अतिथी कट्टा

दिनांक :

असा बनला ‘सोंगाड्या’…

दिवंगत अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक दादा कोंडके यांचा १४ मार्च हा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं दादांचे पुतणे आणि त्यांच्या सर्व चित्रपटांची वितरण व्यवस्था पाहणारे श्री. विजय कोंडके यांनी दादांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाला दिलेला हा उजाळा.
——–

दादा ही आमच्या घरातील अशी पहिली व्यक्ती की जिनं शाहीर म्हणून कलाक्षेत्रात प्रवेश केला. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे आपलं स्वत:चं लोकनाट्य दादांनी सुरू केलं. त्याआधी ते जनता सेवा दलात काम करायचे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:च बसविलेल्या काही लोकनाट्यांमध्येही कामं केली. ‘विच्छा…’चं लेखन वसंत सबनीस यांनी केलं होतं तर संगीतकार होते तुकाराम शिंदे. १९६५ मध्ये या लोकनाट्याला अमाप यश मिळालं. या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.
या लोकनाट्याचे प्रयोग सुरू झाले तेव्हा मी अकरावीत होतो. सुट्टी असली की मी प्रयोगाला हजर असे. विंगेत उभं राहून काय चाललंय हे पाहायचो. तेव्हा कधी कधी दादा मला रंगमंचावर नेऊन उभं करायचे. एखाद्या गाण्याच्या वेळी मी कोरसमध्ये गायचोदेखील. नंतर माझं कॉलेजचं शिक्षण पुण्यात झालं. मी हॉस्टेलला राहायचो. परंतु, दादांचा पुण्यात प्रयोग असला की त्यांना मी कधी ‘बालगंधर्व’ला, कधी ‘भरत नाट्य मंदिर’ला तर कधी ‘पुना गेस्ट हाऊस’ला जाऊन भेटायचो. प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं.
याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल कोसळला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रामधील परीक्षणामध्ये या चित्रपटावर खूप टीका करण्यात आली. लोकनाट्य गाजविणारा कलावंत चित्रपट माध्यमामध्ये साफ अपयशी ठरला, असं निरीक्षण दादांबद्दल नोंदवलं होतं. ही गोष्ट दादा आणि भालजी या दोघांनाही लागली. त्याचा परिणाम असा झाला की, भालजींनी दादांना कोल्हापूरला बोलावून घेतलं. ते दादांना म्हणाले, “ ‘तांबडी माती’चं अपयश फारसं मनाला लावून घेवू नकोस. कारण ती चूक तुझी नसून माझी आहे. कारण तुझ्या लोकनाट्यात तू ज्या पद्धतीची भूमिका करीत होतास, तशीच भूमिका मी तुला चित्रपटात द्यायला हवी होती. मात्र मी तुला या चित्रपटात पैलवानाच्या मित्राची भूमिका दिली. प्रेक्षकांना ही भूमिका पाहण्यात जराही रस नव्हता. त्यामुळे तुला चुकीच्या भूमिकेमध्ये पाहून त्यांचा हिरमोड झाला. परंतु, जे झालं ते झालं. आता यापुढं तू स्वत: एका नवीन चित्रपटाची निर्मिती कर. सोंगाड्याची भूमिका नजरेसमोर ठेवून कथानक घे आणि संपूर्ण चित्रपट तुझ्याभोवती गुंफ. असा चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतील” मात्र दादांना स्वत: चित्रपटाची निर्मिती करायची नव्हती. कारण दादांच्या मते ज्यांनी ज्यांनी त्या काळात चित्रपटाची निर्मिती केली होती, ते सगळे अक्षरश: रस्त्यावर आले होते. मग भालजी दादांना म्हणाले, “मग तू काय करणार तरी काय आहेस यापुढं ?” त्यावर दादा म्हणाले, “मी स्वत:चं हॉटेल काढणार आहे.” त्यावर बाबा म्हणाले, “चांगली गोष्ट आहे हॉटेल काढायचा विचार तुझ्या मनात आहे ते. पण तुला साधा चहा तरी बनवता येतो का रे ?” या प्रश्नावर दादांचा नकार ऐकून भालजी हसत म्हणाले, “अरे मग तू कसा काय हॉटेल चालवणार आहेस… ज्या माणसाला साधा चहा बनवता येत नाही, त्याचं हॉटेल चालूच शकणार नाही. हॉटेल काढणं हे तुझं काम नाही. तू हाडाचा कलाकार आहेस. त्यामुळे कला हेच तुझं क्षेत्र आहे.” परंतु, यानंतरही दादांचं होय-नाही असंच चाललं होतं. ते पाहून भालजी पुन्हा दादांना म्हणाले, “तू खूप घाबरतो दिसतो आहेस. तेव्हा एक काम कर. पिक्चर चाललं तर ते तुझं आणि पडलं तर ते भालजी पेंढारकरचं. काय म्हणतोस बोल…” भालजींच्या तोंडून हे शब्द बाहेर आल्यानंतर मग दादांच्या जीवात जीव आला.
भालजींनी सांगितलेल्या कथासूत्राचा वसंत सबनीसांनी विस्तार करून ‘सोंगड्या’ चित्रपट लिहिला. या सुमारास मी माझं बीकॉमचं शिक्षण नुकतंच पूर्ण केलं होतं. कोल्हापूरला जाऊन मी ‘सोंगाड्या’चं शेवटच्या चार दिवसांचं चित्रीकरणही पाहिलं. यथावकाश हा चित्रपट तयार झाला. प्रदर्शनासाठी त्याच्या २५-३० ‘ट्रायल्स’ही झाल्या.
परंतु, कोणताही वितरक त्याला हात लावायला तयार होईना. वितरकांच्या या कृतीमागचं कारण म्हणजे ‘सोंगाड्या’मधील हाफ पॅंटमधले दादा कोणालाही रुचले नव्हते. त्या काळात नायक म्हणून आघाडीवर असलेल्या अरुण सरनाईक किंवा सूर्यकांतला मुख्य भूमिका द्यायला हवी तसेच नायिका म्हणून नवोदित उषा चव्हाणच्या जागी जयश्री गडकरांना घ्यायला हवं होतं, असं वितरकांचं मत होतं. त्यामुळे या वितरकांनी दादांना तुम्हीच आता या चित्रपटाचं डिस्ट्रिब्युशन करा असं सांगितलं. त्यावर दादा म्हणाले, ‘हे डिस्ट्रिब्युशन म्हणजे नेमकं काय असतं ?’ दादांनी ‘डिस्ट्रिब्युशन’ हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता.

त्यावर दादांना सांगण्यात आलं की सुरुवातीला तुम्हाला एक स्वत:चं ऑफिस घ्यावं लागेल. तिथं बसून तुम्हाला चित्रपटगृहांच्या मालकांशी एक अॅग्रिमेंट बनवावं लागेल नि मग तो चित्रपट तिथं प्रदर्शित केला जाईल. याला ‘डिस्ट्रिब्युशन’ असं म्हणतात. त्यावेळी ‘सोंगाड्या’वर दादांनी एक लाख रुपये खर्च केले होते आणि त्यांच्याकडे आता ऑफिस घेण्यासाठी एक रुपयाही शिल्लक नव्हता. दादांना ‘विच्छा…’चा १ प्रयोग केल्यानंतर सर्व खर्च जाऊन ८०० ते ९०० रुपये मिळायचे. त्यामुळे चित्रपटावर काही खर्च करण्यापेक्षा आता यापुढे कायम नाटकच केलेलं बरं. ताबडतोब पैसे हातात तरी मिळतात, असा विचार दादांच्या मनात घोळत होता. मात्र जो चित्रपट केलाय, त्यातून बाहेर पडणं तर गरजेचं होतं.याचवेळी दादांना कोणीतरी सल्ला दिला की एखाद्या व्यक्तीला कमिशन देवून हा चित्रपट प्रदर्शित करा. तसेच या व्यक्तीच्या हाताखाली तुमच्या घरामधीलच एक व्यक्ती ठेवा. म्हणजे काही काळानं ही व्यक्ती तयार होऊन तीच तुमच्या चित्रपटाचं वितरण करेल. त्यानुसार दादांना हे काम करण्यासाठी सुधाकर दातार नावाचा एक माणूस मिळाला आणि त्याच्याबरोबर राहण्यासाठी दादांनी मला निवडलं. खरं तर मला चित्रपट व्यवसायात जराही यायची इच्छा नव्हती. परंतु, दादांची मला एवढी भीती वाटायची की, त्यांच्या धाकापायी मी हे काम करण्यास त्यांना होकार दिला. लहानपणी मी दादांकडून चिक्कार मार खाल्ला होता. त्यांना शाहीर व्हायचं असल्यामुळे त्यांनी नोकरी न करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हांला आमची इच्छा नसतानाही गावं लागे.
पुण्याच्या ‘प्रभात’ वर्तमानपत्राच्या ऑफिससमोर साने यांचं लग्नासाठी गाद्या, भांडी देण्याचं एक ऑफिस होतं. ते आम्ही मासिक ५० रुपये दरानं भाड्यावर घेतलं. अवघ्या ७० स्क्वेअर फुटांचं ते ऑफिस होतं. त्याचं काम बघण्यासाठी दुसरा कोणी कर्मचारी नेमणं शक्यच नव्हतं. झाडू काम, पिण्याच्या पाण्याचा मटका भरण्याचं काम मलाच करावं लागे. त्यावेळची आणखी एक गमतीशीर आठवण म्हणजे माझ्या कॉलेजमधल्या मुली त्या रस्त्यावरूनच जायच्या. त्यामुळे त्या गोडावूनच्या समोर आल्या की मी तोंडावर पुस्तक धरून काहीतरी वाचत असल्याचं नाटक करीत असे. परंतु, एकदा त्यांनी मला ओळखलंच. ‘अरे विजू तू इकडं काय करतोस ?’ असं विचारून त्यांनी एकदा माझी फजिती केलीच होती. थोडक्यात, मला हे काम करताना खूप लाज वाटायची. डोक्यावर पत्रा असल्यानं मरणाचं गरम होई. पंखा नाही. परंतु, दादांच्या भीतीमुळे नाइलाजास्तव तिथं मी बसायचो. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी आणखी एक विलक्षण घटना घडली.
एके दिवशी एक जण आमच्या गोडाऊनमध्ये आला नि मला म्हणाला, “अरे विजू तुम्हांला काय कळतं की नाही… कोणत्या तारखेला चित्रपट तुम्ही प्रदर्शित करताय… अमावस्येला कुणी चित्रपट प्रदर्शित करतं का…” हे ऐकल्यानंतर मीसुद्धा उडालो. प्रदर्शनाच्या दिवशी अमावस्या आहे, हे मलाही माहित नव्हतं. मी दादांना हे सगळं सांगितलं. तेव्हा त्यांनी ‘भानुविलास’च्या मालकाशी (व्ही. व्ही. बापट) बोलून प्रदर्शनाची तारीख थोडी पुढं ढकलता येईल का ते बघायला सांगितलं. परंतु, पुढील चित्रपटांच्या प्रदर्शनाचं नियोजन ठरलं असल्यामुळे बापटांनी त्यास नकार दिला. दादांना मी ही गोष्ट सांगितली. त्यावर ते म्हणाले, “विजू घे देवाचं नाव आणि लावून टाक पिक्चर अमावस्येलाच. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे एकदाच.” अशापद्धतीनं तो चित्रपट तिथं आम्ही अमावस्येलाच प्रदर्शित केला आणि त्यानं पुढं ६० आठवडे व्यवसाय केला. मुंबईतलाही प्रदर्शनाचा किस्सा भन्नाट होता. ‘सोंगाड्या’साठी दादरचं ‘कोहिनूर’ थिएटर आम्हांला फक्त दोन आठवड्यांसाठी देण्यात आलं होतं. त्यानंतर देवआनंदचा ‌‘तेरे मेरे सपने’ चित्रपट तिथं लागणार होता. विशेष म्हणजे सोंगाड्या दोन आठवडे हाऊसफुल होऊनही तो तिथून काढला जाणार होता. तेव्हा दादांनी मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. स्वत: बाळासाहेब ‘कोहिनूर’ला आले आणि ‘सोंगाड्या’ला प्रेक्षकवर्ग असेपर्यंत ‘कोहिनूर’मधून हा चित्रपट काढला जाणार नाही, असं आश्वासन चित्रपटहगृहाच्या मालकाकडून घेण्याचा इतिहास सर्वज्ञात आहेच. हा चित्रपट तिथं तब्बल ३२ आठवडे चालला. पुढं नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मी हा चित्रपट पोचवला.
सुरुवातीला ५ प्रिंटनं आम्ही ओपनिंग केली. पहिली प्रिंट ‘भानुविलास’ला लागली. दुसरी चिंचवड येथील ‘अजिंठा टुरिंग टॉकिज’ला, तिसरी भोरमधील ‘मराठा चित्रमंदिर’, चौथी लागली सासवडमधील ‘दौलत चित्रमंदिर’ आणि पाचवी पुण्यातील ‘छाया टॉकिज’ला लागली. याच प्रिंट आम्ही पुढं ठिकठिकाणी फिरवत बसलो. जसजसे पैसे येऊ लागले, तसतशी मग प्रिंटची संख्या वाढवत नेली. अशापद्धतीनं ‘सोंगाड्या’च्या पाच प्रिंटवरून सुरू झालेला प्रवास मग ३० प्रिंटसवर जाऊन पोचला. त्यावेळी चित्रपटाची एक प्रिंट बनवायला २८०० ते ३००० रुपये एवढा खर्च येई. कालांतरानं वितरणाचं तंत्र मी महिन्याभरात शिकून घेतलं. वितरणाच्या समस्येला कंटाळून दादा एकरकमी चित्रपट कोणाला तरी विकून त्यातून बाहेर पडण्याचा विचार करीत होते. तेव्हा मी ठरवलं की आता काय तो निर्णय घ्यायलाच हवा. दादा हे भडक माथ्याचे होते. तसेच ते निव्वळ कलाकार होते. त्यांना चित्रपटाचा व्यवसाय जराही ठाऊक नव्हता किंवा तो जाणून घेण्यात त्यांना रसही नव्हती. तेव्हा पुढचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपणच आता हे सर्व पाहायला हवं असं मी ठरवलं.
गिरगावच्या ‘साहित्य संघा’त ‘विच्छा…’चा प्रयोग सुरू होता. त्यानुसार तिथं जाऊन मी दादांना भेटलो. मध्यांतराला भेटून मी दादांना यापुढं तुमच्या चित्रपटाचं सर्व वितरण बघेन असं सांगितलं. दादांना माझा विचार पटला. ‘सोंगाड्या’च्या व्यवहाराबद्दलचं चेक बुक दातारांकडे असायचं. त्याच्यावर रकमा न टाकता दादांनी सह्या केल्या होत्या. दातारांशी संपर्क साधून दादा त्यांना म्हणाले, “दातार, आपापसात भांडणं नकोत. आपण गोडीगुलाबीतच राहूया. तुम्ही या चित्रपटासाठी केलेल्या कामाबद्दलच्या तुमच्या मानधनाचा आकडा काढा. चेकबुक तुमच्याकडेच आहे. त्यावर तुम्हीच काय तो आकडा टाका. सही मी आधीच खाली केलेली आहे. चेक फाडून घ्या आणि चेकबुक परत करा.” एवढा विश्वास दादा समोरच्यावर टाकायचे. अशापद्धतीनं तो व्यवहार पूर्ण झाला नि तेव्हापासून मी दादांच्या सर्व चित्रपटांचा वितरक झालो नि मराठी चित्रपटसृष्टीत यशाचा एक नवीन मापदंड निर्माण झाला.

-विजय कोंडके

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया