ताज्या घडामोडी

अतिथी कट्टा

‘मिरांडा हाऊस’ प्रेक्षकांना खिळवून ठेवेल...
----
‘सावली’, ‘सावरिया डॉट कॉम’ आणि ‘अ रेनी डे’ या तीन चित्रपटांनंतर गोव्यातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राजेंद्र तालक ‘मिरांडा हाऊस’ नावाची कलाकृती घेऊन येत्या 17 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्याशी झालेली ही चर्चा.

झटपट रिव्हियू

वेडिंगचा शिनेमा


कधी पाहिली नाहीत अशी पात्रे नाहीत, जगावेगळे प्रसंग नाहीत, श्वास रोखणारा घाट नाही की कढ आणणारे दु:ख नाही…. आहे ती केवळ एका लग्नाची तयारी आणि आजच्या रीतीरीवाजाप्रमाणे त्याची बनवली जाणारी प्रिवेडिंग फिल्म. तरीही या नेहमीच्या, नित्याच्या, ठरलेल्या आणि पाहिलेल्या घटना व प्रसंगांना नव्या दृष्टीचा ताजेपणा बहाल करून, प्रसंगपात्रांच्या नित्याच्या वावरण्यातून विनोद नैसर्गिकपणे उगवण्यासाठीची उत्तम मशागत करून, हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्यायोग्य बनवला आहे. या चित्रपटातील जग सुखद आहे, स्वप्नाळू आहे, परीराज्यासारखे आदर्श वाटावे असे आहे. दु:ख असले तरी मखमली आहे आणि वेदना म्हटली तर राजवर्खी आहे.… नाती म्हणावीत तर आदर्श आणि स्वप्नवत आहेत. आपली प्रेयसी हो म्हणेल याची पंधरा वर्षे वाट पाहणारा आता कुठे हो सापडेल? मुलगी लग्नाची झाली तरी आपल्या बायकोवर अजूनही कविता करणारा डॉक्टर कुठे असतो? डॉक्टर बनताना कोणाच्याही प्रेमात न पडलेली मुंबईची मुलगी गावातील मोबाईल विकणाऱ्याच्या प्रेमात कुठे पडते? तर या सिनेमाच्या जगात ते सगळे आहेत. या जगाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका तालात, लग्नाचा शालू मोडणार नाही इतक्या नजाकतीने, शेवटपर्यंत सांभाळताना त्याचा डौलही दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी सांभाळला आहे. काहीतरी सिद्ध करण्याचा अट्टाहास टाळून जे कथेचे जग मनात दिसते त्यासाठी जागा करून देण्यासाठी स्वत:सह सर्वांना आटोक्यात ठेवल्याने ते साध्य झाले असावे. मुंबईतील इनामदार डॉक्टर दांपत्याची (सुनील बर्वे - अश्विनी काळसेकर) एकुलती मुलगी परी (ऋचा इनामदार ) सासवडला इंटर्नशीपसाठी गेलेली असताना आपल्या मोबाईलच्या दुकानात असलेल्या प्रकाशच्या (शिवराज वायचळ) प्रेमात पडते आणि दोघे लग्न करायचे ठरवतात. मोबाईलचे दुकान असले तरी प्रकाशचे कुटुंब मोठे शेतकरी आणि पैसेवाले कुटुंब आहे आणि आईवडिलांचा विरोध वगैरे नाही. त्यामुळे लग्नाचा एक भाग म्हणून विवाहपूर्व सिनेमा करायचा ठरतो. ती फिल्म करायचे काम येते ऊर्वी कडे (मुक्ता बर्वे). तिला गंभीर, महान प्रकारची दिग्दर्शिका व्हायचे आहे. पण स्वत:चे पैसे कमविण्यासाठी ते हे काम घेते. सोबत कॅमेरामन मदन (भाऊ) कदम, कोरिओग्राफर जम्बो (त्यागराज खाडिलकर) अशी टीम सासवडहून काम सुरू करते. मग सगळे ठरलेले नातेवाईक, आई (अलका कुबल आठल्ये), बाबा (शिवाजी साटम), मोठा भाऊ, वहिनी, सासरी गेलेली बहीण (बरोब्बर ओळखलंत - त्यांना एक चुणचुणीत मुलगा असतो, जो पत्रिकेत यायचं हं म्हणतो तो), चोवीस तास अतिउत्साही मित्रमंडळी, शूटिंगची गम्मत असा हा प्रवास एका पातळीवर लग्नापर्यंतचा, दुसऱ्या पातळीवर व्यक्तिगत उर्वीचा आणि तिसऱ्या पातळीवर परीच्या आईबाबांचा हा हास्य, विनोद, आणि आनंदाचा होतो. या सगळया गोड प्रवासात अश्रू किंचित खारटपणा आणतात, तीट लावण्याएवढे आणि त्याच हेतूने. सलील कुलकर्णी यांनी कथेला आवश्यक तितक्याच दृश्यात आणि आवश्यक तितक्याच शब्दांत मांडून चित्रपटाचा दृश्य परिणाम ठळक करण्याची किमया साधली, हे या चित्रपटाचे यश. दुसरे म्हणजे सर्व पात्रांचे नीट व नेटके रेखाटन. सर्वच पात्रे साचेबद्ध असली तरी विशेष उल्लेख करायचा तो मित्राच्या भूमिकेतील प्रवीण तरडे आणि मोठ्या भावाच्या भूमिकेतील संकर्षण कऱ्हाडे याचा. मुक्ता बर्वे, शिवाजी साटम आणि अर्थातच ज्यांचे लग्न आहे ती ऋचा आणि शिवराज यांनी भूमिका तोलून धरलेल्या आहेत. छायाचित्रण सुयोग्य. गीत संगीताच्या पातळीवर थोडी संधी हुकल्यासारखे वाटते. ........ निर्मिती - गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी छायाचित्रण - अभिजीत अब्दे संकलन - अभिजीत देशपांडे गीतकार - संदीप खरे गायक - अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, आदर्श शिंदे, वैशाली माडे, शुभांकर कुलकर्णी लेखन, संगीत, दिग्दर्शन - डॉ. सलील कुलकर्णी कलाकार - मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल आठल्ये, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार, भाऊ कदम, , अश्विनी काळसेकर, प्रवीण विठ्ठल तरडे, संकर्षण कऱ्हाडे, त्यागराज खाडिलकर इत्यादी

जन्मदिन

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा


काही निवडक प्रतिक्रिया:

मच्छिंद्र माळी पडेगांव,औरंगाबाद


नटश्रेष्ठ राजा गोसावी यांचे जीवन चरित्र फारच सुंदर आहे. धन्यवाद!!
संदर्भ:- प्रतिक्रिया