अतिथी कट्टा

दिनांक :

‘रीमाताई, तो संवाद फक्त चित्रपटासाठीच होता…’

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं नुकतंच निधन झालं. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि रीमाताई यांचं खूप अनोखं नातं होतं. रीमाताईंबरोबरील आपल्या चित्रपटांच्या आठवणींबरोबरच अहिरे यांनी काही वैयक्तिक आठवणींनाही या लेखातून उजाळा दिला आहे.
——-

१९९७-९८ची ही घटना असेल. ‘श्रीमान श्रीमती’ मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. आधी या मालिकेचं लेखन अशोक पाटोळे करायचे. त्यांच्यानंतर मी ही मालिका लिहायला लागलो. तेव्हा सेटवर पहिल्यांदा माझी रीमाताईंबरोबर भेट झाली. त्या वेळी त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यामुळे त्यांच्या सेटवर आपण जात आहोत, त्यांच्याबरोबर आपण काम करतो आहोत, याचं मला खूप अप्रूप वाटायचं. जसजसा मी त्यांच्याबरोबर काम करीत गेलो, तसतसं या अभिनेत्रीचं मोठेपण मला समजत गेलं.
‘सैल’ चित्रपटावेळच्या त्यांच्याबरोबरच्या माझ्या भरपूर आठवणी आहेत. या चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ मी त्यांना वाचून दाखवली. ती ऐकल्यानंतर लगेचच रीमाताईंनी हा चित्रपट करण्यास होकार दिला. या चित्रपटात काम करण्यासाठी रीमाताईंनी फक्त ५० हजार रुपये घेतले होते. मला हा चित्रपट फक्त पाच रात्रींमध्ये पूर्ण करायचा होता. एका रात्रीची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ही घाई करण्यामागचं कारण म्हणजे चित्रपटाची नायिका संपूर्ण पावसात भिजत असतानाच दृश्यक्रम चित्रीत करायचा होता. हा चित्रपट शूट करायचा तेव्हा थंडीचे दिवस होते. त्यामुळे मुख्य नायिकेला पाऊस आणि थंडीचा त्रास कमीत कमी व्हावा, या हेतूनं मला लवकरात लवकर ही दृश्यं चित्रीत करायची होती. ऐन थंडीत पाच रात्री पावसात भिजत काम करण्याची माझी अट रीमाताईंनी लगेच मान्य केली.
रीमाताईंबरोबर या चित्रपटात मोहन जोशी यांचीही महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. या चित्रपटाचं चित्रीकरण बारामतीजवळ कल्याण तावरे यांच्या फार्म हाऊसमध्ये होणार होतं. या फार्म हाऊसमधील घर रीमाताईंना खूपच आवडलं. त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यास नकार देऊन रीमाताईंनी याच घरात आपण चित्रीकरण होईपर्यंत राहणार असल्याचं सांगितलं. तेव्हा मी आणि रीमाताई असे दोघेच या घरात राहिलो. बाकीचे सर्व कलावंत हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या बंगल्यातील एका झाडावर एक छान खोली होती. त्याला आम्ही ‘ट्री हाऊस’ म्हणायचो. तिथं मी राहिलो आणि रीमाताई या घरात राहिल्या. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त या बंगल्याचा ‌‘केअरटेकर’ही तिथं राहायला होता. शूटिंगव्यतिरिक्त रीमाताईंबरोबर खूप वेळ घालवायची संधी मला यावेळी मिळाली. एकदा ‘स्क्रीप्ट’ वाचनावेळी कलावंतांच्या कामाबद्दल आमची अशीच चर्चा झाली. एखाद्या कलावंताचं मोठेपण सांगताना आपण एवढी एवढी वर्षं त्यांनी काम केलं असं म्हणतो. रीमाताईंनी हे सर्व ऐकून घेतलं आणि त्या म्हणाल्या, हे सगळं खरंय, पण लक्षात राहण्यासारखं काय केलं, हे नकोका पाहायला. आपण फक्त काम, काम करीत असतो. पण महत्त्वाचे टप्पे विसरतो. आपण आपल्या कामातनं ‘माइलस्टोन्स’ उभे करायला हवेत. तिकडे कलावंतानं लक्ष द्यायला हवं. रीमाताईंचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर एकदम सेटवरचं वातावरणच बदललं. सगळे कलावंत एकमेकांकडे बघत राहिले. त्यानंतरची पाच मिनिटे शांततेत गेली.
त्यांना फार आवडायचं. यावेळी आमच्या इतर बऱ्याच गप्पा व्हायच्या. साधारण दीड-दोनपर्यंत आम्ही आमचं काम सोडून इतर कोणत्याही विषयावर बोलायचो. मग जेवण करून पुन्हा झोपायचो आणि सायंकाळी सात वाजता पुन्हा आमचं चित्रीकरण सुरू व्हायचं. यावेळी रीमाताईंकडून आठ‌वणींचा खजिनाच माझ्यासाठी खुला झाला होता. आपल्याकडे सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की, मला अमूक अमूक व्यक्तीकडून खूप शिकायला मिळालं. परंतु, मी स्वत:ला खूप भाग्यवान मानीन. मला खरंच खूप काही त्या पाच दिवसांमध्ये मिळालं. त्यानंतर गोव्याला एका फिल्म फेस्टिव्हलसाठी आम्ही एकत्र होतो. एकदा साहित्यिक विश्वास पाटील, कल्याण तावरे, रामदास फुटाणे, रीमाताई, मी आणि काही कवी मंडळी रायगडावर गेलो होतो. पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीचा स्क्रीप्ट हस्तांतरण सोहळ‌ा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यानंतर रीमाताई म्हणाल्या, ‘मी आज रात्रीचा मुक्काम गडावरच करणार. इथल्या गवतातच मी रात्री राहणार.’ मग मी माझ्याकडे असलेला टेंट तिथं लावला आणि आम्ही ती कोजागिरी पौर्णिमेची रात्र मस्त गप्पा, गाणी, गोष्टी, कवितांनी गाजवली. एक वेगळंच जग होतं ते.

थोडक्यात आमच्या दोघांमधलं नातं हे फक्त त्या अभिनेत्री आणि मी दिग्दर्शक एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. कल्याण तावरेंचं पुण्याजवळ रेह्याला एक मातीचं घर होतं. तिथंही आम्ही अधूनमधून जमायचो. सिनेमा, नाटक सोडूनही आमची छान मैत्री होती. ‘आमराई’ नावाचा एक चित्रपट मी त्यांच्याबरोबर लवकरच करणार होतो. विक्रम गोखलेंचीही त्यात महत्त्वाची भूमिका होती. सकाळी सात वाजता शूटिंग सुरू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ‘ट्रायल शो’ असा अनोखा प्रयोग आम्ही करणार होतो. ‘गिनीज बुक’मध्ये या विक्रमाची नोंद होणार होती. आमचं ‘स्क्रीप्ट रीडिंग’ही झालं. पावसाळा संपला की आम्ही हा चित्रपट करणार होतो. मात्र रीमाताईच अचानक निघून गेल्यामुळे ही ‘आमराई’ मला नाही वाटत आता पडद्यावर येईल. रीमाताईंबरोबर मी ‘सरोवर’ नावाचाही एक चित्रपट करणार होतो. या चित्रपटाचं स्क्रीप्ट मी त्यांना हिमालयात जाऊन वाचून दाखवलं होतं. हे दोन वेगळे चित्रपट मी त्यांच्याबरोबर करणार होतो. चित्रीकरणापूर्वीचं आमचं बरंच कामही झालं होतं. मात्र रीमाताईंच्या जाण्यामुळे दोन अनोखे प्रोजेक्ट अपुरे राहिल्याची रुखरुख कायम माझ्या मनात राहील.
‘सैल’मध्ये एक सीन होता. रीमाताईंना कार्यकर्ते ‘रिसीव्ह’ करण्यासाठी येतात आणि त्या मोहन जोशींबरोबर निघून जातात. त्यांच्या गळ्यात हार पडू लागतात. तसतसा त्यांच्या चेहऱ्यावर मद, उन्मत्तपणा चढायला लागलो. असा सीन होता. मी शॉट घ्यायला तयार झालो. पहाटेचे साडे पाच वाजले होते. कॅमेरा सुरू झाला. रीमाताईंच्या गळ्यात हार पडू लागले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एवढ्या झपाट्याने बदलले की मला कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळेना. परकाया प्रवेश काय असतो हे मी अवघ्या दोन फुटांवरून त्या पहाटे बघितला. माणसाचं मन, बुद्धी, शरीर बदलून जाणं म्हणजे नेमकं काय असते, ते तेव्हा मला खऱ्या अर्थानं जाणवलं. ते पाहिल्यानंतर माझ्या अंगावर सरसरून काटा आला. कॅमेरा चालू असताना एका क्षणात अशी जादू यापूर्वी मी रीमाताईंव्यतिरिक्त निळू फुले यांच्याबाबतही अनुभवली होती. ही आठवण मनात आली नि जाणवलं की किती थोर अभिनेत्रीला आपण आता गमावलं आहे.

‘अनुमति’ चित्रपटाचं स्क्रीप्ट मी रीमाताईंना वाचून दाखवलं. त्यांनी कधीच पैसे, शूटिंगच्या तारखा याबाबत माझ्याशी बोलणी केली नाहीत. किंबहुना कोणत्याही गोष्टीसाठी मला अडवलं नाही. ‘अनुमति’साठी मी त्यांच्याकडे फक्त तीन दिवस मागितले होते. त्यांच्यावर एक ३२ मिनिटांचा सीन होता. तो वाचल्यानंतर ‘अरे हे खूप साधं आहे. सोपं आहे. म्हणून ते करायला खूप कठीण आहे.’ असं त्या म्हणाल्या. या चित्रपटाचे छायालेखक गोविंद निहलानींना ही गोष्ट एकदम भावली होती. ‘करेक्ट कह रही है रीमा’ असं ते त्यावेळी म्हणाले होते. या चित्रपटातला हा सीन जरा काळजीपूर्वक पाहा. आमचा कॅमेरा जागेवरून हललेला नाही. अगदी साध्या पद्धतीनं हा सीन चित्रीत झालाय. चित्रपट पाहिल्यानंतर रीमाजी स्वत:च म्हणाल्या,‘अरे हा साधेपणा वर्क झालाय.’ एकदा मला असाच त्यांचा फोन आला नि त्या म्हणाल्या, “गजेंद्र, अरे मला विजयाबाईंचा फोन आला होता. ‘अनुमति’मधील कामाबद्दल त्यांनी माझं कौतुक केलंय.” मला त्यांच्या या बोलण्यातला ‘इनोसन्स’ अगदी प्रखरतेनं जाणवला. विजयाबाईंवरील पुस्तकातही रीमाताईंनी हा प्रसंग लिहिलाय. तुम्ही सध्या काय करताय आणि मी सध्या काय करतोय, अशाप्रकारचं आमचं बोलणं खूप कमी व्हायचं.
रीमाताईंची स्क्रीप्टची समज टोकाची होती. आपल्या भूमिकेचा आगापीछा त्यांना नेमका कळायचा. भरपूर वाचन नि अभ्यास केलेल्या त्या अभिनेत्री होत्या. अनुभव, वाचन नि अभ्यासानं त्यांच्यात विद्वत्ता आली होती. ती त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवायची. स्क्रीप्ट वाचली नि भूमिका साकारली असा प्रकार नव्हता. एकेका भूमिकेमध्ये त्या वर्ष वर्ष राहात. ‘अनुमति’मधील एका प्रसंगात विक्रम गोखले खूप घाईघाईत जेवत असतानाचं दृश्य आहे. या माणसाला किती दिवस जेवण मिळालेलं नाही, हे त्यातून सांगायचं होतं. रीमाताई विक्रमजींकडे पाहतात आणि टचकन त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. यासाठी मला वेगळा संवाद टाकावा लागला नाही. अभिनेत्यांकडून अशी एखादी गोष्ट दिग्दर्शकाला मिळाली की त्याचा आनंदही अवर्णनीय असतो. याच चित्रपटात रीमाताईंच्या तोंडी एक संवाद आहे… ‘बटण बंद केलं की लाईट जातो. तसं आपण प्रत्यक्ष आयुष्यातही जावं. पटकन.’ रीमाताईंचं अंत्यदर्शन घेताना माझ्या डोळ्यासमोर हाच प्रसंग सतत येत होता. त्यावेळी मला गाढ निद्रेत असलेल्या रीमाताईंना ओरडून म्हणावंसं वाटलं, “रीमाताई, हा संवाद फक्त चित्रपटासाठी लिहिला होता. तुम्ही तो प्रत्यक्ष आयुष्यात का अंमलात आणला ?”

– गजेंद्र अहिरे
(शब्दांकन : मंदार जोशी)
————

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा


काही निवडक प्रतिक्रिया:

निलेश मोरे

आपण चालवलेला उपक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, मराठी चित्रपटाविषयी लोकांना अधिकाधिक माहिती मिळावी खास करून जुने चित्रपट अशी योजना आपण राबवत आहात त्या बद्दल धन्यवाद!!!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया