या बाकांवर बसला. साहजिकच माझं लक्ष गेलं ! मी आईच्या कानांत कुजबुजले, `”अग तो बघ, समोर बसलाय ना, तो रमेश देव आहे, आपण आंधळा मागतो डोळा चित्रपट पहिला ना ? त्यातला हा व्हिलन !”` व्हिलन म्हटल्यावर आईने जरा रागानेच त्यांच्याकडे पाहिलं, आणि लगेच खिडकीबाहेर पाहायला लागली.
माझं लक्ष अधूनमधून त्यांच्याकडे जात होतं आणि गंमत म्हणजे तेही माझ्याकडेच पाहत होते. गोरेगाव स्टेशन आलं. रमेश देव उतरले. पाठोपाठ आम्ही मायलेकीही उतरलो. ते पुढे आणि मागून आम्ही चाललो होतो. त्यांनी २/३ वेळा मागे वळूनही पाहिलं ! आम्ही एकदमच स्टुडियोत शिरलो.
स्टुडियोचे मालक तोलाराम जालन ह्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो. तिथे दत्ता धर्माधिकारी, वसंत चितळकर वगैरे बसले होते. माझी स्क्रीनटेस्ट घ्यायची ठरली. मला मेकअप रूममध्ये नेलं ! केवढा मोठा तो स्टुडिओ, मेकअपरुममध्ये मोठं ड्रेसिंग टेबल, त्यावर अनेक तऱ्हेची मेकअपची सामग्री ! मिसेस परेरा नावाच्या हेअर ड्रेसरला माझी हेअरस्टाईल करायला सांगितली. त्यांनी मोठ्या रोलर्समध्ये माझे केस गुंडाळले आणि एका मोठया लाईटसारखं काहीतरी होतं, त्यात माझं डोकं घातलं ! नंतर तात्या कानडे नावाचे म्हातारे मेकअपमन आले, त्यांच्या ताब्यात मी माझा चेहरा दिला.
मेकअप झाल्यावर तयार होऊन मी कॅमेऱ्यासामोर आले, माझे २/३ क्लोजअप्स घेतले. कॅमेरामनच्या मते चेहरा कॅमेऱ्याला योग्य होता. स्क्रीनटेस्टमध्ये मी पास झाले. मेकअप उतरवून ऑफिसमध्ये गेले. तोलाराम जालन त्या वेळी रमेश देवांशी बोलत होते. त्यांचा करार ठरला आणि ते माझ्याकडे वळले. मला त्यांनी सांगितलं, ‘तुला ४५० रुपये पगार मिळेल, पण रोज फिल्मिस्तानमध्ये सकाळी येऊन हजेरी लावावी लागेल; काम असो अगर नसो’, त्यांच्या तोंडून ४५० रु. पगार ऐकल्यावर मला त्यांचे पुढचे शब्दच ऐकू आले नाहीत. ४५० रुपयांत व्यवस्थित चाललेलं घर मला दिसायला लागलं ! मी आणि आई आनंदात घरी परतलो. ही आनंदाची बातमी ऐकून घरांत सर्वांनाच खूप बरं वाटलं. आम्ही सगळ्यांनी हिशोब केला. १६रु. घरभाडं, ५/७ रु.लाईट, ५०/६० रुं भावाची फी, दुसऱ्या नंबरच्या बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न नव्हता. कारण ती मॅट्रिकच्या परीक्षेला बसलीच नाही आणि पुढे शिकायचीही तिची इच्छा नव्हती. ती गाणं शिकत होती आणि कोरसमध्ये गातही होती. तिचा आवाज चांगला होता – फिल्मिस्तानच्या प्रवेशाने माझं शिक्षण तर संपलंच होतं ! नववीची परीक्षा द्यायची फार इच्छा होती. पण शूटिंगमुळे ते जमणार नव्हतं, तेव्हा वरील सर्व खर्च करून बरेच पैसे राहणार होते – त्यातून सोनं घ्यावं असं मला वाटलं ! बहिण म्हणाली,“ घराला रंग लावू या !” असे अनेक बेत आम्ही केले. बऱ्याच दिवसांनी आमच्या घरातली विवंचना जणू कोपऱ्यात जाऊन बसली होती.
दुसरा दिवस उजाडला. मी आणि आई फिल्मिस्तानमध्ये जाण्यासाठी निघलो. पण तिकीटासाठीही जवळ पैसे नव्हते. आमच्या वरच्या मजल्यावर रमा कामत नावाची बाई रहात होती. त्यांचा आमचा चांगला घरोबा होता. आईने तिच्याकडे पैसे मागितले, त्यांची परिस्थिती यथातथाच होती. त्या म्हणाल्या, `“ताता, (माझ्या आईला आम्ही सगळे ताताच म्हणत असू ) माझ्याकडेही पैसे नाहीत. पण देवासाठी जो भाग मिळालेल्या पैशातून काढतात, त्यात थोडे पैसे आहेत ते घेऊन जा – नाहीतर हेही काम जाईल.”`
आईचं मन भरून आलं, ते पैसे घेऊन आम्ही फिल्मीस्तान गाठलं. ऑफिसमध्ये जाऊन मी हजेरी मांडली, एवढ्यात एका शिपायाने, ‘जालनसाहेब बोलावताहेत’ असा निरोप आणला. मी व आई गेलो. ते म्हणाले, ‘काल तुला मी जो ४५० रु. पगार सांगितला – तो तुझ्यासारख्या नवीन मुलीला खूप जास्त आहे. असं तुमच्या मराठी लोकांचंच म्हणण आहे. तेव्हा आम्ही तुला २०० रु.पेक्षा जास्त देऊ शकणार नाही.’ माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, आपले अश्रू बाहेर येऊ न देता – मी ,’ठीक आहे’ असं म्हणून तिथून बाहेर पडले. तेव्हापासून माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी ते तिथेच थांबतं, बाहेर येत नाही.

आदल्या दिवशीचा आमचा सारा आनंद, उसाह मावळला होता. माझ्याबरोबर यायचं असल्यामुळे आईचे १०० रु. बुडणार होते – एकूण गोळाबेरीज एकच होणार होती. तरीही आम्ही ते स्वीकारलं, कारण दुसरा मार्गच नव्हता. थोड्याच दिवसात, ‘आलिया भोगासी’ ह्या माझ्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं ! जयश्री गडकर नायिका आणि मी तिची मैत्रीण. हा चित्रपट `उसना नवरा` ह्या नाटकावरून घेतला होता – सेटवर मला पाहिल्यावर जयश्री धर्माधिकारींना म्हणाली, ‘तुम्हांला दुसरी कोणी मुलगी मिळाली नाही का?’ ते ऐकून मन आणखी नर्व्हस झाले.
जयश्री चांगली गुबगुबीत होती. मेकअप केला की छान दिसायची. तिचा मेकअप लालसर आणि माझा नेहमी पांढरा असायचा. एक दिवस मी मेकअपमन तात्या कानडे आणि राम टिपणीस ह्यांना म्हटलं, `“तुम्ही माझा मेकअप पांढरा का करता ? जयश्रीसारखा लाल का करत नाही ?` ”ते हसून म्हणाले, `“बेबी, अग जयश्रीचा चेहरा गोबरा आहे आणि तुझे गाल आत आले आहेत – पांढऱ्या मेकअपमुळे तुझा चेहरा भरलेला दिसेल,”` तो ब्लॅक अंड व्हाईटचा जमाना होता- मला मात्र त्यावेळी त्याचं म्हणणं पटलं नाही.
सेटवर मला नीट काही जमतच नव्हतं ! सगळे तेव्हा माझी तर उडवायचे- पण मी कसं ऑक्टिंग करायला पाहिजे ते मात्र कुणी सांगत नव्हतं ! एकदा काय झालं, एक सीन होता- वधुवरसूचक मंडळाचा. रणजीत बुधकर मंडळाचे चालक होते- शंभूराव- मी व जयश्री तिथे जातो उसना नवरा मागायला. ते म्हणतात ५ रु. अडव्हान्स द्यावा लागेल ! ह्या सीनच्या रिहर्सलच्या वेळी माझ्या हातात पर्स उघडून पैसे दिल्याचा अभिनय करत होते. टेकच्या वेळी हातात पर्स असूनही मी पर्स उघडलीच नाही. नुसता उघडण्याचा व पैसे काढण्याचा अभिनय केला- शॉर्ट कट झाला- सगळेच कुचेष्टेने हसायला लागले. मला मात्र रडू यायला लागलं. वाटलं निघून जावं, ही लाईन आपली नाही, पण कोपऱ्यात खुर्चीवर बसलेल्या आईला बघून मनात निग्रह केला की नाही, आता इथून परत फिरणे नाही. आलेच आहे या लाईनमध्ये तर काहीतरी करूनच दाखवीन. ह्या चित्रपटात मात्र मी काहीच करून दाखवू शकले नाही हे वेगळं ! कसंतरी काम उरकलं इतकंच !
ह्याच शूटिंगमध्ये एकदा गंमतच झाली. एका सीनमध्ये मी माझ्या भावाला उसना नवरा बनवून जयश्रीकडे घेऊन येते. माझा भाऊ झाले होते रमेश देव ! सेटवर सोफा होता- मी व रमेश उभे होतो. कॅमेरामन प्रतापसिंहानी मला सांगितलं, रमेश देव तुमच्याजवळ आल्यावर मी ताबडतोब त्यांच्या क्लोजअपला येणार आहे, तेव्हा तुम्ही हळूच बाजूला व्हा ! झालं, रमेश जवळ येतात न येतात तोच मी उडी मारून बाजूला झाले. शॉट कट झाला. रमेश म्हणाले, `“अहो नलिनीबाई मी काही तुम्हांला खाणार नाही. तुम्ही सावकाश बाजूला व्हा !` आज हे आठवलं तरी हसू येतं !
चित्रपट पूर्ण होईपर्यंत रमेशबद्दलची माझी भीती कमी झाली. हा माणूस चांगला आहे, बोलायला हरकत नाही असं वाटल्याने मी थोडी मोकळी झाले. चित्रपट पूर्ण झाल्यावर नाव बदलायचा कार्यक्रम झाला. कारण नलिनी जयवंत तेव्हा चित्रसृष्टीत असल्याने आता दुसरे नाव काय ठेवायचं हा प्रश्न पडला.
पूर्वी एका ज्योतिषाने, ‘तुम्ही ‘स’ वरून नाव ठेवा, तुम्हांला लकी आहे”,` असं सांगितलं होतं ! ५६-५७च्या आसपास ‘नूतन’ ह्या अभिनेत्रीचा `सीमा` हा चित्रपट खूप गाजला होता. माझा भाऊ म्हणाला, ’तू सीमा नाव ठेव !’ अशा तह्रेने माझं दुसर्यांदा बारस झालं आणि `सीमा` नाव ठेवलं गेलं !
त्याकाळी प्रत्येक चित्रपटाचा प्रीमियर शो खूप थाटात व्हायचा ! माझा हा पहिला चित्रपट ‘मॅजेस्टिक’मध्ये प्रदर्शित झाला. माझे फोटो पोस्टरवर लागले. आईला खूप कौतुक वाटले. ती मला म्हणाली, ‘तुझा जन्म ह्या थिएटरच्या बरोबर समोर असलेल्या डॉ.पागनिसांच्या हॉस्पिटलमध्ये झाला. तिथे खिडकीजवळची कॉट माझी होती. वेळ जाण्यासाठी मी थिएटरवर लागलेली पोस्टर्स पहात बसायची ! तेव्हा माहित तरी होतं का, की कुशीतल्या नवीन जन्मलेल्या आपल्या मुलीची पोस्टर्स अशीच इथे पाहायला मिळतील म्हणून. विधिलिखित काही औरच असतं. ते कधीच टाळता येत नाही.’
नंतर गिरगावतल्या मॉडर्न स्टोअर्समध्ये, जिथे माझ्या आईबरोबर काम करणाऱ्या सुर्वेबाईचं खातं होतं, तिथे मी गेले आणि त्यांच्या खात्यावर उधार चंदेरी साडी घेतली. प्रीमिअरला जाताना नेसण्यासाठी ! बिल्डींगमधल्या कामतबाईनी स्वतःचा नेकलेस आणून दिला. नटूनथटून मग सगळेच निघाले. माझ्या घरापासून थिएटर म्हणजे दोन मिनिटांचा रस्ता म्हणून चालतच गेलो. थिएटरवर खूप गर्दी होती. गर्दीतून कुणीतरी बोललं, `“टॅक्सीसाठी पैसे नाहीत वाटतं.` मला शरमल्यासारखं झालं !
‘आलिया भोगासी’ हा चित्रपट बरा चालला ! या चित्रपटाच्या वेळची आणखी एक आठवण सांगायची म्हणजे एकदा एका सीनच्या शूटिंगमध्ये मी शिफॉनची साडी नेसले होते. फिल्मिस्तानच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटात वापरलेली ती कामिनी कौशलची कंटीन्यूटीची साडी होती. शॉट असा होता की मी व रमेश सोफ्यावर बसलेले असतो आणि मी एकदम उठून उभी रहाते. शॉटच्या वेळी रमेशच्या बुटाचा पाय माझ्या साडीवर होता. मी झटक्यात उभी राहिल्यावर साडी फाटली ! झालं, ड्रेसमननी आरडाओरडा सुरु केली, `“कामिनीबाईंची कंटीन्यूटीची साडी, आता जालनसाहेब आम्हाला ओरडतील.`” मी तर घाबरूनच गेले. दुसराच दिवशी पगार मिळणार होता. मी पगार घ्यायला गेले तेव्हा १२५ रू. माझ्या हातावार ठेवले गेले. मी म्हटलं, ‘हे काय ?’ तर कॅशियर शिबन म्हणाले, ‘जालनसाहेबांना विचारा”` – मी तडक त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारलं ! ‘साडी फाटली त्याचे पैसे कापून घेतले’, असे जालनसाहेबांनी सांगितले. मला संताप आला आणि रडूही यायला लागलं. पण लगेच डोक्यात एक कल्पना येऊन मी म्हटलं, ‘माझ्या साडीवर रमेश देवांचा पाय होता म्हणून साडी फाटली. तेव्हा अर्धी रक्कम त्यांच्याकडूनही कापून घ्या.` अर्थात रमेशनी जालनसाहेबांना घोळात घेऊन आपले पैसे कापू दिले नाहीत हे वेगळं !
(सौजन्य – श्रीविद्या प्रकाशन, पुणे)
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया