अतिथी कट्टा

दिनांक : ०३-१०-२०१७

गप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…

बहुचर्चित ‘हलाल’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील आणि त्यामधील अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्याशी साधलेला हा संवाद.

शिवाजी लोटन पाटील:- मुस्लिम धर्मियांत ‘ट्रीपल तलाक’च्या पुढची ‘हलाला’ नावाची एक परंपरा आहे. संपूर्ण चित्रपट या दोन गोष्टींवर बेतलेला आहे. राजन खान यांच्या कथासंग्रहातील ‘हलाला’ नावाच्या गोष्टीवर हा चित्रपट आधारला आहे. ही गोष्ट केवळ १३ ते १५ पानांची आहे. ती चित्रपटासाठी आम्ही खुलवली आहे. खरं तर या चित्रपटात बर्‍याच कथा आहेत. परंतु, त्यात मला ही सर्वात भावलेली कथा आहे. या कथेमधील सर्व आशय मी लहानपणापासून माझ्या गावात पाहात आलोय. खरं तर दिग्दर्शक म्हणून मला पहिल्यांदा हाच चित्रपट करायचा होता. मात्र अशाप्रकारच्या विषयांना निर्माते सहसा मिळत नाहीत. म्हणून निर्मात्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला म्हणून मी त्यांचा विशेष आभारी आहे. कथा निश्‍चित झाल्यानंतर त्यातील व्यक्तिरेखांना साजेसे होतील असे कलाकारा आम्ही निवडले. चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव यांनी अतिशय चांगलं काम करून आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. माझा पहिला चित्रपट ‘धग’ मी माझ्या नांदुर्णी गावातच शूट केला होता. मर्यादित बजेटमुळे आपला कंट्रोल असलेल्या ठिकाणी चित्रपट चित्रीत करणं ही नेहमीच योग्य गोष्ट ठरते. म्हणूनच ‘हलाल’च्या वेळीही मी पुन्हा माझ्या गावाचीच निवड केली. मी त्या गावचाच असल्यामुळे संपूर्ण गावकर्‍यांची मला साथ लाभली. चित्रीकरणादरम्यान कसल्याही अडचणी आल्या नाहीत. या चित्रपटाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बरेच पुरस्कारही मिळाले. हा चित्रपट आम्ही विविध फस्टिव्हल्समध्ये पाठविला होता. यूएस आणि युकेमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होईल.

चिन्मय मांडलेकर:- हा माझ्यासाठी मराठी सिनेमा नाही. त्यामागचं कारण म्हणजे या चित्रपटात मी एकही मराठी शब्द बोललेलो नाही. माझं कॅरेक्टर सतत हिंदी आणि उर्दूमध्येच बोलतं. शिवाजीसर हे प्रख्यात दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘धग’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे राजन खान यांची गोष्ट आणि शिवाजीचं दिग्दर्शन असताना या चित्रपटाला मी नकार देऊच शकत नव्हतो. या चित्रपटाचं लोकेशन अगदी विलक्षण आहे. कोणत्याही सेटवर हा चित्रपट चित्रीत केलेला नाही. नांदुर्णी नावाच्या गावातील रीअल लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झाला आहे. नांदुर्णी हे दिग्दर्शकाचंच गाव आहे. मालेगावपासून थोडं दूर अंतरावर हे गाव आहे. महाराष्ट्रातलं एक छोटंसं खेडंही किती सुंदर दिसू शकतं, हे तुम्हाला या चित्रपटामधून पाहायला मिळेल. २०१५च्या नवरात्रीच्या आसपास आम्ही या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग केलं. मी खूप शांतपणे आणि छान असं काम बर्‍याच दिवसांनी केलं. कारण नॉर्मली आम्ही सिनेमे करतो तेव्हा खूप धावपळ असते. विस्कळीत स्केड्यूल्स असतात. लोकांचे येण्याजाण्याचे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे अगदी शांतपणे आणि निवांतपणे या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. एखादा चित्रकार आपल्याला सुचलेलं चित्र अगदी निवांतपणे काढायला सुरुवात करतो. थोडा वेळ थांबतो. पुन्हा तेच चित्र काढायला लागतो. अशाच पद्धतीनं शिवाजीसरांनी या चित्रपटाचं शूटिंग केलंय. संपूर्ण टीमबरोबर काम करताना मी खूप रिलॅक्स होतो. ह्या टीममधील दर्शन आणि संजय सोडला तर इतरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करीत होतो. पण मला तसं कधीही वाटलं नाही. या चित्रपटात मी ‘मौलाना’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याला या चित्रपटात ‘मौलाना’च म्हणत असतात. हे अत्यंत छान, शांत आणि सुस्वभावी असं पात्र आहे. पण जेव्हा चांगला माणूस एखाद्या ‘कॉम्प्लिकेटेड’ परिस्थितीला सामोरा जातो तेव्हा त्याच्या चांगलेपणाचा खरा कस लागतो. तेच माझ्यासाठी या सिनेमाचं वैशिष्ट्य होतं. या व्यक्तिरेखेमधील हे ‘कॉम्प्लिकेशन’ आमच्या पटकथाकारानं खूप छान पद्धतीनं दाखवलं असल्यामुळे मी ही व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीनं साकारू शकलो. या चित्रपटाचं सर्वात जास्त क्रेडिट मी निर्माता अमोल कांगणेला देईन. कारण जवळजवळ दोन वर्ष तो हा सिनेमा उराशी घेऊन बसलाय. दोन वर्षं आपली गुंतवणूक एखाद्या गोष्टीत अडकवून ठेवणे काही सोपी गोष्ट नाही. अशा प्रयत्नांना प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन प्रतिसाद दिला पाहिजे. तसं न घडल्यास अमोल कांगणे आपला दुसरा, तिसरा, पाचवा… सिनेमा करू शकणार नाही. जो त्यांनी खरं तर करायला हवाय. ‘हलाल’च्या प्रसिद्धीच्या जाहिरातींमध्ये विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील कंस महत्त्वाचेच आहेत. पण आम्हाला चित्रपटगृहात अधिक प्रेक्षक आले तर त्याचा आनंद अधिक होईल.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मच्छिंद्र माळी पडेगांव,औरंगाबाद


नटश्रेष्ठ राजा गोसावी यांचे जीवन चरित्र फारच सुंदर आहे. धन्यवाद!!
संदर्भ:- प्रतिक्रिया